Maharashtra Rains : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर, नवी मुंबई यासह लातूर, सोलापूर या जिल्ह्यात तुफान पाऊस झाला आहे. तसेच पुणे, नाशिक, रायगड, सातारा या जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरुपता पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून, महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  


लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस


लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. निलंगा आणि औसा तालुक्यात ढगफुटी झाली असून शेताचे रुपांतर शेततळ्यात झाले आहे. त्यामुळं पिकं वाहून गेली आहेत. पुलावर पाणी आल्यामुळे विद्यार्थी आणि शेतकरी अडकून पडले आहेत.   कमी कालावधीमध्ये झालेल्या तुफान पावसाने शेतातील पिकं वाहून गेली आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भेटा आणि अंदोरा गावाच्या शिवारात तुफान पाऊस झाल्यामुळे भेटा - अंदोरा पुलावरून पाणी वाहत आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना घरी जाण्यासाठी पाणी उतरण्याची वाट पहावी लागणर आहे. 




नाशिक पाऊस


जुलैच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात नाशिक सह जिल्हाभरात पावसाने थैमान घातले होते. त्यानंतर शेवटच्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली. त्यामुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केला होता. त्यानंतर दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. मात्र काल रात्रीपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. नाशिक शहरासह मुंबई नाका, सीबीएस, पाथर्डी फाटा, गंगापूर नाका, गंगापूर रोड परिसरात सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुढील एका तासातच शहरात तब्बल 27 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 


दरम्यान एका तासांत पडलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली होती. रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले, अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने चालकांना वाहणे चालविणे कठीण झाले होते. तर शहर परिसरात म्हणजे नाशिक रोड, गिरणारे परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. नाशिकसह राज्यातील काही भागात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 




नागपूर विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस


नागपूर विभागात जुलै महिन्यात सरासरी 360.10 मिलिमीटर पाऊस पडतो, यावर्षी प्रत्यक्षात 684.22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा 190 टक्के अधिक पाऊस पडल्यामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती, सततचा पाऊस यामुळे शेतपिकांचे, पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी काठावरील गावांना पुराचा धोका निर्माण झाल्याने अशा गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. राज्य शासनाने पूरग्रस्तांना तातडीची मदत दिली असून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यानुसार शासनाला अहवाल सादर करण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या: