मुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांच्या उपचारासाठी राज्य सरकारकडून महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेचं पूर्वीचं नाव राजीव गांधी आरोग्यदायी जीवन योजना हे होतं. केंद्र सरकारनं अशाच प्रकारची योजना देशपातळीवर सुरु केली आहे. आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (Ayushman Bharat)असं या योजनेचं नाव आहे. या योजने अंतर्गत नागरिकांना मोफत आरोग्य विमा दिला जातो.
भारत सरकारद्वारे नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही योजना त्यापैकी एक आहे. भारत सरकारद्वारे राबवली जाणारी प्रमुख आरोग्य विमा योजना अशी या योजनेची ओळख आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील रुग्णालयांच्यामध्ये उपचारासाठी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनकल्याण योजनेद्वारे विविध उपचारांकरिता मोफत आरोग्य विमा पुरवला जातो. या योजनेचा लाभ कुटुंबातील एक व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त सदस्य एकत्रितपणे लाभ घेऊ शकतात.
या योजनेचा फायदा कुणाला मिळणार?
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सहभागी होण्यासाठी विविध अटी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सन 2011 च्या "सामाजिक, आर्थिक आणि जात आधारित जनगणनेतील" पात्र कुटुंब, अन्नसुरक्षा योजनेच्या अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटातील कुटुंब यांना लाभ मिळेल. याशिवाय ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत असून या योजनेमधील महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी राज्यात तसेच देशातील इतर राज्यात लाभ घेऊ शकतात.
या योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचारांकरिता प्रति वर्ष / प्रति कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंत पर्यंत मोफत आरोग्य विमा मिळेल. आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी आधार कार्ड द्वारे केवायसी करून आयुष्मान भारत योजनेचे कार्ड तयार करणे आवश्यक आहे. आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही योजनेशी अंगीकृत रुग्णालयात नियुक्त 'आरोग्य मित्र' आणि हेल्पलाईन क्र. 14555/1800111 565 शी संपर्क करु शकता.
केंद्र सरकारनं आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढवली
केंद्र सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला. वयाची 70 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्ती देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान भारत कार्ड काढणं आवश्यक असतं.
इतर बातम्या :