Business News : फेब्रुवारीचा पहिला आठवडा संपत आला आहे. या आठवड्यात बऱ्याच  घडामोडी घडल्या आहेत. देशाचा अर्थसंकल्प (Budget) सादर झाल्यानंतर काही दिवसांनीच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका (Delhi Assembly elections) झाल्या. दुसऱ्याच दिवशी RBI च्या MPC ने व्याजदरात कपात केली. त्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आले. या सगळ्यात देशातील टॉप 10 कंपन्यांपैकी 5 कंपन्यांना मोठा झटका बसला आहे. 5 मोठ्या कंपन्यांचे तब्बल 1 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.


देशातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांना सर्वाधिक तोटा सहन करावा लागला. दोन्ही कंपन्यांचे 30 हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. एलआयसी, एसबीआय आणि देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसचेही मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, देशातील टॉप 5 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठी खासगी कर्ज देणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या मार्केट कॅपला सर्वाधिक फायदा झाला आहे. त्याचवेळी, एअरटेलचे मार्केट कॅप देखील प्रचंड वाढले आहे. दोन्ही कंपन्यांचे मार्केट कॅप 30 हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. कोणत्या कंपनीला किती तोटा आणि किती नफा झाला, याबाबतची माहिती पाहुयात.


देशातील 'या' कंपन्यांना मोठा फटका 


देशातील टॉप 10 कंपन्यांपैकी 5 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये गेल्या आठवड्यात 1,09,357.14 कोटी रुपयांची घट झाली आहे.


1) देशातील सर्वात मोठ्या FMCG कंपन्यांपैकी एक असलेल्या ITC चे मूल्यांकन 39,474.45 कोटी रुपयांनी घसरून 5,39,129.60 कोटी रुपयांवर आले आहे.


2) देशातील सर्वात मोठ्या FMCG कंपन्यांपैकी एक असलेल्या हिंदुस्थान युनिलिव्हरचा एमकॅप 33,704.89 कोटी रुपयांनी घसरून 5,55,361.14 कोटी रुपयांवर आला.


3) देशातील सर्वात मोठी सरकारी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडियाचे मूल्यांकन 25,926.02 कोटी रुपयांनी घसरून 6,57,789.12 कोटी रुपयांवर आले आहे.


4) देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LICI) चे मूल्यांकन 20,113.49 कोटी रुपयांनी घसरून 5,16,088.19 कोटी रुपयांवर आले आहे.


5) देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे मूल्यांकन 16,064.31 कोटी रुपयांनी घसरून 14,57,854.09 कोटी रुपयांवर आले आहे.


'या' कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली वाढ 


गेल्या आठवड्यात देशातील टॉप 10 कंपन्यांपैकी 5 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 89,119.67 कोटी रुपयांची एकत्रित वाढ झाली.


1) ICICI बँकेचे मूल्यांकन 1,384.81 कोटी रुपयांनी वाढून 8,87,632.56 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.


2) देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 2,977.12 कोटी रुपयांनी वाढून 17,14,348.66 कोटी रुपयांवर पोहोचले.


3) देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसचे बाजार भांडवल 21,114.32 कोटी रुपयांनी वाढून 7,90,074.08 कोटी रुपये झाले.


4) देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलचे बाजारमूल्य 31,003.44 कोटी रुपयांनी वाढून 9,56,205.34 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.


5) देशातील सर्वात मोठ्या खासगी कर्जदार एचडीएफसी बँकेने 32,639.98 कोटी रुपयांची भर घातली आणि त्याचे मूल्यांकन 13,25,090.58 कोटी रुपये झाले.



गेल्या आठवड्यात शेअर बाजारात तेजी होती. मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 1.36 टक्क्यांनी वाढला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक निफ्टी एक टक्क्यांनी वाढून 23,559.95 अंकांवर पोहोचला आहे.