Bank Salary Hike: बँक कर्मचाऱ्यांसाठी (Bank Employees) एक दिलासादायक बातमी आहे. लवकरच बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. कारण, इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि कर्मचारी संघटना यांच्यात पगारात 17 टक्के वाढ करण्याचा करार झाला आहे. हा करार 1 नोव्हेंबर 2022 पासून प्रभावी मानला जाईल. तसेच पुढील पाच वर्षांसाठी लागू राहील. त्यानुसार, पगारवाढीमुळं एसबीआयसह सर्व सरकारी बँकांवर 12 हजार 449 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.


बँक कर्मचारी अनेक दिवसांपासून पगारवाढीची मागणी करत होते. आता ही मागणी पूर्ण झाली आहे. याचा फायदा अंदाजे 9 लाख कर्मचारी आणि 3.8 लाख अधिकाऱ्यांना होणार आहे. मात्र, यामुळं सर्व सरकारी बँकांवर 12 हजार 449 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.


पगारात 17 टक्के वाढ होणार 


या करारानुसार सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांमध्ये 17 टक्के पगारवाढ होणार आहे. यासाठी 12449 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सुमारे 9 लाख कर्मचारी आणि 3.8 लाख अधिकाऱ्यांना नवीन कराराचा फायदा होणार आहे. 7 डिसेंबर रोजी आयबीए आणि कर्मचारी संघटना यांच्यात चर्चा झाली. पगारवाढीबाबत सामंजस्य करारही करण्यात आला. नवीन पगारवाढीची प्रक्रिया 6 महिन्यांत पूर्ण होईल.


या करारातील प्रमुख मुद्दे


नवीन पगारवाढ 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू होईल. हे पुढील 5 वर्षे लागू राहील. नवीन वेतनश्रेणीसाठी, डीए मूळ वेतनात विलीन केला जाईल. हा नियम 31 ऑक्टोबर 2022 पासून लागू मानला जाईल. याशिवाय, 3 टक्के लोडिंग देखील लागू होईल, ज्यामुळे 1795 कोटी रुपये खर्च केले जातील. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वार्षिक पगारवाढीसाठी वेगवेगळे नियम असतील. मात्र, निवृत्ती वेतनवाढीच्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु, त्यांना एकरकमी पैसे देण्याचे मान्य करण्यात आले आहे.


दर शनिवारी सुट्टीबाबत अद्याप निर्णय नाही


प्रत्येक शनिवार सुट्टी म्हणून ठेवण्याची मागणी आयबीएने सरकारकडे केली आहे. सध्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेला सुटी आहे. अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी संसदेत याला दुजोरा दिला होता. मात्र सरकार यावर विचार करत आहे की नाही हे त्यांनी सांगितले नाही. सामंजस्य करारातही याचा उल्लेख नाही. पाच दिवसांच्या आठवड्याबाबत नंतर निर्णय घेतला जाऊ शकतो. दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली होती, तर बँक कर्मचारी गेल्या वर्षभरापासून पगारवाढीची मागणी करत होते.


महत्त्वाच्या बातम्या:


बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकार लवकरच घेणार 'हा' मोठा निर्णय?