चला.... तर सुट्ट्यांच्या निमित्ताने का होईना पुन्हा एकदा मासिक पाळीचा मुद्दा चर्चेला घेतला गेला... त्या आधी सॅनिटरी पॅडवर लावलेल्या GST मुळे या मुद्याचं साग्रसंगीत चर्वण करून झालंच होतं पण आता पाळी ही महिलांच्या आयुष्यातली किती साधी सोपी आणि कसलाही त्रास होऊ न देणारी नैसर्गिक क्रिया असते हे बऱ्याच जणांनी आपल्या बोलण्यातून दाखवून दिलं...


पण खरंच सुट्टीची गरज आहे का? तर आहे...!!! मासिक पाळीच्या कोणत्याही दिवसात महिलांना त्रास होत असेल तर ती त्यांच्या  शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची गरज आहे. मुळात पाळी या एका क्रियेवर महिलांच्या अनेक क्रिया अवलंबून असतात... त्यांचे मूड्स... त्यांची क्रयशक्ती... त्यांची सहनशीलता... केवळ शारीरिक नव्हे तर प्रत्येक मानसिक गोष्टीचा परिणाम पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना सहनच करावा लागतो...

रक्तदान करायला गेल्यानंतर काही मिली रक्त काढल्यावर आपल्याला थोडा थकवा जाणवतो... त्या नंतर बऱ्याचदा खाण्यासाठी काही फळं किंवा पदार्थही आपल्याला दिले जातात. मग असं असताना दिवसभर शरीरातून रक्ताचा पाट वाहत असताना त्यातच प्रत्येक हालचाल करायची...दिवसाचा गाडा नेहमीप्रमाणे हाकण्यात तसूभरही कमी पडायचं नाही. तिच सकाळची 6.30 ची चर्चगेट फास्ट... पुन्हा पुढे ऑफिसमध्ये फाईलींचा ढीग...कम्प्युटरवरचं तासनतास काम... वरिष्ठांची बोलणी... ब्रेकिंग न्यूज... पावसाच्या पाण्यात एकेका बाईटसाठी ताटकळत उभं राहणं... या सगळ्यातून मार्ग काढत जेव्हा कंबरेखालचा भाग दिवसभराच्या व्यापने लुळा पडतोय की काय असं वाटायला लागतं... आणि गर्भाशयातून निघणाऱ्या रक्ताच्या धारेसरशी गर्भगळीत होणं काय असतं हे कळायला लागतं... तेव्हा शरीराला किमान आरामाची नितांत गरज असते.

आता बरेच जण यावर म्हणतील - "मग करायच्या कशाला नोकऱ्या? बायकांनी घरात बसावं..."  मुळात महिलांना एक दिवस सुट्टी देऊन त्यांच्यावर आपण उपकार करत आहोत अशी भावना असणाऱ्या पुरुषी मानसिकतेची कीव येते. ज्या क्षणी, ज्या दिवशी तिच्या तब्येतीचा प्रश्न येईल त्यावेळी तातडीने कार्यालयातून घरी निघून जाण्याची मुभा तिला असायलाच हवी. कंपन्या पुरवत असणाऱ्या इतर सुट्ट्या असतानाही या सुट्टीच महत्व इतकंच की ही सुट्टी अत्यंत महत्वाच्या कारणासाठी दिली जायला हवी. एरव्ही आपला कुणीतरी लांबचा नातेवाईक वारलाय असं सांगून रिसॉर्ट ला फिरायला जाणारे काही कमी नाहीत. त्यामुळे या सुट्टीचा वापर महिला चुकीच्या पद्धतीने करतील हे म्हणणं म्हणजे तोंडाची वाफ दवडल्यासारखं वाटतं...

आता पुढचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे - "या सुट्टीमुळे महिलांच्या करियरचा प्रश्न निर्माण होईल. आणि त्या मागे पडतील....?" मुळात महिन्याभरातल्या एका सुट्टीने ऑफिसला तसूभरही फरक पडत नाही ही आयडियल गोष्ट असली तरीही या सुट्टीचा कंपन्यांकडून बाऊ केला जातोय ही महत्वाची बाब. महिन्याला ज्याप्रमाणे एखादा ऑफ एक्स्ट्रा घेतला जातो किंवा सरकारी सुट्टी असते त्याप्रमाणे या सुट्टीकडे पाहिलं तर हरकत नाहीच आहे. फक्त डोळ्यांवर जुनाट झापडं लावणाऱ्यांना त्यांची दृष्टी बदलायला सांगणं म्हणजे सुज्ञानचा मूर्खपणा... त्यामुळे एका सुट्टीमुळे बायकांचं अख्ख करियर खराब वगैरे होईल असं बिलकुल नाही.

पुढचा मुद्दा हा की मग लष्कर, शेती इ. क्षेत्रातल्या बायकांचं काय? मुळात कोणत्याही गोष्टीची सुरुवात होणं हीच क्रांतिकारक बाब असते. त्यामुळे ज्याप्रमाणे संघटित क्षेत्रातल्या महिलांना त्यांचे अधिकार मिळतायत तेच अधिकार असंघटित क्षेत्रातल्या महिलाही मिळवू शकतील. किंबहुना त्यांना ते दिलेच जातील. ज्याप्रमाणे शहरीकरणाचा प्रभाव पडून ग्रामीण जनजीवन अधिक सुखकर होतंय...तसंच या गोष्टींच्या अधिकाराची गरज ओळखणं ग्रामीण स्त्री जीवनातही सुरु होईल...

जाता जाता इतकंच...की बायकांना सुट्टी द्यावी की नाही याबद्दल बायकांनी पुढाकार घेऊन बोलायला हवं. पुरुष बोलू शकतील पण त्यांना या वेदनेच्या झळा न बसल्यामुळे कदाचित ते फक्त 'बोलूच' शकतील...

मुळात यानिमित्ताने आपण याविषयी बोलू लागलो आणि चर्चा करु लागलो हे ही नसे थोडके. कारण शहरातही दुकानातून सॅनिटरी पॅड घेताना कागदात किंवा काळ्या पिशवीत बांधून दिले जातात. गावातल्या कित्येक मुलींना आजही सॅनिटरी नॅपकिन हा प्रकारही माहिती नसेल. त्यामुळे आपण महिलांच्या मासिक पाळीला लपवून ठेवून कुठल्या थराला नेऊन ठेवलंय हे लक्षात येतच आहे.

आपली बाजू... आपलं म्हणणं.... मांडत महिला आतापर्यंत आल्या आहेत त्यामुळे पुन्हा त्यांना सुट्ट्या देऊन घरात बसवलं जातंय का ? हा प्रश्न ज्यांना विचारावासा वाटतो त्यांच्या बुद्धीतच खोट असल्याची शंका येते. कारण जिथे महिलांच्या सबलीकरणाविषयी जे लोक मोठ मोठ्या बाता मारु शकतात ते लोक महिलांच्या या शारीरिक वेदनेचं थोडंस दुःख समजून घेण्याचं सौजन्यही दाखवत नाहीत.

त्यामुळे महिला सक्षम आहेत... होत्या... असतीलचं...!त्यांच्यातल्या सहनशीलतेला कुठलाही पुरुष कधीच चॅलेंज करु शकणार नाही हे जरी खरं असलं तरीही आपल्या आईला, बहिणीला, बायकोला, मुलीला, मैत्रिणीला आयुष्यात आपल्याशी जोडल्या गेलेल्या कुठल्याही स्त्रीला तिच्या रजस्वाच्या काळात फार त्रास होणार नाही किंवा तिची होणारी चिडचिड, तिची मानसिकता समजून घेण्याचा किमान प्रयत्न जरी पुरुषांनी अंगीकारला तरीही महिलांना त्या काळात खूप मानसिक शांतता मिळू शकेल आणि त्यांचे महिन्यातले चिडचिडीचे ते दिवस काही क्षण निवांत आणि सुखात जाऊ शकतील....!
आणि मग म्हणता येऊ शकेल. HAVE A HAPPY PERIODS...!!!