Ratan Tata Passed Away:   देशासाठी आदर्श व्यक्तिमत्व, शालिन उद्योगपती अशी ओळख असलेल्या रतन टाटा (Ratan Tata) यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 86 व्या वर्षी रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. दीर्घ आजाराने रतन टाटा यांचे निधन झाले असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. टाटा ग्रुपचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी एक्स पोस्ट करत ही अधिकृत माहिती दिली. रतन टाटा यांच्या निधनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 


द्रौपदी मुर्मू यांनी एक्स पोस्ट करत म्हटलं की, श्री रतन टाटा यांच्या दुःखद निधनाने, भारताने कॉर्पोरेट वाढीला, राष्ट्र उभारणीत आणि नैतिकतेसह उत्कृष्टतेचे मिश्रण करणारा एक आयकॉन गमावला आहे. पद्मविभूषण आणि पद्मभूषण मिळवणारे, टाटांचा महान वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या रतन टाटा यांनी जागतिक स्तरावर एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. त्यांनी अनुभवी व्यावसायिक आणि तरुण विद्यार्थ्यांना सारखेच प्रेरणा दिली. परोपकार आणि परोपकारासाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे. मी त्यांच्या कुटुंबियांना, टाटा समूहाच्या संपूर्ण टीमला आणि जगभरातील त्यांच्या चाहत्यांना माझ्या संवेदना व्यक्त करतो.






पंतप्रधान मोदींनीही वाहिली श्रद्धांजली 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटलं की, श्री रतन टाटा एक दूरदर्शी व्यापारी नेते, दयाळू व्यक्तीमत्त्व आणि विलक्षण व्यक्ती होते. त्यांनी भारतामधील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना नेतृत्व प्रदान केलं. त्यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहेत. ओम शांती! 


शरद पवारांनीही व्यक्त केला शोक


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की, जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे  व्यक्तीमत्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!


ही बातमी वाचा : 


Ratan Tata Passed Away : 'दयाळू, विलक्षण व्यक्तीमत्व', रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक