प्रिय पोस्ट कार्ड,

साधारणत: आपल्या प्रियजनांना प्रिय लिहून त्याला आपल्या मनातलं गुज पोहोचवतात. मी तुलाच प्रिय म्हणतोय पत्र लिहिताना. कारण, तू कधी काळी आमच्या आयुष्याचा अविभाज्य भागच होतास. खरं तर तुझ्यावर उमटायची ती फक्त अक्षरं नसत, तो भावनांचा कोलाज असे अन् मनातला कल्लोळही. जो तुझ्यामार्फत इथून तिथे जायचा. आज जागतिक टपाल दिनानिमित्ताने म्हटलं, तुलाच पत्र लिहावं. म्हणून हा लेखनप्रपंच.

सध्या आम्ही ई-मेल, व्हॉट्सअॅपच्या युगात वावरतोय. अवघ्या काही सेकंदात आपला संदेश इथून तिथे पोहोचवतोय. आजच्या काळात खरं तर तू काहीसा विस्मृतीत गेलायस जणू. म्हणजे आता तुझं ते टिपिकल पिवळ्या रंगातलं दर्शन तसं दुर्मीळ झालंय, आमच्या पोस्टमन काकांसारखंच. तरीही मला तुझे सोनेरी दिवस आठवतात, म्हणजे जेव्हा तू संवादाचं प्रमुख माध्यम होतास. माझ्या लहानपणी तर माझ्या मामा आजोबांचं पत्र मला चांगलं लक्षात आहे. त्यातला मजकूर काळाच्या ओघात विस्मरणात गेलाय. पण, त्यांचं ते टपोऱ्या दाण्यासारखं, सुंदर वळणदार अक्षर. जणू त्यांच्याकडे साचा होता अक्षरांचा. ते तयार करुन तुझ्यावर छापायचे. ते हस्ताक्षर फक्त तुझ्यावर नव्हे तर माझ्या मनावर उमटलंय. जे कधीच पुसलं जाणार नाही.

तुझ्या येण्याची आम्ही तेव्हा खूप वाट पाहायचो. भेटीआधीची हुरहुर वगैरे म्हणतात, त्याच टाईप्स. तुझ्यामध्ये तो आपलेपणा होता, की व्यक्ती जणू तुम्हाला मिठी मारून किंवा तुमच्या शेजारी बसून आपल्याशी संवाद साधतेय, असं वाटायचं. कधी कधी तर एखाद्या सिनेमात जसं दाखवतात, तसा पत्रात तो चेहराही दिसायचा. पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीला जणू भेटून यायचो आम्ही त्याच्याच घरी जाऊन.

आणखी एक तुझंच भावंडं म्हणजे आकाशी रंगाचं आंतरदेशीय पत्र, फोल्ड होणारं. त्याची घडी कुठे फाडायची याची पण एक नॅक असायची. कुठूनही फाडलं तर मजकूर वाचता येणार नाही हे निश्चित.

तुझ्याकडून कधी आनंदवार्ता यायची तर, कधी मनाला रुखरुख लावणारी, व्यथित करणारी बातमीही. कधी परीक्षेचा रिझल्टही कळायचा. तर कधी कुणाच्या तरी घरी नव्याने आगमन झालेल्या पाहुण्याबद्दल समजायचं. अनेक भावभावना तुझ्या एकाच रुपातून आमच्यापर्यंत पोहोचायच्या. त्यात पोस्टमन काकांशीही तुझ्यामुळे निर्माण झालेलं एक नातं. म्हणजे लिफ्ट नसलेल्या मोठमोठ्या इमारतींमध्ये पत्र घेऊन पोहोचवणारे पोस्टमन काका. अविरतपणे चालणारे, न थकता. त्यांचा तो टिपिकल खाकी ड्रेस, खांद्याला ती त्यांची नेहमीची खाकी रंग असलेलीच बॅग, त्यातून प्रत्येक पत्र अगदी अचूक पत्त्यावर पोहोचवण्याच्या त्यांच्या कौशल्याला मनापासून नमस्कार. मला यावेळी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं गाणं आठवतं. डाकियाँ डाक लाया....खुशी का पयाम कही.... कही दर्दनाक लाया.....

तुझ्यावर चिकटवण्यात येणारे निरनिराळे स्टॅम्प्स जमवणं हाही एक छंद. कोऱ्या पोस्ट कार्डचा तो वास आजही नाकात घुमतोय, नव्हे दरवळतोय. जसजसा काळ पुढे सरकला तसा तू तुझ्या विविध भावंडांसह कधी लुप्त झालास ते कळलंही नाही. म्हणजे ई-मेल, व्हॉट्सअॅप हे तुझंच आधुनिक रुपडं. याने कम्युनिकेशन स्पीड वाढलाय, हे निश्चित. जो आजच्या फास्ट लाईफमध्ये आवश्यकही आहे. तरीही हाताने लिहिलेल्या पत्राची सर याला नाही. आपल्या बोटातून पत्रावर आकार घेणारी अक्षरं, ही शाईत नव्हे तर आपल्या भावनांमध्ये ओथंबलेली असतात. त्यातला आपलेपणा काही औरच. अर्थात ‘शो मस्ट गो ऑन’ या उक्तीप्रमाणे पुढे जावंच लागतं. आधुनिक माध्यमांना आपलंस केलं असलं तरीही तुझी अनुपस्थिती जाणवते. आणि पोस्टमन काकांचीही, कारण ते पत्र टाकून गेल्यावर घरातल्या फळीत किंवा जमिनीवरच ते पत्र आपण हातात घेऊन वाचण्यात एक वेगळीच गोडी आहे. आज हे सगळं लिहिताना मी तो बालपणीचा काळ जगून पुन्हा आजच्या काळात आलोय. मगाशी म्हटल्याप्रमाणे तुझ्यावरील अक्षरांचा मनात दरवळणारा सुगंध तुझ्या आताच्या काळात सोबत नसण्याची रुखरुखही सांगेल आणि तुझ्या तेव्हाच्या अस्तित्त्वाची गोड आठवणही.

तुझाच चाहता,

अश्विन