8th Pay Commission : केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली असून केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यासाठी लवकरच एक समिती स्थापन करून आठवा वेतन आयोग तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली असून त्याची अंमलबजावणी ही पुढील वर्षापासून होण्याची शक्यता आहे. पण वेतन आयोगातील वाढ ठरवण्यामध्ये फिटमेंट फॅक्टर महत्त्वाचा असतो. या फिटमेंट फॅक्टरच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार ठरवले जातात.


फिटमेंट फॅक्टरमुळे पगारात वाढ नेमकी कशी होते?  (What Is Fitment Factor)


वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढवण्यासाठी फिटमेंट फॅक्टर लक्षात घेतला जातो. त्या आधारेच कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन ठरवले जाते. फिटमेंट फॅक्टर हे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर (Basic Pay) लागू होते. त्यामध्ये महागाई, आर्थिक स्थिती आणि सरकारची आर्थिक क्षमता या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. 


सातव्या वेतन आयोगानुसार, हा फिटमेंट फॅक्टर हा 2.57 टक्के इतका होता. आठव्या वेतन आयोगानुसार, हा फिटमेंट फॅक्टर 2.86 ते 3 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मूळ वेतनात मोठी वाढ होऊन कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारातही वाढ होणार आहे.


केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ कशी होणार हे उदाहरण देऊन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सातव्या वेतन आयोगानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के आहे. जर एखाद्याचे मूळ वेतन 20 000 रुपये असेल. या प्रकरणात कर्मचार्‍याचा एकूण पगार 20,000 × 2.57 म्हणजेच 51,400 रुपये इतका होईल. 


आठव्या वेतन आयोगानुसार इतका पगार वाढेल


आठव्या वेतन आयोगानुसार आपण फिटमेंट फॅक्टर हा 2.86 इतका असेल असं समजूया. त्यामध्ये वाढही होऊ शकते किंवा कमीही होऊ शकते. 


आठव्या वेतन आयोगानुसार, एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन (Basic Pay) हे जर 20 हजार रुपये असेल तर सध्या त्याचे वेतन हे 51,400 रुपये असेल. आठव्या वेतन आयोगानुसार त्यामध्ये 5,800 रुपयांची वाढ होऊन त्या व्यक्तीचे वेतन हे 57,200 रुपये इतके होऊ शकते. ( 20,000 × 2.86 = 57,200)


आठव्या वेतन आयोगानुसार, एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन हे जर 40 हजार रुपये असेल तर सध्या त्याचे वेतन हे 1,02,800 रुपये असेल. आणि आठव्या वेतन आयोगानुसार त्यामध्ये 11,600 रुपयांची वाढ होऊन त्या व्यक्तीचे वेतन हे 1,14,400 रुपये इतके होऊ शकते. ( 40,000 × 2.86 = 1,14,400)


एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन हे 50 हजार रुपये असेल तर त्या व्यक्तीचे सध्याचे वेतन हे 1,28,000 इतके असेल. तर आठव्या वेतन आयोगानुसार त्यामध्ये 15 हजार रुपयांची वाढ होऊन ते 1,43,000 इतके होऊ शकते. ( 20,000 × 2.86 = 57,200)


जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन हे 75 हजार रुपये असेल तर सातव्या वेतन आयोगानुसार त्याला एकूण  1,92,750 इतके वेतन मिळत असेल. जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर त्याच्या वेतनात 19,750 रुपयांची वाढ होऊन ते  2,14,500 इतके होईल. ( 75,000 × 2.86 = 2,14,500)


जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन हे 1 लाख रुपये असेल तर सातव्या वेतन आयोगानुसार त्याला 2,57,000 इतके एकूण वेतन असेल. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्याच्या वेतनात 29 हजार रुपयांची वाढ होऊन ते 2,86,000 इतके होईल. ( 1,00,000 × 2.86 = 2,86,000)


वेतन आयोगाशी संबंधित आणखी काही गोष्टी:


दर 10 वर्षांनी वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, भत्ते आणि इतर रोजगार फायद्यांचा आढावा घेतो.
वेतन आयोग,महागाई, आर्थिक स्थिती आणि राहणीमानाच्या खर्चावर अवलंबून वेतन आणि पेन्शनमध्ये बदल करण्याची शिफारस करतो.
28 फेब्रुवारी 2014 रोजी 7 व्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली. जानेवारी 2016 मध्ये त्याच्या शिफारशी लागू करण्यात आल्या.
8 व्या वेतन आयोगाला आता मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी एक समिती गठीत केली जाईल. त्याची अंमलबजावणी 2026 पासून होण्याची शक्यता आहे.


ही बातमी वाचा: 


8 th Pay commission: मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च