आपल्याला ज्या गोष्टीचा , माणसांचा , वस्तूंचा सहवास अधिक मिळतो तसतसे आपण त्या गोष्टींच्या प्रेमात पडत जातो... आणि मग त्याशिवाय राहणं अवघड होऊन बसतं... अशीच गोष्ट आहे पुस्तकांची...! एक मोठं घर असावं... उत्तम फ्रेंच विंडो... त्याच्या बाजूला रेलून बसता येईल अशी खुर्ची आणि मागे संपूर्ण भिंत झाकून जाईल अस मोठ्ठं बुक शेल्फ...हे स्वप्न कित्येक दिवस मनात घर करून आहे...
ते प्रत्यक्षात कधी येईल माहिती नाही पण ते प्रत्यक्षात आल्यानंतर त्या बुक शेल्फ मध्ये कोणकोणती पुस्तकं ठेवायची याची भली मोठ्ठी लिस्ट तयार आहे आणि त्या लिस्ट मधली पुस्तकं जमवणंही सुरुय...
तर पुस्तकांशी ओळख कधी झाली ते नेमकं आठवत नाही पण त्यांच्याशी झालेली मैत्री कुठल्याच जन्मात तुटू शकणार नाही इतकं नक्की...!
मुळात सध्याचं आजूबाजूला घडणारं वातावरण बघून इतकं मनापासून वाटत राहातं की ह्या माणसांना पुस्तकांचा लळा नसावा. कारण, जो माणूस पुस्तक वाचतो तो माणूस कधीही दंगल घडवू शकत नाही...!
प्रचंड ठामपणे हे विधान करण्याचं कारण असं की पुस्तक ही गोष्ट आपल्याला जगवते... माणूस म्हणून घडवते... आणि आपली बुद्धिमत्ता प्रत्येक कसोटीच्या क्षणी तासून बघण्याची कुवत आपल्यात निर्माण करते. त्यामुळे पुस्तकांकडून आपण जर काही घेत असू तर सृजनाची निर्मिती करण्याची महत्वाची ताकद घेतो आणि जे लोक सृजनाच्या प्रेमात असतात त्यांना विध्वंस नामंजूर असतो.
कोणे एके काळी पुस्तकाचं बोट धरून मी या जगात आले... कधी वाढदिवसाला मिळालेलं गिफ्ट, कधी स्पर्धांमध्ये बक्षिस म्हणून मिळलेली पुस्तकं... कधी फक्त त्यांच्या कोऱ्या पानांचा गंध श्वासात भरून घ्यावा म्हणून तासनतास पुस्तकांच्या दुकानात रेंगाळत घालवलेले क्षण... आणि कधी कधी खिशात दमडीही नसताना, पुस्तक विकत घेण्याची कुवत नसताना, पुस्तकांना सॉरी म्हणून घरी परतणारी उदास पावलं... या सगळ्या क्षणांची साक्षीदार फक्त पुस्तकं आहेत...
कुणीही सोबत करू शकणार नाही... कुणीही समजावू शकणार नाही इतकं या पुस्तकांनी समजावलंय... आपल्याला नेमकं काहितरी वाटत असताना, त्याच ओळी जेव्हा आपण वाचत असलेल्या पुस्तकात कोरलेल्या असतात तेव्हा , "आईशप्पथ ह्यातही हेच लिहिलंय..." ही भावना मनस्वी आनंद देते...
मग गौरी देशपांडेच्या 'आहे ते असं आहे' मध्ये तिने साकारलेल्या प्रेयसीच्या असंख्य छटा असोत किंवा मग संजय आवटेंनी सांगितलेला 'ओबामाचा सक्सेसफुल पासवर्ड' असो...
प्रवीण दवणेंनी जाणीव करून दिलेलं 'वादळ विजांचं वय' असो किंवा मग सुरेश भटांच्या 'एल्गार' मधून मनाच्या खपल्या काढण्याची खुमखुमी असो...
कुसुमाग्रजांच्या 'विशाखा' पासून ते पाडगावकरांच्या 'बोलगाण्यांपर्यंत' सगळं झपाटून वाचून घ्यावं...
पुस्तकांच्या पानांवरची अक्षरं आपल्याशी संवाद साधायला लागली की आपण रसिक म्हणूनही अधिकाधिक समृद्ध होतो...
पुस्तकं वाचत असताना बऱ्याचदा ते लिहिणाऱ्या हातांना म्हणजेच लेखकांना भेटण्याची प्रचंड तीव्रतेने इच्छा व्हायची. 'झोंबी' वाचताना पुस्तकाच्या मागे असणारा आनंद यादवांचा फोटो शंभरदा पाहिला.
योगायोगाने रुईयातून नाटक करताना झोंबी पुस्तकाची एकांकिका करायचं ठरलं आणि आनंद यादवांना त्यांच्या पुढ्यात बसून ऐकता आलं.
अरुणा ढेरेंचं 'कृष्णकिनारा' म्हणजेएक फॅन्टसी आहे... कुशीत घेऊन झोपावं असं पुस्तक... या पुस्तकातली राधा , कृष्ण, कुंती, द्रौपदी ही पात्र आपल्याला वेड लावतात.
मल्लिका अमरशेख यांचं 'मला उध्वस्त व्हायचंय' हे आत्मचरित्र डोक्याला अक्षरशः मुंग्या आणतं...
राजन खान त्यांच्या टोकदार लिखाणातून जगण्यातलं प्रचंड वास्तव ते डोळ्यांसमोर उभं करतात तर ग्रेस त्यांच्या प्रत्येक ओळीतून विश्वातलं दुःख पाझरत जातो.
असे कित्येक लेखक... पुस्तकं... कादंबऱ्या, कविता, नाटक सगळं सगळं फक्त वाचत राहावंसं वाटतं...
आपण जितकं वाचत जाऊ तितकी ही पुस्तकं आपल्याला आणखी जवळ घेतात. समृद्ध करतात. जगण्याचं समाधान आणि बळ देतात.
पुस्तक हीच केवळ एकमेकांना देण्याची गोष्टय असंही वाटतं...!
सध्याच्या किंडलच्या आणि ऑनलाईनच्या जमान्यात आपण खूप सुखी आणि इन्स्टंट वाचक झालेलो असलो तरीही पुस्तकांचा स्पर्श आणि गंध वाचकाने अनुभवायलाच हवा...
अब्जावधी विषय... अब्जावधी शब्द... अब्जावधी पुस्तकं... यांची निर्मिती पुन्हा पुन्हा घडत राहो...
पुस्तकांच्या जोरावर प्रत्येक माणूस घडत राहो...
याच आजच्या पुस्तक दिनी शुभेच्छा...!!!
- यामिनी दळवी.
ब्लॉग : हवाहवासा जोडीदार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Apr 2018 02:06 PM (IST)
आपल्याला ज्या गोष्टीचा , माणसांचा , वस्तूंचा सहवास अधिक मिळतो तसतसे आपण त्या गोष्टींच्या प्रेमात पडत जातो... आणि मग त्याशिवाय राहणं अवघड होऊन बसतं... अशीच गोष्ट आहे पुस्तकांची...!
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -