Bihar News : बिहारमध्ये (Bihar) सध्या राजकीय अशांतता निर्माण झाल्याची चर्चा सुरु आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish kumar) हे सत्तेत असताना कधीही आपली भूमिका बदलू शकतात. नितीशकुमार हे पुन्हा एनडीएसोबत जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.  दरम्यान, अशा स्थितीत 'गरीब' राज्य असणाऱ्या बिहारमध्ये किती आमदार 'करोडपती' आहेत, याबाबतची माहिती जाणून घेऊयात. 


सध्या बिहारमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. अशातच सर्वांच्या नजरा या नितीशकुमार यांच्या भूमिकेकडे लागल्या आहेत. गरीब राज्य समजल्या जाणाऱ्या बिहारमध्ये कोट्यवधींची संपत्ती असलेले अनेक आमदार आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीनंतर विजयी आमदारांच्या निवडणूक शपथपत्रांची छाननी केली होती. या आधारे बिहारमधील 194 नवीन आमदार कोट्यधीश असल्याचे समोर आले आहे. नव्याने स्थापन झालेल्या विधानसभेतील हे सुमारे 81 टक्के आमदार आहेत. 


बिहारमधील टॉप-5 श्रीमंत आमदार कोण? 


2020 च्या निवडणुकीत विजयी झालेल्या बिहारमधील सर्वात श्रीमंत आमदाराची संपत्ती 68 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 


राष्ट्रीय जनता दलाचे मोकामाचे आमदार अनंत कुमार सिंह यांच्याकडे 68.56 कोटी रुपयांची संपत्ती आहे.


भागलपूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झालेले अजित शर्मा 43 कोटींचे मालक आहेत.


आरजेडीच्या नवाडा आमदार विभा देवी यांच्याकडे 29 कोटी रुपयांची संपत्ती आहे.


मधुबनी येथील राजदचे समीर कुमार महासेठ यांच्याकडे 24 कोटींची संपत्ती आहे.


आरजेडीचे आमदार अशोक कुमार चौधरी 22 कोटींचे मालक आहेत.


बिहारमधील सत्ताधारी जेडीयूच्या 38 आमदारांची संपत्ती 1 कोटींहून अधिक आहे. 


राज्यातील सर्वात गरीब आमदाराकडे केवळ 70 हजार रुपयांची संपत्ती


तर राज्यातील सर्वात गरीब आमदाराकडे केवळ 70 हजार रुपयांची संपत्ती आहे. आरजेडीचे अलौली मतदारसंघाचे आमदार रामवृक्ष सदा यांच्याकडे राज्यातील विजयी आमदारांमध्ये सर्वात कमी संपत्ती आहे. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांच्याकडे आमदार निवासाच्या चाव्या देण्यात आल्यावर ते भावूक झाले होते. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची संपत्ती 1.64 कोटी रुपये आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी याचा उल्लेख केला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Bihar Politics : राजीनामा न देताच नितीशकुमार होणार एनडीए सरकारचे मुख्यमंत्री? जाणून घ्या समीकरण