Adani Group IPO :   IPO द्वारे कमाई करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठी संधी मिळणार आहे. अनेक गुंतवणुकदारांना चांगले रिटर्न देणाऱ्या अदानी समुहातील (Adani Group) आणखी एका कंपनीचा आयपीओ (IPO) येणार आहे. अदानी समुहातील 'अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड'चा IPO येणार आहे. गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी यांनी ही माहिती दिली आहे. जीत अदानी हे अदानी समुहातील विमानतळाशी संबंधित व्यवसायाची जबाबदारी सांभाळतात. सध्या विमानतळाचा व्यवसाय समूहाच्या अग्रगण्य कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या अंतर्गत आहे.


समूहाच्या विमानतळ व्यवसायाचे प्रमुख जीत अदानी यांनी सांगितले की, आमच्यासमोर काही लक्ष्य आहेत, ते पूर्ण केल्यानंतर विमानतळ व्यवसाय लवकरच शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल. हैदराबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना जीत अदानी यांनी विमानतळ व्यवसायात लक्षणीय वाढ होत असल्याचे नमूद केले. 


मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अदानी समूह चालवते. तर, नवी मुंबई विमानतळ विकसित करत आहे. कंपनी अहमदाबाद, लखनौ, मंगळुरु, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम येथेही विमानतळ चालवते.


नवी मुंबई विमानतळ कधी पूर्ण होणार?


जीत अदानी यांनी सांगितले की,  नवी मुंबई विमानतळाचे बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. अदानी समूहामार्फत चालवल्या जाणार्‍या सर्व विमानतळांचा सध्या विस्तार सुरू असून तो पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो. अदानी विमानतळाने गेल्या आर्थिक वर्ष 2022-23 (एप्रिल 2022-मार्च 2023) आणि यावर्षी 80 दशलक्ष प्रवाशांना हाताळले आहे. एकदा व्यवसाय पूर्णपणे स्वावलंबी झाला की आम्ही त्याला शेअर बाजारात लिस्ट करतो, हेच आमचे बिझनेस मॉडेल असल्याचे अदानी यांनी सांगितले. 


अदानी समूहातील कंपनीचा मागील आयपीओ कधी आला? 


अदानी समुहातील मागील आयपीओ हा अदानी विल्मरचा कंपनीचा होता. अदानी विल्मर कंपनी शेअर बाजारात 8 फेब्रुवारी 2022 रोजी लिस्ट झाली होती. कंपनीच्या आयपीओत शेअर किंमत रुपये 218 ते 230 रुपये इतकी होती. कंपनीचे शेअर्स 8 फेब्रुवारी रोजी बीएसईवर 221 रुपयांच्या डिस्काउंटने लिस्ट झाली होती. मात्र, नंतर या शेअर्सने गुंतवणुकदारांना मोठा परतावा दिला. 



(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी असून शेअर विषयक सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)