शाळेच्या कौलात विणलेला गवताचा मजबूत खोपा तुम्हाला आठवतो का? अंगणात वाळत घातलेल्या धान्यावर हळूच सगळ्यांचा डोळा चूकवून दाणे चोरणारी चिमणी तुम्ही शेवटची कधी बघितली. आपल्या शाळेच्या पुस्तकातली लाडकी चिऊताई कुठे हरवली? याचा विचार आपल्या डोक्यात येतंच नाही. जंगल तोडून उभ्या राहिलेल्या काँक्रिटच्या इमारतींवर ती बिचारी चिमणी कुठे राहणार? हल्ली तिला घर उरलंच नाही. हळूहळू ती सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे. ती संपली तर तुम्हा आम्हालाही संपण्यासाठी फार अवकाश शिल्लक नाहीय असं समजून चला. आज २० मार्च २०२०; ११वा आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस. यानिमित्तानं चिमण्यांना वाचवण्याचा संकल्प करूया.
चिमणी नसेल तर काय फरक पडतो असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही एका फार मोठ्या भ्रमात आहात. ज्या चीनमधून कोरोना जगात पोहोचला त्या चीनमधल्या कम्युनिस्ट विचाराच्या हुकुमशहानंही असा उद्दामपणा केला. आणि त्यामुळे अडीच कोटी चीनी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.
सन १९५८ चीनमधला कम्युनिस्ट हुकूमशाह माओ जेडोंग यानं चिमण्यांना संपवण्यासाठी मोहीम हाती घेतली. बिचाऱ्या गरीब असहाय्य चिमणीन्याच्या लुसलुशीत देहाचे खच जेडोंगनं पाडले. अर्थात चीनी माणसाचीही त्याला साथ होतीच. चीनी लोकं काहीही खातात हे आपल्याला माहितीय. त्यामुळे चिमणी मारण्यात चीनी माणसाला काहीही गैर वाटलं नाही. या लोकांची माथी भडकवली हुकूमशाह माओ जेडोंगनं..
1958 साली four pests campaign जेडोंगनं सुरू केलं. ज्यामध्ये मच्छर, माशी, उंदीर आणि चिमणी यांना चीनमधून संपवण्याचा त्यानं फतवा काढला. मच्छरांमुळे मलेरिया, माशांमुळे कॉलरा, उंदरांमुळे प्लेग होतो म्हणून त्यांना संपवण्याचा माओ जेडोंगनं चंग बांधला. मात्र बिचाऱ्या चिमणीनं काय केलं?
चिमण्या अन्नधान्याचा साठा संपवतात, शेतकऱ्यांचं पीक चिमण्या खातात असं जेडोंगला वाटत होतं. त्यामुळे या चौघानाही संपवण्याचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आला. मच्छर, माशी, उंदीर मुळातच चपळ असतात त्यांनी आपले प्राण वाचवले. पण बिचारी चिमणी कुठे जाणार? परिणामस्वरूप मेलेल्या चिमण्यांचे खच रस्त्यावर पडू लागले.
माओ जेडोंगच्या तथाकथीत क्रांतीकारकांनी हे अभियान पेटवलं. चीनी लोकही चिमण्यांना तडपवून मारण्यात असुरी आनंद घेऊ लागले. लोक भांडी, लोखंडी पत्रे, ड्रम, वाद्य वाजवून चिमण्यांचा झाडावर स्वस्थपणे बसू देत नव्हते. चिमणी मुळातच शक्तीहिन प्राणी. सतत उडत राहिल्यानं चिमणी धाडकन जमिनीवर कोसळायची. त्यात तिचा जीव गेला तर ठीक, नाही गेला तर लोक त्यांना हाल हाल करून मारायचे. चिमणी ही जमात नष्ट करायची म्हणून चिमण्यांच्या खोप्यांना आग लावली जायची. अंडी फोडली जायची. चिमण्याचे जीव जगात येण्याआधीच संपवले जायचे.
जो व्यक्ती सर्वाधिक चिमण्या मारेल त्याला बक्षीस दिलं जायचं. शाळा कॉलेजात चिमण्या मारणाऱ्यांचा सत्कार केला जायचा. four pests campaign अशा पद्धतीनं राबवलं गेलं की लोकांना चिमण्या मारताना अजिबातच दया येत नव्हती.
झालं... चीनमध्ये चिमण्या जवळपास नामशेष झाल्या. पण त्याचे भयंकर परिणाम पुढच्या दोन वर्षात दिसून आले. चिमण्या मुठभर धान्य खातही असतील. पण सोबतच त्या पिकांवरचे किडे सुद्धा खायच्या. त्यामुळे पीक वाचायचं. मुठभर धान्य खाणारी चिमणी पोतभर धान्य वाचवत होती हे कळण्यासाठी चीनी लोकांना दोन वर्ष लागली.
सन १९६० मध्ये मोठ्या प्रमाणवर पिकांवर किड्यांचा प्रादुर्भाव झाला. किडरोग वाढले आणि त्यामुळे पीकांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटलं. किड्यांना संपवण्यासाठी विषारी औषधांचा वापर वाढवला गेला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटत गेलं. त्यामुळे चीनमध्ये दुष्काळ पडला. लोकांना अन्नधान्य मिळणं कठीण झालं. जे नको व्हायला तेच झालं, भुकेमुळे, उपाशीपोटी, कुपोषणामुळे चीनमधल्या अडीच कोटी लोकांचा मृत्यू झाला. १९६० साली चीनची लोकसंख्या जवळपास ६६ कोटी होती. त्यापैकी अडीच कोटी लोकांचा मृत्यू होणं. किती भयानक असेल याची कल्पनाही करवत नाही.
चीनी हुकूमशाह माओ जेडोंगला आपली चूक कळली. त्यानं Four Pests Campaign मधून चिमणीला हटवलं. त्याऐवजी ढेकणं मारा असा आदेश त्यानं दिला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यामुळे चीनला सोव्हिएत रशियाकडून चिमण्या आयात कराव्या लागल्या.
चीनच्या या मूर्खपणातून आपण काही शिकलो असं वाटत नाही. कारण भारतातही चिमण्यांची स्थिती चिंताजनक आहे. कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) आकडेवारीनुसार केरळ, गुजरात, राजस्थानमध्ये चिमण्यांची संख्या २० टक्क्यांनी घटली आहे. आंध्र-तेलंगणामध्ये चिमण्यांचं प्रमाण ८० टक्के घटलंय. किनारपट्टीच्या भागात हे प्रमाण ७० ते ८० टक्क्यांनी खाली आलंय. मोठ्या शहरांमध्ये हल्ली चिमणी अभावानंच दिसते. शेतीमध्ये रसायनीक खतांचा वापर आणि विषारी फवारणीमुळे किड्यांचं प्रमाण कमी झालंय. त्यामुळे चिमण्यांना अन्न मिळणं दुरापास्त झालंय. त्यात मानवाची वाढती लोकसंख्या पाहता जंगलं नष्ट होत आहेत. शहरातल्या गगनचुंबी इमारती आणि दूरसंचार क्रांतीमुळे जागोजागी अगदी खेड्या पाड्यातही उभारलेल्या मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे चिमण्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय. केमिकल कंपन्यांच्या नळकांड्यांमधूून बाहेर पडणारा धूर चिमण्यांच्या जीवावर बेततोय. मकर सक्रांतीला पतंगाच्या मांज्यात अडकून शेकडो चिमण्या पक्षी मृत्यूमुखी पडतात. चिमण्यांच्या बाबतीत असं सांगितलं जातं की, एखाद्या चिमणीला माणसानं पकडलं आणि परत सोडलं, तर बाकीच्या चिमण्या त्या चिमणीला त्यांच्यामधे घेत नाहीत व चोचीने मारतात किंवा तिला बहिष्कृत करतात; प्रसंगी,जीव देखील घेतात. आपण हे थांबवू शकतो यातल्या काही गोष्टी निश्चितच टाळू शकतो.
आपण काय करु शकतो तर आपल्या घरात आणि मनात चिमण्यांसाठी छोटीशी जागा ठेऊच शकतो. घराच्या कोपऱ्यात चिमणीनं खोपा केला तर उध्वस्त करू नका. चिमण्यांना बाभळी, कन्हेर, कडुलिंबाचं झाड प्रिय असतं. या झाडांवर चिमण्यांचे खोपे असतात. विनंती आहे या झाडांना तोडू नका. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. उपाशी आणि पाण्याअभावी चिमण्यांचा मृत्यू होणं सर्वाधिक आहे. त्यामुळ आपल्या घराच्या खिडकीत मुठभर धान्य आणि पाण्याची कुंडी तर आपण ठेऊच शकतो. चिमण्यांसाठी मीठ आणि मिठाचे पदार्थ हानिकारक आहेत. त्यामुळे मीठ नसलेले पदार्थच ठेवावे.
जगभरात २० मार्च हा आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस साजरा करण्याचं प्रयोजनच मुळात जनजागृती आहे. चिमण्यांचं आपल्या आयुष्यातलं स्थान अढळ आहे. जर चिमण्यांचं अस्तित्व धोक्यात असेल तर मानवजातीचंही अस्तित्व धोक्यात आहे म्हणून समजा. येणाऱ्या पिढ्यांना चिमणीचं महत्व आपण समजावून सांगितलं पाहिजे. पाठ्यपुस्तकात त्याचा समावेश असायला हवा. नाहीतर येणारी पिढी चिमणीला गूगलवर शोधत बसेल.