Bank Of England Recession : ब्रिटनमध्ये या वर्षाच्या अखेरपर्यंत मंदी येणार असल्याचा इशारा बँक ऑफ इंग्लंडने दिला आहे. ब्रिटनमधील ही मंदी एक वर्ष तरी असेल. ही मंदी 2008 मधील आर्थिक संकटाहून दीर्घकाळ आणि 1990 च्या दशकासारखी गंभीर असेल असेही बँक ऑफ इंग्लंडने म्हटले आहे. हिवाळ्यात गॅस आणि इंधनाच्या वाढत्या दरामुळे हे संकट ओढावू शकते असे एका वृत्तात म्हटले आहे. बँक ऑफ इंग्लंडने व्याज दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे ब्रिटनमधील महागाई नियंत्रणात नसल्याचे म्हटले जात आहे.


व्याज दरात वाढ 


गुरुवारी, बँक ऑफ इंग्लंडने व्याज दरात 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. आता ब्रिटनमध्ये 1.75 टक्के व्याज दर झाला आहे. वर्ष 1995 नंतर एकदाच एवढ्या प्रमाणात व्याज दरवाढ पहिल्यांदा झाली आहे. आर्थिक विकास दरवाढीबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. बँकेने म्हटले की, 2022 च्या शेवटच्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची गती मंदावण्यास सुरुवात होईल. त्यानंतर वर्ष 2023 मध्ये मंदी सुरू होऊ शकते. जागतिक आर्थिक संकटानंतरची ही सर्वात मोठी मंदी असेल असा इशाराही बँकेने दिला आहे. 


रशियाच्या युद्धाचा परिणाम


कोरोना महासाथ आणि रशिया-युक्रेनमधील युद्धानंतर अन्नधान्य, इंधन, गॅस आणि इतर वस्तूंच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. आर्थिक संकट आणि 'ऊर्जा दरवाढी'साठी रशियाने केलेली कारवाई जबाबदार असल्याचे गर्व्हनर अॅण्ड्र्यू बेली यांनी सांगितले. वाढलेल्या दरामुळे अर्थव्यवस्थेला किमान पाच तिमाहीपर्यंत मंदीचा सामना करावा लागू शकतो. 


आरबीआय आज पतधोरण जाहीर करणार


आज आरबीआयचं पतधोरण जाहीर होणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (shaktikant Das) पतधोरण जाहीर करतील.  रेपो दरात 35 ते 50 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर होण्याची शक्यता आहे.  त्यामुळं गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्ज महाग होऊ शकतात. आरबीआयकडून 0.50 टक्के व्याजदर वाढवण्याचा अंदाज आहे. पतधोरण जाहीर करताना महागाईवर नियंत्रण मिळवण्याच्या आव्हानासोबतच भारताला मंदीच्या छायेत न जाऊ देण्याचं देखील आव्हान असणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: