मुंबई : अदानी समूहाच्या समभागात मागील आठवड्यात चांगली तेजी बघायला मिळाल्यानंतर पुन्हा एकदा पडझड बघायला मिळतआहे. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समूहातील समभागात 50 टक्क्यांहून अधिक पडझड बघायला मिळाली होती. मात्र मागील तीन महिन्यात अदानींच्या समभागात तेजी दिसत होती. मात्र शेअर्सच्या तुफान वाढीनंतर अदानी एंटरप्रायझेस या प्रमुख कंपनीच्या शेअर्सवर स्टॉक एक्सचेंजने पाळत ठेवली आहे. 


हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहातील समभागांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, मागील काही महिन्यात अदानीसमूहातील कंपन्यांनी चांगलं कमबॅक केल्याचं बघायला मिळत आहे. ज्याचा फायदा अदानींना देखील होताना दिसतोय. बुधवारी गौतम अदानी यांनी जगातील टॉप-20 अब्जाधीशांच्या यादीत पुनरागमन केले होते. परंतु आता अदानी समूहावर पुन्हा संकटाचे ढग दिसत आहेत. 


अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या वाढीनंतर अदानी एंटरप्रायझेस या प्रमुख कंपनीच्या शेअर्सवर स्टॉक एक्स्चेंजने पाळत ठेवली आहे. बीएसई आणि एनएसईनं अल्प मुदतीसाठी देखरेखीखाली ठेवले आहे. त्यामुळे काल आणि आज अदानी समूहातील काही शेअर्समध्ये घसरण बघायला मिळाली.


अदानी समूहाकडून हिंडेनबर्ग अहवालाचे वेळोवेळी खंडन केल्याचं बघायला मिळालं आहे. दुसरीकडे अदानी समूहाकडून आपल्या कंपन्यांमध्ये गंगाजळी येण्यासाठी प्रयत्न देखील केले गेलेत. अशात अदानी एंटरप्रायझेजमध्ये बाजारातून 12 हजार 500 कोटीरुपये उभारण्यासाठी मंजुरी दिली गेली. सोबतच अदानी समूहातच्या समभागात देखील अनेक बाहेरील कंपन्यांनी गुंतवणूक केल्याचं बघायला मिळालं. 


अदानी समूहांच्या समभागातील वाढीचं काय कारण?


हिंडेनबर्गनं केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीला अदानींच्या स्टॉकच्या किंमतीत कोणतीही त्रुटी आढळली नाही. त्यामुळे अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागात वाढ झाल्याचं दिसलं. सेबीचा प्राथमिक अहवाल दिलासादायक असतानाच सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाच्या चौकशीसाठी आणखी दोन महिन्यांची मुदत वाढ बाजारातील गुंतवणूकदारांसाठी दिलासा होता.


मार्च महिन्यात अदानींच्या समभागांची 15 हजार कोटी रुपयांची खरेदी झाली, त्यामुळे समूहातील भांडवल 10 टक्क्यांनी वाढल्याने समभागात देखील वृद्धी झाल्याचं दिसलं. 


अदानी एंटरप्राईझेजला याआधी देखील बाजार नियामकने देखरेखीखाली ठेवले होते. मात्र मार्च महिन्यात ही देखरेख काढून टाकली होती. अदानींच्या समभागात अनेक सामान्य गुंतवणूकदारांना देखील पैसा लागला आहे. त्यामुळे अदानींचा फायदा असो किंवा तोटा, त्याचा परिणाम हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांवर देखील होताना बघायला मिळत असतो. 


ही बातमी वाचा: