Bill Gates News : जगातील श्रीमंताच्या यादीतील एक नाव म्हणजे बिल गेट्स (Bill Gates). मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) फाऊंडर असणाऱ्या बिल गेट्स यांचा जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथा क्रमांक लागतो. बिल गेट्स यांची 'बिल एंड मेलिंडा गेट्स फाउंडेशन' नावाची संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून ते समाजपयोगी कार्यांना हातभार लावतात. गेट्स यांनी आता 20 अब्ज डॉलर्स दान केले आहेत. त्यांनी गेट्स फाऊंडेशनला हा निधी कोरोना महामारीने त्रस्त आणि इतर गरजूंना मदतीसाठी देण्यास सांगितलं आहे. बिल गेट्स यांच्या या दानानंतर 'बिल एंड मेलिंडा गेट्स फाउंडेशन' (Bill and Melinda Gates Foundation) संस्थेजवळ सुमारे 70 अब्ज डॉलरचा निधी जमा झाला आहे.


वॉरेन बफेट (Warren Buffett) यांनी 3.1 अब्ज डॉलर दान केले
बर्कशायर हॅथवेचे प्रमुख वॉरेन बफेट यांनीही गेट्स फाऊंडेशनमध्ये 3.1 अब्ज डॉलर दान केले आहेत. त्यांनी गेल्या महिन्यात गेट्स फाऊंडेशनमध्ये 3.1 अब्ज डॉलर दान करण्याची घोषणा केली होती.


गेट्स यांनी दान केलेल्या निधीचा असा होईल उपयोग
गेट्स फाउंडेशनने 2026 पर्यंत संस्थेच्या अर्थसंकल्पात 50 टक्क्यांनी वाढ केली आहे. गेट्स फाऊंडेशनला आशा आहे की, निधीत केली गेलेली वाढ गरजूंच्या शिक्षणासाठी तसेच गरीबी दूर करण्यासाठी मदतशीर सिद्ध होईल. शिवाय या निधीचा वापर रोगराई नष्ट करण्यात तसेच स्त्रिया आणि पुरुषांमध्ये समानता प्रस्थापित करण्यासही मदत करण्यासाठी होईल.


20 वर्षांपूर्वी गेट्स फाऊंडेशनची स्थापना
बिल गेट्स आणि त्यांची पूर्व पत्नी मेलिंडा यांनी मिळून 20 वर्षांपूर्वी 'बिल एंड मेलिंडा गेट्स फाउंडेशन'ची (Bill and Melinda Gates Foundation) स्थापना केली. दोघांनीही त्यांच्या संपत्तीतील मोठा भाग या संस्थेसाठी दान केला. मे 2021 मध्ये बिल गेट्स आणि त्यांची पूर्व पत्नी मेलिंडा यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला.


श्रीमंतांच्या यादीत गेट्स अदानींच्या मागे
ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सनुसार (Bloomberg's Billionaire Index) बिल गेट्स 113 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. गेट्स यांची श्रीमंतांच्या यादीत राहण्याची इच्छा नाही. त्यांनी यासंदर्भात एका पोस्टमध्ये लिहीलं आहे की, 'मी जगभरातील श्रीमंतांच्य यादीत खाली घसरलो किंवा बाहेर पडलो, तरीही मला याची चिंता नाही. मला कमावलेली संपत्ती समाजासाठी वापरायची आहे. ज्यामुळे समाजातील लोकांचं जीवन सुखी होईल.' 


गेट्स यांची संपत्ती 93 अब्ज डॉलर
20 अब्ज डॉलर दान केल्यानंतर गेट्स यांची संपत्ती 93 अब्ज डॉलर झाली आहे. ते आता जगातील श्रीमंतांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. या यादीत टेस्लाचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती 93 अब्ज डॉलर अब्ज डॉलर आहे. तर अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस (Jeff Bezos) 134 अब्ज डॉलर संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. फ्रान्सचे व्यावसायिक बर्नार्ड आरनॉल्ट 127 अब्ज डॉलर संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय व्यावसायिक गौतम अदानी जगातील श्रीमंताच्या यादीत 107 अब्ज डॉलर संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर आहेत.