RBI On Adani Group :  अदानी समूहाला (Adani Group) सार्वजनिक बँकांनी (PSU Bank) दिलेल्या कर्जाच्या मुद्यावरून मोठा गदारोळ सुरू झाला असताना दुसरीकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) यावर आपली भूमिका मांडली आहे. रिझर्व्ह बँकेने बँकांच्या स्थितीबाबत माहिती देताना नागरिकांना आश्वास्त केले आहे.  रिझर्व्ह बँकेकडून संपूर्ण बँकिंग क्षेत्र आणि प्रत्येक बँकेवर देखरेख ठेवली जाते. जेणेकरून आर्थिक स्थिरता राखली जाईल. 


रिझर्व्ह बँकेने आज निवेदन जाहीर करत म्हटले की, आरबीआयजवळ सेंट्रल रिपॉजिटरी ऑफ इन्फॉर्मेशन ऑन लार्ज क्रेडिट (CRILC) डेटाबेस सिस्टीम आहे. यामध्ये बँकांद्वारे देण्यात आलेल्या पाच कोटींहून अधिक रुपयांच्या कर्जाची मॉनिटरिंग केली जाते. भारतीय बँकिंग सेक्टर स्थिर असल्याची माहितीदेखील रिझर्व्ह बँकेने दिली.


आरबीआयने सांगितले की, सध्याच्या मूल्यांकनानुसार भारताचे बँकिंग क्षेत्र अतिशय लवचिक आणि स्थिर आहे. RBI च्या मते, भांडवल पर्याप्तता, मालमत्तेची गुणवत्ता, रोख रक्कम, तरतूद कव्हरेज, बँकांचा नफा अधिक चांगला आहे. बँका RBI ने जारी केलेल्या लार्ज एक्सपोजर फ्रेमवर्कचे पालन करत आहेत. आरबीआय सतर्क आहे आणि भारतीय बँकिंग क्षेत्राच्या स्थैर्यासाठी योग्य देखरेख ठेवत असल्याचे आरबीआयने म्हटले.


अदानी समूहाने गैरमार्गाने शेअर दर वाढवले असल्याचा दावा करणारा अहवाल अमेरिकेतील संशोधन संस्था हिंडेनबर्गने प्रसिद्ध केला. अदानी समूहातील एकूणच कारभाराबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर अदानी समूहाला कर्ज देणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. अदानी समूहाला दिलेल्या कर्जाच्या मुद्यावरून सार्वजनिक बँकांच्या व्यवस्थापनावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता आरबीआयने प्रसिद्धी पत्रक काढत बँकांची आर्थिक स्थिती स्थिर असल्याचे जाहीर केले आहे. 


अदानी समूहाला दिलासा 


अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अडचणीत सापडलेल्या अदानी समूहाला (Adani Group) आज मोठा दिलासा मिळाला आहे. क्रेडिट सुईस आणि  सिटी ग्रुपने अदानींच्या बाँडवर कर्ज देण्यास नकार दिल्यानंतर त्याचे पडसाद बाजारातही उमटले. मात्र, आज दोन जागतिक रेटिंग कंपन्यांनी अदानी समूहाला दिलासा देणारी बातमी दिल्यानंतर अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या (Adani Enterprises) शेअर्समध्ये तेजी दिसून आली. आज दिवसभरातील व्यवहारात अदानी एंटरप्रायझेसने नीचांकी पातळीवरून उसळण घेतली. अदानी समूहाच्या सध्याच्या स्थितीमुळे त्यांच्या रेटिंग्सवर कोणताही परिणाम होणार नाही. अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरावर आमची नजर असल्याचेही त्यांनी सांगितले. अदानी समूहाच्या रेटिंगमध्ये बदल करायचा असल्यास त्याच्या सर्व पैलूंचा अभ्यास केला जाईल. त्याशिवाय, कोणताही बदल केला जाणार नाही असेही फिच आणि मूडीजने म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: