मुंबई : महाराष्ट्र सरकारनं अर्थसंकल्प जाहीर करताना अनेक योजना सुरु केल्या होत्या. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना या योजनांचा त्यात प्रामुख्यानं समावेश होता. यानंतर राज्य सरकारनं शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु केला होता. शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. या उपक्रमात काम करणाऱ्या उमेदवाराला दरमहा 10 हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता. या पदासाठी अर्ज करण्यासाठी 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली होती. आज या योजनेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.
आज अर्ज करण्याची शेवटची संधी?
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी आतापर्यंत 1 लाख 20 हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सरकारनं जाहीर केल्यानुसार 50 हजार योजनादूत नियुक्त केले जाणार आहेत. या साठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची संधी आहे. इच्छुक उमेदवार www.mahayojanadoot.org या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात.
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम नेमका काय?
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबवला जात आहे. ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण 50 हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा 10 हजार रूपये मानधन दिले जाणार आहे.
योजनादूत म्हणून अर्ज करण्यासाठी कोणत्या अटी?
1. उमेदवाराचं वय 18 ते 35 दरम्यान असावं.
2. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
3. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असावं.
४. संगणक ज्ञान असून हाताळता यावा.
5.अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) असावा.
6. आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करावे लागेल.
दरम्यान, मुख्यमंत्री योजनादूत हा उपक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे चालवला जाणार आहे.
इतर बातम्या :