4 Day Work Week: आठवड्यातून फक्त 4 दिवस काम करण्याचा ट्रेंड हळूहळू वाढत आहे. अनेक देशांमध्ये त्याचा अवलंब देखील केला जात आहे. यामध्ये आता जर्मनीचे (Germany) नाव जोडले गेले आहे. तिथं अनेक कंपन्यांनी 4 दिवसीय कामाचा आठवडा लागू केला आहे. तर तीन दिवस सुट्टी असणार आहे. यामुळं कर्मचाऱ्यांवर कामाचा दबाव कमी होतो आणि एकूण उत्पादकता वाढत असल्याचं म्हटलं जात आहे. 


पगारात कोणत्या प्रकारची कपात नाही 


ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जर्मनीतील अनेक कंपन्या चार दिवसांच्या कामाच्या आठवड्याची पद्धत स्वीकारत आहेत. या अंतर्गत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील सात दिवसांपैकी फक्त 4 दिवस काम करण्यास सांगत आहेत. उर्वरित 3 दिवस कर्मचाऱ्यांना विश्रांती देण्यात येत आहे. विशेष म्हणजे यासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणतीही कपात केलेली नाही. अहवालानुसार, जर्मनीतील अनेक कंपन्या सध्या 4 दिवसांच्या कामाच्या आठवड्याची चाचणी घेत आहेत. या प्रयोगात सुमारे 45 कंपन्या सहभागी झाल्या आहेत. यामध्ये सहभागी कंपन्या पगारात कोणताही बदल न करता कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी करत आहेत. यापूर्वी 2022 मध्ये ब्रिटनमधील अनेक कंपन्यांनी असाच प्रयोग केला होता.


कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची समस्या दूर होणार


जर्मनी सध्या आर्थिक संघर्ष करत आहे. युरोपची सर्वात मोठी अर्थव्यवस्था गेल्या वर्षी आर्थिक मंदीत सापडली होती. त्यानंतर आर्थिक प्रगतीच्या मार्गावर परतण्यासाठी जर्मनीची धडपड सुरू आहे. प्रतिकूल परिस्थितीतही कंपन्यांना अडचणी येत आहेत. कंपन्यांसमोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे काम करणाऱ्या लोकांची कमतरता. असे मानले जाते की 4 दिवसीय कामाच्या सप्ताहामुळं कंपन्यांच्या विद्यमान कर्मचाऱ्यांची उत्पादकता तर वाढेलच, परंतू, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची समस्या देखील दूर होईल.


1 फेब्रुवारीपासून बदल लागू होणार 


अनेक कामगार संघटना आणि हक्क संघटना कामगारांवरील कामाचा ताण कमी करण्याची मागणी करत आहेत. जर्मनीतही अशा मागण्या कामगार संघटनांनी केल्या आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, प्रयोगात सहभागी कंपन्या 1 फेब्रुवारीपासून बदल लागू करतील. यामुळे 4 दिवसांच्या कामाच्या आठवड्यात कामगार संघटनांचा युक्तिवाद कितपत योग्य होता हे त्यांना कळू शकेल.


महत्त्वाच्या बातम्या:


National Pension System : राष्ट्रीय पेन्शन योजनेत खातं कसं उघडायचं? ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया आहे तरी काय?