Aadhaar Based Face Authentication: आधार आधारीत फेस ऑथेंटिकेशन व्यवहाराचा वापर वाढत चालला असल्याचे चित्र आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मे 2023 मध्ये आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनद्वारे झालेल्या व्यवहाराने उच्चांक गाठला आहे. मे महिन्यात 10.7 दशलक्ष व्यवहार करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली. ऑक्टोबर 2021 मध्ये ही सेवा लाँच करण्यात आली होती. त्यानंतर मे 2023 मधील हा सर्वाधिक आकडा आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सलग दुसऱ्या महिन्यात आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांची संख्या 10 दशलक्षाहून अधिक झाली आहे. आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांची संख्या सतत वाढत आहे. या व्यवहारात जानेवारी 2023 च्या तुलनेत मे महिन्यात 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
UIDAI ने विकसित केलेले आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशन सोल्यूशनचा वापर 47 संस्थांद्वारे केला जात आहे. यामध्ये राज्य सरकार, केंद्र सरकारची मंत्रालये आणि बँकांचा समावेश आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी लाभार्थी ओळखण्यासाठी आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनचा वापर केला जातो. याशिवाय पीएम किसानच्या लाभार्थ्यांची पडताळणी आणि पेन्शनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र हे घरबसल्या काढण्यासाठी फेस ऑथेंटिकेशनचा वापर होतो. याशिवाय सरकारी विभागातील कर्मचार्यांची हजेरी लावणे, बिझनेस करस्पॉन्डंट्सद्वारे बँक खाती उघडण्यासाठी आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनचा वापर केला जात आहे.
फिंगरप्रिंट्सच्या गुणवत्तेबाबत समस्या भेडसावणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन अतिशय सोयीचे ठरत आहे. इतकंच नव्हे तर मजुरांसाठीदेखील ही सेवा फायदेशीर ठरत आहे.
मे महिन्यात, UIDAI ने नागरिकांच्या विनंतीनंतर 14.86 दशलक्ष आधार अपडेट्स कार्यान्वित केली आहेत. मे महिन्यात 254 दशलक्ष ई-केवायसी व्यवहार झाले आहेत. मे 2023 अखेर 15.2 अब्ज आधार ई-केवायसी व्यवहार पूर्ण झाले आहेत. ई-केवायसीमुळे वित्तीय कंपन्या, दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांसाठी ग्राहक जोडण्याच्या खर्चात मोठी घट झाली आहे.
कोणतेही डॉक्युनमेंट नसले तरी करू शकता 'आधार'मध्ये बदल
UIDAI ने आधार कार्डधारकांसाठी (Aadhar Card) एक मोठी सुविधा आणली आहे. आता तुम्ही कोणत्याही कागदपत्राशिवायही तुमचे आधार अपडेट (Aadhar Updates) करू शकता. यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या 'कुटुंब प्रमुखाची' परवानगी लागणार आहे. अनेक वेळा आधार अपडेट करताना सर्वसामान्यांना वेगवेगळ्या अडचणीचा सामना करावा लागतो.
कोणासाठी फायदेशीर ठरणार ही सुविधा
ज्यांच्याकडे स्वतःची कागदपत्रे नाहीत त्यांच्यासाठी 'हेड ऑफ फॅमिली' आधारित आधार अपडेट प्रक्रिया खूप फायदेशीर आहे. संबंधित व्यक्ती त्यांच्या कुटुंब प्रमुखाच्या कागदपत्रांचा वापर करून आधारमध्ये टाकलेली माहिती सहज अपडेट करू शकतात. मुले, पत्नी/पती, आई-वडील यांसारख्या लोकांना त्याचा लाभ मिळू शकतो.
अनेक वेळा मुलांकडे आधार व्यतिरिक्त कोणतीही कागदपत्रे नसतात. अशा परिस्थितीत तो त्याच्या पालकांच्या कागदपत्रांचा वापर करून आधार अपडेट करू शकतो. UIDAI ने 3 जानेवारी 2023 रोजी या संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, आता फक्त 'कुटुंब प्रमुख' दस्तऐवजांच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्वतःच्या कागदपत्रांशिवायही आधार अपडेट करू शकता. ऑनलाईन माध्यमातून ही प्रक्रिया करता येणार आहे.
कुटुंब प्रमुखांच्या कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासणार
या प्रकरणाची माहिती देताना UIDAI ने म्हटले आहे की, जर तुम्हाला 'हेड ऑफ फॅमिली'च्या कागदपत्रांद्वारे तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीसोबतचे तुमचे नाते सिद्ध करावे लागेल. यासाठी तुम्हाला रेशनकार्ड, मार्कशीट, विवाह प्रमाणपत्र, पासपोर्ट यासारखी कागदपत्रे आवश्यक असतील. तुमच्याकडे कोणतीही असे कागदपत्र नसल्यास Self Declaration भरून UIDAI कडे सादर करावे लागेल.