आज संपूर्ण जगात अवयवदान दिन साजरा होत असताना कोरोनाचे सावट गेल्यावर्षी आणि यावर्षीही कायम असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या अवयदान मोहिमेला कुठेतरी खीळ बसली आहे. विशेष करून भारतात गेल्या काही वर्षात या मोहिमेला बळ मिळण्यास प्रारंभ झाला होता. अजूनही मोठ्या प्रमाणात अवयदान जनजागृतीची गरज असताना थोड्या प्रमाणात का होईना या विषयावर बोलते झाले होते खूप मोठा पल्ला गाठणे बाकी असले तरी आशादायी सुरुवात झाली होती. मात्र, कोरोनाने 'खो' घातला आणि सर्व विश्वाच्या सोबतच भारताच्या या मोहिमेचे चित्र बदलून गेले. मात्र, या कोरोनामय वातावरणातही काही नागरिकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीचे अवयव मेंदूमृत पश्चात दान करून काही व्यक्ती ज्या अवयवाच्या प्रतीक्षेत होत्या त्यांना एक प्रकारे नवीन जीवनदान दिले.
अवयवदानाच्या या कार्यक्रमात देशाला मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी असून यासाठी फक्त शासन आणि प्रशासन यांनी काम करून चालणार नाही तर अवयवदान कार्यक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करावे लागणार आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेली ही चळवळ ज्यावेळी मोठी होईल त्यावेळी आपल्याकडे अनेकवर्षे खितपत वेदनामयी आयुष्य काढणाऱ्या अवयवांसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या रुग्णांचा आकडा निश्चितच नगण्य होईल. मात्र, या चळवळीला बळ देण्याचे काम आता या देशातील नागरिकांनाच द्यावे लागणार आहे.
जागतिक अवयवदान दिनाचा विचार केला तर भारतात मृत्यूपश्चात (ब्रेन स्टेम डेथ) अवयवदानाचे प्रमाण अतिशय कमी असून प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे 0.34 इतका आहे. स्टॅटिसटा या संकेतस्थाळानुसार हेच प्रमाण, 2019 मध्ये, स्पेन देशात 49.6, अमेरिकेत 36.1, पोर्तुगल 33.7, फ्रान्स 28.4, तर लंडन मध्ये हेच प्रमाण 24.7 इतके आहे. इतर देशाच्या तुलनेत सध्या जरी आपले प्रमाण कमी आहे. परंतु, आपण या विषयात व्यवस्थित काम केले तर आपल्या देशातील अवयवदानाचा आकडा वाढण्यास वेळ लागणार नाही. दरवर्षी लाखो रुग्णांना योग्यवेळी अवयव न मिळाल्यामुळे देशात जीव गमवावा लागत आहे. देशातील सर्व राज्यातील आरोग्य यंत्रणांनी एकत्र येऊन या विषयावर काम करावे लागणार तर भारत देशातील अवयवदानाचा आकडा वाढण्यास मदत होऊ शकते. अवयवदानाच्या बाबतीत आपल्या देशात व्यस्त प्रमाण पाहायला मिळते. अवयवदान फार कमी प्रमाणात होत असून अवयव लागणाऱ्या रुग्णांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास वर्षाला दीड लाख रुग्ण हे अपघातात मृत्यू पावतात त्यापैकी 50 टक्क्यापेक्षा अधिक लोक हे मेंदू मृत होऊन दगावतात, या व्यक्ती ह्या अवयवदानाकरिता पात्र असतात. त्यांच्यामुळे अवयवांच्या प्रतीक्षायादीत असणाऱ्या रुग्णांना नवीन जीवनदान मिळू शकते. मात्र, त्या रुग्णांच्या नातेवाईकांना समुपदेशन करणे, रुग्ण मेंदूमृत झाला असून याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांना माहिती शास्त्रीय दृष्ट्या समजेल अशा सोप्या भाषेत सांगणे या गोष्टी करण्याची गरज आहे. सरकारी रुग्णालयात खरे तर अवयवदान मोठ्या प्रमाणात होणे अपेक्षित आहे मात्र इतर आजाराच्या रुग्णांचा व्यवस्थेवर विशेष ताण असल्याने या विशेष कामाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. कारण अवयवदान करून घेणे ह्या प्रक्रियेला मोठा वेळ द्यावा लागतो. मात्र, ह्या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहे.
भारत देशात आरोग्य क्षेत्रात अनेक बदल होत असताना आपल्याकडे आज बहुतांश सर्वच आजरावर उपचार पद्धती विकसित करण्यात आली असून दुर्मिळ आणि महत्त्वाच्या सर्वच शस्त्रक्रिया होत आहेत. मात्र, ज्यावेळी एखाद्या अवयव निकामी झालेल्या व्यक्तीवर उपचार करायचे असतील तर त्यासाठी सध्या तरी कुठली सोय नाही. त्याकरिता त्या व्यक्तीला त्या अवयवाचे प्रत्यारोपण करणेच अपेक्षित असते अजूनतरी अवयवाला कुठलाही पर्याय उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे अवयवदानाचे महत्त्व अधिकच अधोरेखित झाले असून त्याकरिता मोठी जनजागृतीची गरज आहे. शासनाचा आरोग्य विभाग, सामाजिक आणि सेवाभावी संस्था आणि काही व्यक्ती या मोहिमेचा प्रचार करत आहेत. मात्र, हे प्रयत्न अपुरे पडत असून सामाजिक माध्यमांचा योग्य वापर करून घरोघरी या मोहिमेबद्दल माहिती पोहचविण्याचे काम करणे गरजेचे आहे. देश स्वातंत्र्य दिनाचे 75 वर्ष साजरे करत असताना आजही नागरिकांच्या मनात अवयवदानाबद्दल बरेच गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. या जुनाट रूढी परंपरामुळे अनेकवेळा अवयवदान मोहिमेत बाधा आल्याच्या काही घटना आहेत. या करीत सर्वच जाती धर्मातील धर्मगुरूंनी एकत्र येऊन नागरिकांमध्ये अवयवदानाची जनजागृती करून त्यांना अवयवदानाचे महत्तव पटवून दिले पाहिजे.
मेंदूमृत अवयवदान म्हणजे जीवनदान. गेल्या काही वर्षात अवयवदान मोहिमेने महाराष्ट्रात चांगलाच जोर धरला होता त्याकरिता 2019 साली केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रायलतर्फे अवयवदानामध्ये महाराष्ट्र राज्याला ‘उत्कृष्ट राज्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2019 साली सुमारे 160 मेंदूमृत अवयवदान पार पडले होते, त्यामुळे 445 पेक्षा अधिक रुग्णांना नवीन जीवन मिळाले होते. जो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा होता. राज्याचे देशपातळीवर कौतुक करण्यात आले होते. गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता जास्त असतानाच नेमका कोरोनाचा प्रादुर्भाव अख्या देशात झाला आणि या सामाजिक मोहिमेला एक प्रकारची खीळ बसली. मेंदूमृत अवयवदानामुळे अनेकांना नवीन आयुष्य मिळण्यास मदत होत असते. शेकडोच्या संख्येने राज्यात रुग्ण अवयव मिळण्यासाठी प्रतीक्षायादीवर नाव नोंद करून अवयव मिळण्याची वाट बघत आहे. त्यांच्या आयुष्यात नवीन बदल घडवायचा असेल किंवा आयुष्य सुखकर करायचे असेल तर या अवयवदान मोहिमेला बळ मिळणे गरजेचे आहे. प्रतीक्षा यादीवरील प्रत्येक रुग्ण असह्य वेदना सहन करत एक-एक दिवस व्यथित करत आहेत. त्या रुग्णाच्या वेदना आणि त्यांची परिस्थिती शब्दात मांडता येणार नाही.
आपल्या देशात आणि राज्यात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, 1994 अंतर्गत अवयव प्रत्यारोपण केले जाते. कालांतराने या कायद्यात अधिक बदल करून 2014 साली काही सुधारणा करण्यात आल्या. अवयवदानाबद्दल यापूर्वी भरपूर लिहिले गेले आहे. याबाबत थोडक्यात या लेखातून माहिती देण्याचा प्रयत्न करूया. आपल्याकडे मेंदूमृत अवयवदानामध्ये ह्रदय, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, त्वचा, डोळे, फुफ्फुसे आणि आतडे देखील दान केले जाते. यामध्ये त्वचेचा वापर गंभीररित्या भाजलेल्या व्यक्तीमध्ये करता येतो. अन्य अवयवाचे त्या रुग्णाच्या गरजेनुसार त्या रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करता येते. ज्या रुग्णांचा एखादा अवयव कायमचा निकामी होतो आणि औषध उपचारानेही बरा होत नाही. त्यावेळी त्याला अवयव प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यावेळी त्या रुग्णाच्याच नात्यातील निरोगी व्यक्तीचा अवयव घेऊन रुग्णाच्या शरीरात त्या अवयवाचे प्रत्यारोपण केले जाते. त्याकरिता रक्तगट मॅचिंग होणे गरजेचे असते. जिवंत व्यक्ती जवळच्या नातेवाईकाला अशा पद्धतीने अवयव देऊ शकतात. फक्त मूत्रपिंड आणि यकृत याच अवयवाचे जिवंतपणी दान करता येते. या व्यतिरिक्त जे अवयव दान करता येते त्याला मेंदूमृत अवयवदान असे म्हणतात.
सगळ्यात जास्त अवयव मेंदूमृत अवयवदाना मार्फत केले जातात. एक मेंदूमृत व्यक्ती 7-8 व्यक्तींना नवीन आयुष्य देते. मेंदूमृत प्रक्रियेत रुग्णाचा मेंदू मृत स्वरूपात असून बाकीचे सर्व अवयव व्हेंटीलेटरच्या साहाय्याने कार्यरत असतात. रस्त्यांवरील अपघात, मेंदूत अतिरक्तस्राव आणि अन्य कोणत्या कारणांमुळे मेंदूचे कार्य थांबते आणि तो रुग्ण व्हेंटिलेटर असेल तर त्याच्या नातेवाईकाच्या संमतीने त्या व्यक्तीचे अवयवदान करता येते. याकरीता रुग्णालयातील समुपदेशक रुग्णाच्या संबंधित नातेवाईकांशी बोलून अवयवदान यासंदर्भातील सविस्तर माहिती देतो. त्या रुग्णाच्या नातेवाईकाने एकदा का समंती दिली कि मग अवयवदानाची प्रक्रियेस सुरुवात होते. विशेष म्हणजे पूर्वी हाताचे सुद्धा प्रत्यारोपण होऊ शकते आणि हा अवयव दान होऊ शकतो या बद्दल फारशी माहिती नव्हती. मात्र 2014 साली रेल्वे अपघातात मोनिका मोरे या तरुणीने दोन्ही हात गमावले होते. या तरुणीवर गेल्यावर्षी हाताचे प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया मुंबई येथील ग्लोबल रुग्णालयात झाली आणि ती यशस्वीही झाली. त्यामुळे हात गमावलेल्या अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या
आपल्याकडे राज्यात अवयवांच्या नियमनाकरिता मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा चार विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती कार्यरत आहेत. या समिती मार्फत ज्या रुग्णांना अवयव पाहिजे आहे, त्यांचे नोंदणीकरण केले जाते. ही समिती मेंदूमृत व्यक्तीचे अवयव आणि गरजू रुग्णांमध्ये समन्वयाचे काम पाहत असते. गेल्या काही वर्षात या समित्या उत्तमरीत्या आपले काम करीत आहेत. तसेच काही रूग्णांच्या बाबतीत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाची परवानगी आवश्यक असते, ती प्रकरणे त्यांच्या समंतीने पुढे जातात. या व्यतिरिक्त आपल्या राज्यात काही वर्षांपूर्वीच अवयव दानासंदर्भात राज्यस्तरावर समन्वय साधणारी, अवयदान आणि त्या संदर्भातील कामावर देखरेख करणारी राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेची केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रायलतर्फे स्थापना करण्यात आली आहे.
ज्या व्यक्तींना अवयव हवे आहेत, त्या व्यक्ती चातकाच्या पक्षाप्रमाणे या अवयव मिळण्याची वाट पाहत असतात. मुंबई विभागाचे उदाहरण घेतले तर त्याची दाहकता आपल्या लक्षात येईल, सध्याच्या घडीला मुंबईची अवयवाच्या अनुषंगाने रुग्णांची असणारी प्रतीक्षा यादी, किडनी - 3325, यकृत - 328, लहान आतडे - 7, स्वादुपिंड - 12, हृदय - 28, फुफ्फुस - 9, हृदय आणि फुफ्फुस - 6 आणि हात - 5 ह्या सर्व रुग्णांना अवयव मिळण्याची वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय नाही. या रुग्णांना जर चांगले आयुष्य जगायचे असतील तर त्यांच्यासाठी या देशातील सर्वच नागरिकांना या अवयवदानच्या चळवळीत खारीचा वाटा उचलून या मोहिमेविषयी सतत बोलते राहणे गरजेचे आहे.