Indian Railway: भारतीय रेल्वेच्या बाबतीत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेच्या सहा मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना (Railways multi-tracking projects) मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 12343 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांद्वारे, रेल्वे ट्रॅकवरील रेल्वे प्रवास एकत्रित करण्यात मदत होणार आहे. तसेच लॉजिस्टिक खर्च कमी होईल, प्रदूषणाला आळा घालण्यात मदत होणार आहे. तसेच मालवाहतुकीत मोठी वाढ होणार आहे. 


या प्रकल्पांचा संपूर्ण निधी केंद्र सरकार देणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत भारतीय रेल्वेच्या सहा मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांद्वारे, रेल्वे ट्रॅकवर रेल्वे प्रवास एकत्रित करण्यात मदत होईल. लॉजिस्टिक खर्च कमी होईल, तेल आयात कमी होईल आणि प्रदूषणाला आळा घालण्यात मदत होणार आहे. या प्रकल्पांचा संपूर्ण निधी केंद्र सरकार देणार आहे. भारतीय रेल्वेच्या सर्वात व्यस्त विभागांवरील मल्टी-ट्रॅकिंग प्रस्तावामुळं रेल्वे रुळांवर होणारी गर्दी कमी करण्यात आणि कामकाजात सुधारणा होण्यास मदत होईल.


6 मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांमध्ये 'या' 6 राज्यांचा समावेश


सरकारनं एक प्रसिद्धीपत्रक जारी करुन म्हटलं आहे की, या 6 मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांमध्ये 6 राज्यांचा समावेश आहे. या सहा राज्यांमध्ये राजस्थान, आसाम, तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश आणि नागालँडमधील 18 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. ज्यामुळं रेल्वे नेटवर्कमध्ये 1020 किलोमीटरची भर पडणार आहे. तसेच या राज्यांतील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 


मल्टी ट्रॅकिंगमुळे मालवाहतुकीत मोठी वाढ होणार


हे प्रकल्प PM गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीसाठी तयार केले जाणार आहे. जेणेकरुन प्रवासी आणि वस्तू सेवांची वाहतूक अखंडपणे करता येईल. ज्या विभागांमध्ये मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांवर काम केले जाईल, त्यामध्ये राजस्थानमधील अजमेर-चंदेरिया, जयपूर-सवाई माधोपूर, गुजरात-लुनी-समदरी-राजस्थानमधील भिल्डी यांचा समावेश आहे. आसाममधील अगाथोडी - कामाख्या, लुमडिंग - आसाममधील फर्केटिंग - नागालँड आणि तेलंगणा - आंध्र प्रदेशातील मोतुमारी आणि विष्णुपुरम यांचा समावेश आहे. अन्नपदार्थ, खते, कोळसा, लोखंड, पोलाद, फ्लायश, क्लिंकर, चुनखडी, पीओएल यांच्या वाहतुकीसाठी हे रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचे आहेत. मल्टी ट्रॅकिंगमुळे मालवाहतुकीत मोठी वाढ होईल.


PM गतिशक्ती ही मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीसाठी एक राष्ट्रीय मास्टर प्लॅन आहे. ज्याचे अनावरण ऑक्टोबर 2021 मध्ये करण्यात आले होते. पायाभूत सुविधा प्रकल्प नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये समन्वय साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेमागील भारत सरकारचा उद्देश लॉजिस्टिक खर्च कमी करण्याचा आहे.


महत्वाच्या बातम्या:


दिलादासायक! रेल्वेत नोकरी हवी असणाऱ्यांसाठी खुशखबर, एवढ्या जागांसाठी निघली 'लोको पायलट'ची भरती