आज 22 एप्रिल म्हणजेच जागतिक वसुंधरा दिवस, यानिमित्तानं आपल्या पृथ्वीची निर्मीती कशी झाली हे जाणून घेऊया. आपली पृथ्वी ब्रह्मांडातील सर्वात सुंदर ग्रह आहे. आपली पृथ्वी ही  Milkey Way  नावाच्या आकाशगंगेत आहे.  संशोधनानुसार आपल्या सूर्यमालेतील ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवर जीवनाला पोषक असं वातावरण आहे.


 आपली ही पृथ्वी कशी तयार झाली?


या न संपणाऱ्या अनंत अशा ब्रह्मांडामध्ये आपल्या पृथ्वीचं अस्तित्व कसं निर्माण झालं ?  पृथ्वीवर पाणी, हवा यांची निर्मीती कशी झाली? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. तर चला जाणून घेऊया आपल्या पृथ्वीची निर्मिती प्रक्रिया.. धूळ आणि वायू यांपासून बनलेल्या चक्राकार ढगापासून आपल्या पृथ्वीची सुरुवात होते. पृथ्वीच्या त्या सुरुवातीच्या युगास आरकीअन असं म्हटलं जातं.


4.5 अब्ज वर्षापूर्वी


 सुमारे 4.5 अब्ज वर्ष अगोदर आपली पृथ्वी ही विविध वायूंचा गोळा, जो सतत जळत आहे अशा स्वरुपाची होती. आजप्रमाणे झाडे-झुडपे, माती, ऑक्सिजन, पाणी असं काहीही आपल्या पृथ्वीवर अस्तित्वात नव्हते. त्यावेळी पृथ्वीचं तापमान हे  जास्त होते. आपली पृथ्वी ही एका लाव्हाच्या गोळ्यासारखी होती. आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग खवळलेल्या लाव्हाने झाकला गेला होत. पृथ्वीचं तापमान 1200 डिग्री सेल्सीअस इतक होतं. पृथ्वीवर सतत लघुग्रहांचा मारा होत होता ज्यामुळे पृथ्वीवर खवळत्या लाव्हाच्या नद्यांची निर्मिती होत होती.


चंद्राची निर्मिती


काळानुसार आपल्या पृथ्वीवरील वातावरणात वेगाने बदल होत होते. पृथ्वीचं स्वरुप प्रचंड वेगाने बदलत होतं आणि अचानक अचानक थिया नावाच्या ग्रहाने आपल्या पृथ्वीला धडक दिली, आणि आपल्या पृथ्वीचे दोन तुकडे झाले.  त्या दुसऱ्या तुकड्याला आपण आज चंद्र म्हणतो.  त्यावेळी चंद्र हा आपल्या पृथ्वीला खूप जवळ होता. पृथ्वीप्रमाणे चंद्रावरही लाव्हाच्या नद्या वाहत होत्या. 30 हजार वर्षांनी आकाशगंगेतील गॅस जायंट्स त्याच्या ऑरबीटमध्ये बदल करतात. आणि त्यामुळे चंद्राला आज आपण पाहतो ते डाग पडलेत. या सिद्धांताला 'द लेट हेवी बंबारमेंट' असं म्हटलं जातं. त्यावेळी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असल्या कारणामुळे त्याचा गुरुत्वाकर्षण प्रभाव पृथ्वीवर टाकत होता. त्यावेळी पृथ्वीवरील एक दिवस हा 24 तासांचा नाही तर सहा तासांचा होत होता. काही काळाने चंद्र हा आपल्या पृथ्वीच्या दूर जात गेला. आणि हळूहळू आपल्या पृथ्वीवरील लाव्हाच्या नद्याही काळानूरुप शांत झाल्यात.


 पृथ्वीवर पाण्याचे आगमन


काळानुसार पृथ्वीवरील लाव्हाच्या नद्या शांत होत गेल्या आणि हळू हळू पृथ्वीचा पृष्ठभाग तयार झाला. त्यावेळी पृथ्वीच्या वातावरणात फक्त एकच वायू अस्तित्वात होता. आणि तो म्हणजे मिथेन. द लेट हेवी बॉमबारमेंट थेअरीनुसार पृथ्वीवर त्यावेळी सतत लघुग्रह आणि उल्कापिंडांचा वर्षाव  होत होता. त्यांनी त्यांच्यासोबत पाण्याचे परिवहन केले. जसं जसं आपल्या पृथ्वीच तापमान कमी होत गेलं पृथ्वीवर पाणी साचत गेलं.त्यानंतर काही काळ आपल्या पृथ्वीवर पूर्णपणे पाण्याचं साम्राज्य होत.


 पृथ्वीवर जीवनाची सुरुवात


या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला सुमारे 3.8 अब्ज वर्ष मागे जावं लागेल. लघुग्रहांच्या माऱ्यामुळे पृथ्वीवर फक्त पाण्याचेच परिवहन झाले नाही तर त्यासोबत अनेक प्रकारचे मिनरल, कार्बन, प्रोटीन,अमिनो अॅसीड आणि  वायू पृथ्वीवर आलेत. त्याकाळी संपूर्ण पृथ्वीवर पाणी होते. लघुग्रहांसोबत आलेल्या कार्बन आणि प्रोटीन यांच्यात खोल पाण्यात अभिक्रिया झाली. आणि  त्यातून पहिल्या एककपेशीय जीवाची निर्मिती झाली. हे एकपेशीय जीव एक प्रकारचे बॅक्टेरीया होते.


 पृथ्वीवर ऑक्सिजन निर्मिती


करोडो वर्ष या बॅक्टेरीयांची विकासप्रक्रिया सुरु होती. संपूर्ण पाण्यामध्ये या बॅक्टेरीयाचं साम्राज्य निर्माण झालं होत. करोडो वर्षांच्या विकास प्रक्रियेनंतर या बॅक्टेरीयांचं रुपांतर स्टोमॅटोलाईट्स मध्ये झालं. सूर्यप्रकाशाचा वापर करुन हे स्टोमॅटोलाईट्स त्यांच अन्न बनवत असत. आज त्या प्रक्रियेला आपण प्रकाशसंश्लेशण (photosynthesis) म्हणतो. या प्रक्रियेत ते एका प्रकारचा वायू उत्सजीत करत होते आणि तो म्हणजे 'ऑक्सिजन' यानंतर पुढे दोन अब्ज वर्ष पृथ्वीवर ऑक्सिजनची पातळी वाढत राहीली. त्यानंतर


 1.5  अब्ज वर्षापूर्वी


 पृथ्वीवर अजूनही संपूर्ण पाणी आणि छोटे छोटे द्वीप यांच साम्राज्य आहे. पृथ्वीच्या क्रस्ट मध्ये अचानक बदल होऊन सर्व महाद्वीप एकमेकांना जोडले गेले. आणि एका सुपर कॉन्टिनेंटची निर्मिती झाली.  ज्याला 'रोडेनिया' म्हटल गेलं. यावेळी पृथ्वीचं तापमान 30 डिग्री सेल्सियस होत. पृथ्वीचा एक दिवस हा 18  तासांचा होता.


 75  कोटी  वर्ष अगोदर परिस्थिती बदलली, पृथ्वीवर मोठा धमाका झाला


आणि सुपर कॉन्टीनेंट रोडेनिया दोन भागात विभागला गेला. आणि शांत झालेला लाव्हा पृथ्वीच्या बाहेर आला. पृ्थ्वीवर पुन्हा तापमान वाढण्यास सुरुवात झाली. धमाक्यामुळे पृथ्वीवर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड आणि उष्णता यामुळे त्यावेळी पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात आम्ल वर्षा (अॅसीड रेन) झाली. आणि कार्बन डायऑक्साईडचे थर हे पृथ्वीवरील खडकांवर निर्माण झाले. या सर्व प्रक्रियेमुळे पृथ्वीवरील तापमान हे झपाट्याने कमी झालं आणि आपल्या पृथ्वीवर पहिल्या हिमयुगाची सुरुवात झाली. हे हिमयुग सर्वात जास्त वेळ राहणारं हिमयुग होत. हे हिमयुग संपल्यानंतर काही काळानं पृथ्वीवर अजून एक हिमयुग आलं.


पण या सर्व प्रक्रियेमध्ये आपण विसरलोचं की पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण होण्यास सुरुवात झालीय. आता आपण खोल पाण्याखाली पाहिलं तर त्या एकपेशीय जीवांचं रुपांतर अनेकपेशीय जीवांमध्ये झालयं. समुद्रात विविध विचित्र जीवासोबत समुद्री झुडुपांचं अस्तित्व निर्माण झालं होत. अॅनोमॅलोकॅरीस, पिकाया सारखे बहुपेशीय जीव निर्माण झाले होते.


 पिकाया


 पिकाया हा असा पहिला जीव होता ज्यात आपण मानवामध्ये असलेला स्पायनल कॉड म्हणजेच पाठीचा कणा होता. 46 कोटी वर्ष अगोदर आपली पृथ्वी ओळखण्यासारखी होती. पण अजूनही आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर झाडं, झुडूपं नव्हती. त्याला कारण म्हणजे सूर्याची अतिनील किरणे. काही काळानंतर पृथ्वीच्या वातावरणात बदल झालेत आणि ओझोनची निर्मीती झाली. ओझोनमुळे पृथ्वीभोवती एक कवच निर्माण झालं. त्यामुळे पुढे पृथ्वीवर झाडांच्या निर्मितीस पोषक असं वातावरण निर्माण झालं. आता पाण्यातील 'तिकतालीक' नावाच्या जलचरानं जमिनीवर येण्याचा निर्णय घेतला.


 दीड कोटी वर्षानंतर हा तिकतालीक विकसीत झाला आणि त्याला टेट्रापॉड असं म्हटलं गेलं. 36 कोटी वर्षाअगोदर हे टेट्रॉपॉड्स पूर्णपणे विकसीत झाले होते. आणि त्यांचेच रुपांतर पुढे महाकाय डायनॉसॉर्स आणि सस्तन प्राण्यांमध्ये होणार होते.
पृथ्वीच्या वातावरणात सतत बदल होत होते. त्यावेळी परत एकदा तापमान वाढले आणि पृथ्वीवर मोठा दुष्काळ पडला. या दृष्काळात पृथ्वीवरील 95 टक्के प्राणी आणि झाडं नष्ट झालीत. यावेळी काही प्रजातींनी जिवंत राहण्यासाठी जमिनीमध्ये राहायला सुरुवात केली.


20 कोटी वर्षानंतर.....


पृथ्वीच्या वातावरणात बदल होऊन पेन्जीयाची निर्मिती झाली होती. पृथ्वीवर पुन्हा एकदा नव्यानं झाडे उगायला सुरुवात झाली होती. पृथ्वीवर जिवंत राहिलेल्या  पाच टक्के प्रजातींचा विकास अतिशय जलद गतीनं झाला होता. आणि त्यांचं रुपांतर डायनासॉर्स मध्ये झालं होतं. आणि इथून आपल्या वसुंधरेवर एका नवीन पर्वाची सुरुवात झाली. यानंतर काही अब्ज वर्षांनी पृथ्वीवर मानवाचं अस्तित्व निर्माण झालं. आज 21 व्या शतकात आपण एक प्रगत विश्वात पाऊल ठेवलं आहे. आज ज्या वसुंधरेवर आपण राहतो, ज्यावर आपली निर्मिती झाली त्याच वसुंधरेला वाचविण्याची गरज निर्माण झाली आहे. या वसुंधरा दिवसानिमित्त आपल्या पर्यावरणाच्या वसुंधरेच्या रक्षणासाठी आपण वचनबद्ध असले पाहिजे