नागपूर : कोरोना महामारीचा परिणाम हा आर्थिक आणि सामाजिक असा पडला आहे. कोरोना माहामारीचा ताण हा आरोग्यव्यवस्था आणि वैदकीय क्षेत्रावर सर्वाधिक पडताना आपल्याला दिसला. मात्र, यामुळेच लॉकडाऊनमध्ये अवयवदानाच्या प्रक्रियेलाही ब्रेक लागला. आज 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशात अवयवदानाची आकडेवारी खूप कमी आहे, प्रत्येक 10 लाख लोकांमागे फक्त 0.1% लोक अवयवदानासाठी पुढे येत आहेत. गरज मात्र मोठी आहे. यामुळे दरवर्षी लाखो लोक अवयवाचा प्रतीक्षेत तडफडत जीव सोडत आहेत. आज जागतिक अवयवदान दिवस असून यात वैद्यकीय क्षेत्राबरोबर जनसामान्यांमध्ये जनजागृती होणेही तेवढेच गरजेचे आहे. तरच जमिनीत पुरले जाणारे आणि अग्निच्या स्वाधीन होणारे शरीरातील अवयव जीवनदान देऊ शकतील अशी भूमिका अवयवदानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची आहे.


आजच्या काळात जीवनमान पाहता, खान पान, स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. परिणामी, जिथे काही लोक आरोग्याच्या दृष्टीने जागरूक झालेत, तिथेच काही लोक जास्त बिनधास्त होताना दिसत आहेत. वाईट सवयी, उशिरा झोप, मानसिक त्रास या सर्वामुळे शरीर आजाराला बळी पडते. अवयव निकामी होतात. काही अवयव हे निकामी झाले, तर बदलता येतात. पण काही अवयव बदलणे किंवा त्यासाठी डोनर मिळणे हे सोपे नाही. बरेचदा घरचीच माणसे अवयवदानासाठी पुढे येतात. पण अनेकदा कधी ब्लड ग्रुप, कधी वय, कधी मधुमेहासारखे अनुवंशिक आजारामुळे कुटुंबातील व्यक्ती अवयवदानास अपात्र ठरतात. यामुळे पर्यायी डोनर शोधावे लागतात.


किंग्सवे हॉस्पिटलचे किडनी रोग तज्ञ, डॉक्टर शिवनारायण आचार्य ह्यांनी सांगितले कि, "कोरोनाच्या माहामारीमुळे अवयवदानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या काळात शस्त्रक्रिया करू नये असे शासन पातळीवर तसेच वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे होते. त्यामुळे अवयवदानासाठी डोनर मिळाले नाही. सगळ्यांचे लक्ष कोरोनाग्रस्तांचे जीव वाचवण्याकडे होते. ह्याचा अवयवदानाला फटका बसला. ह्या काळात धोकाही जास्त होता. रुग्णाची रोगप्रतिकारक शक्तीही कमी असते आणि अश्यात जर कोरोनाची लागण झाली तर जीव जाण्याचाही धोका जास्त होता. शस्त्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतर लागणारा ऑक्सिजनचा तुटवडा हा तांत्रिक अडचणींचा भाग होता. साधं सोपं सांगायचे झाल्यास यात अनेक धोके तसेच असतात आणि एकंदरीतच हा काळ अवयव प्रत्यारोप झालेल्या व्यक्तीसाठी अडचणीचा होता."  


आजच्या काळात वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकांचे अवयव निकामी होताना दिसून येतात. प्रामुख्याने यात शुगर, म्हणजेच मधुमेहसारखे आजार आहेत. पण कोरोनाच्या काळात काही ब्रेन-डेड व्यक्ती हे अवयव दान करण्यास पुढे आले. यामुळे त्या शस्त्रक्रिया करून काहीशा लोकांना जीवदान मिळू शकले आहे. विशेष म्हणजे एक ब्रेन-डेड व्यक्ती हा सात ते आठ लोकांना जीवनदान देऊ शकतो. परिस्थितीनुसार ही संख्या कमी अधिक होऊ शकते. साधारण दोन किडनी, एक लिव्हर, हार्ट, दोन डोळे, कॉर्निया हे प्रमुख अवयव आहेत, ज्यांची गरज अनेकांना आहे. पण यात महत्वाचे म्हणजे किडनी निकामी होण्याचे प्रमाण मधुमेहसारख्या आजरामुळे मागील काळात वाढले आहे. यात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार 2 लाख 50 हजार लोकांना किडनीची गरज आहे. पण प्रत्यक्षात केवळ 5 हजार प्रत्यारोपण वर्षभरात होत आहेत. या दोन आकड्यातील तफावत ही मोठी आणि दुर्दैवी आहे. जवळपास 5 लाखापेक्षा अधिक लोक अवयवांच्या प्रतीक्षेत जीव गमावतात हे वास्तव फार भयानक आहे. 


महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत कौतुकास्पद काम होत आहे. यात सर्वाधिक काम सध्याच्या घडीला मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद या चार विभागीय अवयव प्रवत्यारोपन समित्या करत आहे. यामुळे साल 2019 मध्ये 160 ब्रेन-डेड लोकांच्या अवयवदानातून 450 पेक्षा अधिक लोकांचे जीव वाचू शकले आहे. यापेक्षा मोठे दुसरे कुठलेही दान होऊ शकत नाही, असे मत जहांगीर हॉस्पिटल पुणे येथील किडनी रोग तज्ञ डॉ. सुनील जवळे यांनी व्यक्त केले आहे. डॉक्टर जवळे ह्यांनी अवयवदानाचे महत्व किती आहे हे 26 वर्षाचा उच्चशिक्षित तरुणाचे उदाहरण देत सांगितले. ते म्हणाले, "ह्या तरुणाची किडनी निकामी झाली होती. उपचारादरम्यान प्रकृती इतकी गंभीर झाली कि त्याचे हृदय बंद पडले. जीव वाचेल की नाही अशी शंका असताना त्याच्या आईने त्याला किडनी दिली. ह्या घटनेला आज सहा महिने झाले. तो तरुण ठणठणीत आहे. हे उदाहरण लक्षात ठेवले पाहिजे. अवयवदानासाठी लोकांनी पुढे आले पाहिजे. किमान इतरांचा जीव वाचवण्यासाठी तरी यावे." 


आजच्या घडीला बदलती जीवनशैलीसुद्धा अवयवदानाला पूरक नाही. संयुक्त कुटुंब लहान झाले. परिणामी घरातून सुद्धा ऑर्गन डोनेशन आता कठीण झाले आहे. यात लोकांचा गैरसमज, अंधश्रद्धा, अवयवदानाबाबत अज्ञान अशी अनेक कारणं आहेत. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन होता, अपघात कमी होते आणि ब्रेनडेड लोक हि कमी होते. कमी अपघात झाले हे जरी सुदैव असले, तरीही डॉक्टर शिवनारायण आचार्य म्हणतात कि ह्याचा परिणाम मात्र ऑर्गन डोनेशनवर नकारात्मक झाला. त्यानी उपराजधानी नागपूर इथे एका महिन्याचा अभ्यास केला. त्यात जवळपास एका महिन्यात 157 लोकांचा अपघाती मृत्यू झाला. पण यापैकी एकही व्यक्तीचे अवयवदान होऊ शकले नाही. हे लोक जर पुढे आले असते, तर 300 पेक्षा अधिक लोकांना जीवदान मिळाले असते असे डॉक्टर शिवनारायण म्हणतात. यात जनजगृती कमी पडत आहे हे वास्तव आहे. पण सोबतच वैद्यकीय क्षेत्रातील मंडळीनी सुद्धा यात प्रयत्न वाढवणे गरजेचे आहे. पोलीस, डॉक्टर, कुटुंबातील नागरिक यांनी यात सहभाग घेतला तर तडफडत जीव जाणाऱ्या लोकांना जीवदान मिळेल असेही मत डॉ. शिवणारायन आचार्य यांनी व्यक्त केले.


विभागीय प्रत्यारोपण समितीच्या माध्यमातून होणाऱ्या चांगल्या कामामुळे येत्या काळातील प्रतीक्षा यादी किडनी प्रत्यारोपणासाठी जवळपास 5 हजारची आहे.  लिव्हरसाठी १००० लोक प्रतीक्षेत आहेत. पण हे नोंदणी झालेले रुग्ण आहेत. पण ज्यांची नोंद झालेली नाही, पण गरज आहे असा आकडा मोठा असल्याचे डॉक्टर सांगतात. इतर अवयव, जसे कि हृदय निकामी झालेले रुग्ण हे कुठेही नोंद होण्याआधीच मृत्यूच्या दारात लोटले जातात. यामुळे कठीण प्रसंगात कुटुंबीयांनी घेतलेले निर्णय जीवनदान देणारे ठरू शकतात. यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या सुजाता आष्टेकर यांनी केले.


अवयवदान हेच श्रेष्ठदान हा संदेश आज शासकीय पातळीवर दिला जात आहे. यात अवयव मिळत नसल्याने रुग्ण दगावण्याची संख्या पाहता, जी दरी, जी तफावत निर्माण झाली आहे, ती कमी करण्यासाठी जनजागृती करावी लागणार आहेच. पण लोकांनीसुद्धा या मोहिमेत सहभागी होऊन आपले योगदान देण्यासाठी एक मदतीचा हात पुढे करावा आणि अवयवदान चळवळ पुढे न्यावी ही अशाच आजच्या जागतिक अवयवदान दिनानिमित्ताने केल्या जाऊ शकते.