Flight Boarding Rules : आता विमान प्रवाशांना (Air Passengers) उड्डाणाआधी (Flight Take Off) तासनतास ताटकळ बसण्याची गरज नाही. अनेकदा विमान उड्डाणाच्या बराच वेळ आधी प्रवाशांना विमानात वाट पाहत बसावं लागतं. विमानात बोर्डिंग झाल्यानंतर उड्डाणाला बराच विलंब होतो. यादरम्यान, प्रवाशांना बाहेरही पडू दिलं जात नाही. मात्र, आता तुम्हाला फ्लाईटआधी बराच वेळ विमानात बसावं लागणार नाही. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (BCAS) नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामुळे आता बोर्डिंग केल्यानंतर विमान टेक ऑफ करण्यास उशीर झाल्यासा प्रवाशांना विमाना बाहेर पडता येईल.
विमान प्रवाशांना दिलासा
नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (BCAS) नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. फ्लाईट बोर्डिंग केल्यानंतर बऱ्याच वेळा विमान टेक ऑफ करण्यास उशिर होतो, यादरम्यान प्रवाशांची मोठी गैरसोय होते. बोर्डिंग केल्यानंतर विमान उड्डाणाला विलंब झाल्याने प्रवासी विमानातच बराच वेळ अडकले जातात, त्यांना जागेवरून हलता येत नाही. यामुळे काही प्रवाशांची आणि केबिन क्रूची भांडणं झाल्याची काही घटनाही समोर आल्या होत्या. अनेक प्रवाशांकडून विमान प्राधिकरणाला तक्रारी आल्या होत्या. आता मात्र, या तक्रारींची दखल घेत यावरुन BCASकडून प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे.
फ्लाईट उड्डाणाआधी तासनतास वाट पाहत बसण्याची गरज नाही
बीसीएएसचे महासंचालक झुल्फिकार हसन यांनी सोमवारी नवीन मार्गदर्शन सूचनांची माहिती देताना सांगितलं की, विमान उड्डाणाच्या नवीन मार्गदर्शन सूचना लागू करण्यात आल्या आहेत. विमान उड्डाणासंदर्भातील नवीन मार्गदर्शक तत्त्वे 30 मार्च 2024 रोजी एअरलाइन्स आणि विमानतळ ऑपरेटरसाठी जारी करण्यात आली होती आणि ती आता लागू करण्यात आली आहेत.
प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्याचा प्रयत्न
या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे प्रवाशांचा त्रास कमी होईल आणि विमानात चढल्यानंतर त्यांना जास्त वेळ बसावे लागणार नाही. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्याचा हा प्रयत्न आहे. देशातील देशांतर्गत हवाई वाहतूक वेगाने वाढत आहे आणि दररोज सुमारे 3,500 उड्डाणे जातात. BCAS आणि इतर प्राधिकरणांनी वाढत्या हवाई वाहतूक दरम्यान, विमानतळांवरील गर्दीचा सामना करण्यासाठी उपाययोजना करत अनेक पावले उचलली आहेत.
उड्डाणाला उशीर झाल्याने प्रवाशाने पायलटच्या कानशिलात लगावली
जानेवारी महिन्यामध्ये, विमान उड्डाणाला उशिर झाल्याने इंडिगो फ्लाइटमधील संतप्त प्रवाशाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. इंडिगो फ्लाइटच्या (6E-2175) प्रवाशाने फ्लाइट उड्डाणाला जास्त उशीर झाल्याने पायलटच्या कानशिलात लगावली होती. पायलटच्या कानाखाली मारल्यानंतर प्रवाशाने म्हटलं होतं की, विमान उडवायचं असेल तर उडवा, नाहीतर गेट उघडा. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होता.