BLOG : महायुतीचा महाविजय झाला. काही दिवसांच्या दिरंगाईनं का होईना भव्य शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. अवघी एका मंत्र्यांची जागा आता शिल्लक राहिलीय. एवढं सर्व झालं तरी महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये महाविजयाचा महाजल्लोष मात्र दिसत नाही, दिसतेय ती नाराजीच. असं का? याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्यासाठी सध्याच्या घडामोडींचा वेध घ्यावा लागेल…
यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीनं 230 जागा जिंकत छप्परफाड जागा मिळवल्या. यामध्ये भाजप 132 , शिंदेंची शिवसेना 57 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 41 इतके आमदार निवडून आले. त्यात पुन्हा भर पडली ती जनसुराज्य, युवा स्वाभिमानसारख्या छोट्या पक्षांच्या आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याची. महाविजयानंतर आता सत्तेचे लाभार्थी नेमकं कोण ठरतंय असाही मुद्दा आहे.
भाजपनं एकट्यानं 132 जागा मिळवल्यामुळे आता भाजपला मित्रपक्षांची गरजच उरलेली नाहीय का असाही मुद्दा आहे. याची कल्पना मित्रपक्षांपैकी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना आहेच. दादांनी तर आपण कायमचे ‘उप’च हे मान्य केल्यासारखा भाजपनं मागण्याआधीच आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करून 2014च्या काकांच्या भूमिकेची पुनरावृत्ती केली. तेव्हा मोठ्या पवारांच्या त्या पॉवरगेमने ठाकरे तोट्यात गेले. तर आता धाकट्या पवारांमुळे शिंदेंना फटका बसला.
अजित पवारांच्या पाठिंब्याने भाजपचं बळ 173 वर पोहचलं. साथीला अपक्ष, छोटे पक्ष होतेच. बहुमताचा 145 चा आकडा ओलांडून खूप पुढे गेलेल्या भाजपला पाठिंबा देण्याशिवाय शिंदेंनाही पर्याय नव्हता. सुरुवातीला शिंदेंनी ताणून धरलं तरी ते नंतर शपथविधीत सहभागी झाले. मुख्यचे उप झाले. शपथविधी झाला. मंत्रिमंडळ विस्तारात भाजप 19 , शिंदेंची शिवसेना 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार 9 मंत्रीपदं देण्यात आली.
अर्थातच सर्वाधिक मंत्रिपदंही भाजपच्या वाट्याला गेली.
एकूणच केवळ मुख्यमंत्रीपदच नाही तर राज्याच्या सत्तेचं नियंत्रणही भाजपकडेच आणि त्यातही फडणवीसांकडेच असल्याचं दिसून आलं. पण एवढं सर्व होत असताना एक प्रश्न मात्र सर्वांनाच सतावतोय. महाविजय झाला, पण महायुतीकडून महाराष्ट्रभर महाजल्लोष काही झालेला दिसला नाही. असं का? उलट नाराजीचंच नाट्य सध्या ठिकठिकाणी दिसून येतंय. ही नाराजी भीतीतून आलेली आहे का असाही प्रश्न आहे.
शिंदेंच्या शिवसेनेतील नेते अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर, विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे यांचे चेहरे पडले. मराठवाड्यातील धाराशिवचे तानाजी सावंतांनी तर बॅग भरली. ते अधिवेशन सोडून निघून गेले. सिल्लोडचे अब्दुल सत्तार नाराज झाले. जालन्याच्या अर्जुन खोतकरांनाही मंत्रिपदानं हुलकावणी दिली. तर प्रकाश सुर्वे आणि विजय शिवतारे यांनी उघडपणे आपली नाराजी एबीपी माझाच्या कॅमेऱ्यासमोर बोलून दाखवलीय.
या नेत्यांच्या नाराजीचा परिणाम हा पक्षसंघटनेवर होणार हे उघड आहेच. कोकणातील नेते दीपक केसरकर जरी ‘श्रद्धा आणि सबुरी’ म्हणत असले तरीही “मी कुठे कमी पडलो याचं आत्मपरीक्षण करावं लागेल” असं त्यांनी म्हटल्यामुळे त्यांची नाराजीही लपून राहिलेली नाही. भाजप सध्या कोकणात मजबूत झालेली दिसत असल्यानं हे चित्र भविष्यात शिंदेंच्या शिवसेनेला किती परवडणार हा प्रश्न आहे. त्यातच भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांना जर भाजपचं प्रदेशाध्यक्षपद दिलं तर कोकणात भाजपच्या कमळाला अधिक बहर येईल आणि शिवसेनेचा धनुष्यबाण अधिक बोथट होण्याची भीती त्या पक्षाच्या समर्थकांना भेडसावतेय.
आणखी एक महत्वाचा विषय तो म्हणजे मुंबईतल्या मंत्रिपदांचा. मुंबईत दोन मंत्रीपदं देण्यात आलीत. शहरात मंगलप्रभात लोढा, उपनगरांमध्ये आशिष शेलार. दोन्ही भाजपाचे मातब्बर नेते. शिंदेंच्या शिवसेनेचा मात्र मंत्रीच नाही. त्यामुळे आगामी मुंबई महानगर पालिकांच्या निवडणुकांच्या वेळी शहरामध्ये लोढांसारखा मातब्बर आणि उपनगरामध्ये शेलारांसारखा आक्रमक नेता भाजपकडे असेल. तर शिंदेंकडे मात्र मनपाच्या सामन्यासाठी तितकं प्रभावी नेतृत्व मुंबईत असणार नाही.
ठाणे जिल्हा जो शिंदेंचा बालेकिल्ला तिथं 3 मंत्रीपदं. एक स्वत: एकनाथ शिंदेंकडे आणि दुसरं प्रताप सरनाईकांकडे तर तिसरं त्याच्या जवळच्याच नवी मुंबईत भाजपनं गणेश नाईकांना मंत्रीपद दिलं. हेच नाईक शिंदेंचे कडवट विरोधक मानले जातात. केवळ आगरी समाजच नाही तर तिथल्या सामान्य मतदारांवरही नाईकांची चांगली पकड आहे. त्या पलिकडच्या मतदारसंघातील डोंबिवलीचे रविंद्र नाईक हेही याच जिल्ह्यातले. त्यामुळे एकूणच ठाणे जिल्ह्याचाही विचार केला तर इथेही आता भाजपचं बळ हे अधिक दिसून येतंय. तर पालघरमध्ये शिंदेंचा एक आमदार आहे, मात्र जिल्ह्याला मंत्रीपद नाही.
पुढचा मुद्दा आहे विधानपरिषदेच्या सभापती पदासंदर्भातला. या पदासाठी एकनाथ शिंदे आधीपासूनच आग्रही होते. मात्र भाजपनं विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी राम शिंदेंना संधी दिली. शिंदेंकडे निलम गोऱ्हेंसारख्या उपसभापतीपदाचा आणि नेतृत्वाचा अनुभव असणाऱ्या नेत्या असतानाही भाजपनं तेही पद पटकावलं. शिंदेंच्या शिवसेनेला तिथंही मनावर दगड ठेवावा लागला.
महायुतीतला दुसरा मित्र पक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्येही सत्ताप्राप्तीच्यानंतर आनंद कमी आणि राग, चिडचिडच अधिक दिसतेय. त्यातलच मोठं नाव म्हणजे छगन भुजबळ. निवडणुकांच्यावेळी तिकीट देण्यापासून ते मंत्रिपदापासून दूर ठेवण्यापर्यंत अजित दादांच्या राष्ट्रवादीत काय काय घडलं याचा पाढाच भुजबळांनी समता परिषदेच्या चर्चेच्या वेळी केलेल्या भाषणातून वाचला आणि योग्य वेळ आल्यावर निर्णय घेणार असं सांगत राष्ट्रवादीच्या गोटात धाकधूक वाढवली. लागलीच आता अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे भुजबळांची भेट घेणार असल्याच्याही बातम्या समोर आल्या. दुसरीकडे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवलं गेलं.
गेल्या दोन दिवसांपासून हिवाळी अधिवेशनाला दांडी मारणारे अजितदादा हे तिसऱ्या दिवशीच्या कामकाजासाठी अवतरले. अजित दादांवर जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा ते अज्ञातवासात जातात. पण इतकं यश मिळालं, उपमुख्यमंत्रीपद मिळालं, सत्ता मिळाली तरीही अजित दादांवर अज्ञातवासात जायची वेळ येतेयामध्येच अनेक गोष्टी दडलेल्या दिसतात आणि अनेक अर्थ काढता येतात, असं जाणकार सांगतात.
सर्वाधिक 132 आमदार निवडून आलेल्या भाजपमध्येही नाराजीच दिसतेय. पण भाजपमधली नाराजी ही इतर दोन मित्र पक्षांच्या नेत्यांमधल्या नाराजीच्या तुलनेत जराशी स़ॉफ्ट आहे. भाजपचे नेते संजय कुटे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर दोन दिवसांनी आपली नाराजी एक्सवर पोस्ट करून व्यक्त केली.पण तेही संघशिस्तीतच. मात्र त्यातही त्यांनी मी कधीही कुटनीती वापरणार नाही असा उल्लेख केलाच. तर दुसरीकडे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही आपली नाराजी सर्वात आधी एबीपी माझावर बोलून दाखवली.
आपल्याला मंत्रिपद मिळणार हे सांगितलेलं होतं मात्र त्यानंतर काय घडलं आपल्याला माहित नाही.मला फोन आला नाही असं मुनगंटीवारांनी म्हटलंय. त्यामुळे त्यांनीही संघाची शिस्त पाळलेली दिसते. एकूणच काय नाराजी असली तरी ती मित्रपक्षांएवढी उघड आणि सध्या तरी जास्त बाधकही नाही.
त्याचवेळी एकनाथ शिंदेंची शिवसेना असो की अजित पवारांची राष्ट्रवादी, महायुतीतील मित्रपक्षांची अवस्था ही सत्तालाभ साजरा करण्यापेक्षाही जे मिळेल ते गमगुमान गोड मानण्याची सक्ती असल्यासारखी दिसते. त्याचं आणखी एक कारण म्हणजे महाराष्ट्रात नवे महाचाणक्य म्हणून ज्यांचा गौरव केला जातो त्या देवेंद्र फडणवीसांचा नवा दोस्ताना.
मंगळवारी फडणवीसांना त्यांचे जुने मित्र उद्धव ठाकरे भेटले. दोघांची दिलखुलास भेट मित्रपक्षांच्या पोटात गोळा आणणारी असेल. जणू त्या भेटीतून दोघांनीही आपापल्या मित्रांना अप्रत्यक्षरीत्या संकेत दिलेयत. विसरू नका, आमच्याकडेही पर्याय आहेत. 137 वाल्या भाजपाला ठाकरेंचे 20 आमदार मिळाले तर बहुमताची गरज भागते, तर हिंदुत्व विसरल्याचा आरोप झाल्यानं विधानसभेत फटका खाल्लेल्या ठाकरेंनाही एक दिलासा.
एकूणच काय तर एक भेट, अनेक लक्ष्य साधणारी ठरली. त्यातून निर्माण झालेली अस्वस्थता एकनाथ शिंदेंच्या बोलण्यातून व्यक्तही झाली. यांना भेट, त्यांना भेट, आता तर थेट भेट...!!! थोडक्यात महाविजयानतरही मित्र पक्षांना आनंदापेक्षा पुढे काय घडेल याचं टेन्शनच जास्त दिसतंय. निवडणुकीचा निकाल लागला असला तरी राजकारणात पुढे काय घडेल ते एक्झिट पोलसारखंच कुणीही नक्की सांगू शकत नाहीय...हेच खरं!