92 सामने, 434 विकेट, 3129 धावा, 5 शतके अन् 13 अर्धशतके... ही अचंबित करणारी आकडेवारी आहे आर. अश्विनची..... जागतिक दर्जाच्या या अष्टपैलू खेळाडूला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले नाही...  रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकला पण पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाने निर्विवाद वर्चस्व गाजवले... त्यानंतर प्रत्येक भारतीय क्रीडा प्रेमीला आर. अश्विनची आठवण आली..  त्याला कारणही तसेच आहे.. अश्विनच्या फिरकीपुढे डाव्या हाताचे फलंदाज फारकाळ टिकाव धरत नाही.. ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ डावखुऱ्या फलंदाजांनी सजलाय.. असे असताना रोहित शर्माने आर. अश्विनला संघाबाहेर ठेवले. इंग्लंडमधील खेळपट्टी वेगवान माऱ्याला मदत करते, हे कारण देत अश्विनचा पत्ता कट झाला. पण मुळात अश्विनसारख्या दिग्गज गोलंदाजाला खेळपट्टी कधीच थांबवू शकत नाही, कोणत्याही खेळपट्टीवर प्रभावी मारा करण्याचे लकब अश्विनकडे आहे.. मग असे असताना अश्विनला बाहेर बसवत रोहित शर्माने आपल्याच पायावर दगड मारलाय का?  


रिकी पाँटिंग, सुनील गावस्कर, आकाश चोप्रा, सौरव गांगुली यांच्यासह अनेक माजी दिग्गजांनाही रोहित शर्माचा हा निर्णय पटला नाही. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यानेही अश्विनला संघाबाहेर ठेवल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलेय. सामना पुढे सरकल्यानंतर ओव्हलची खेळपट्टी फिरकीला मदत करु शकते. ऑस्ट्रेलियाच्या संघात अनेक डाव्या हाताचे फलंदाज आहेत, जे अश्विनची शिकार झाले असते.. अश्विनला बाहेर बसवणे ही भारताची सर्वात मोठी चूक ठरू शकते, असे स्पष्ट शब्दात पाँटिंगने सांगितलेय.  अश्विन सारख्या गोलंदाजाला खेळवण्यासाठी तुम्ही खेळपट्टी पाहू शकत नाही, असे म्हणत सुनील गावसकर यांनीही नाराजी व्यक्त केली. 


ट्रेविस हेड या डाव्या हाताच्या फलंदाजाने टीम इंडियाची गोलंदाजी फोडून काढली. स्मिथ याने संयमी फलंदाजी करत एक बाजू सांभाळली. चिवट फलंदाजी करणारा स्मिथ अश्विनच्या फिरकीपुढे ढेपाळतो हे अनेकदा दिसलेय. दोन वर्षांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या सर्कलमध्ये अश्विन याने भारताकडून सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. अश्विनने 13 सामन्यात 61 विकेट घेतल्या आहेत.  जाडेजा आणि अश्विन या जोडीने प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडला होता. अश्विन याने ऑस्ट्रेलियात आपली प्रतिभा दाखवून दिली आहे. 400 पेक्षा जास्त विकेट घेतल्या असतानाही अश्विन याला पुन्हा स्वत: ला सिद्ध करावे लागत असेल तर याहून वाईट बाब नाही. तळाला खंबीरपणे फलंदाजी ही त्याची जमेची बाजू आहे. अश्विन सारख्या अनुभवी खेळाडू संघाबाहेर ठेवण्याची किंमत भारताला मोजावू लागू शकते. 2021 मध्ये विराट कोहलीने जी चूक केली.. तीच चूक रोहित शर्माने केली आहे. विराट कोहलीनेही इंग्लंडमध्ये अश्विनला प्लेईंग 11 मध्ये खेळवले नाही. इंग्लंडमध्ये झालेल्या मागील सहा कसोटी सामन्यात अश्विन संघाबाहेर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये अश्विनने चार विकेट घेतल्या होत्या.  असे असतानाही रोहित शर्माने अश्विनला खेळवले नाही.. त्याला याबाबत विचारलेही... रोहित शर्मा म्हणाला की, 'अश्विन हा मॅचविनर आहे यात वादच नाही आणि वर्षानुवर्षे तो आम्हाला सामने जिंकून देत आहे. पण आम्हाला संघाच्या गरजा लक्षात ठेवाव्या लागतात. त्यानुसार आम्हाला अश्विनला संघात घेता आले नाही.' पण अश्विनसारख्या गोलंदाजासाठी खेळपट्टी महत्वाची नाही. अश्विन कोणत्याही खेळपट्टीवर विकेट घेऊ शकतो, हे नाकारु शकत नाही. 


ओव्हलची खेळपट्टी फिरकीला पोषक असल्याचे अनेक रिपोर्ट्सनुसार समोर आलेय. ओव्हलच्या खेळपट्टीवर चेंडू वळू लागला, तर उसळीदेखील घेईल. त्यामुळे भारतीय संघाने दोन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरायला हवे होते.  ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना फिरकीचा सामना करणे कठीण जाते.. खासकरुन भारतीय फिरकी गोलंदाजीसमोर फलंदाज चाचपडताना पाहिलेय. असे असतानाही जगातील आघाडीच्या फिरकी गोलंदाजाला संघाबाहेर बसवण्यात आलेय. ही चूक रोहित शर्माला महागात पडू नये, म्हणजे झालं. अश्विन सारख्या क्लास वन खेळाडूला बाहेर बसवण्याचा निर्णय योग्य की अयोग्य... हे येत्या तीन दिवसात कळेलच शेवटी फक्त एकच गोष्ट, दहा वर्षांचा चषकाचा दुष्काळ संपावा म्हणजे झाले.