'गंगा' शुद्ध, निर्मळ, पवित्र.. कोण ही गंगा, काय आहे ही गंगा? ही गंगा म्हणजे नदी, गंगा मैया, जिच्यात डुबकी मारली की सर्व पापं धुतली जातात, असं म्हणतात. असं म्हणणारे आपणच. ज्या एका साध्या नदीला आपण आईप्रमाणे मानतो तिलाच आपण दूषितही करतो. हिमालयातल्या कुणा एका टोकातून उगम पावलेली ही गंगा...अवघ्या 80-90 किमी उगमस्थानापासून प्रदूषितही होते, इतकी ती नदी नव्हे तर एक नाला बनते. निर्मळ, पवित्र पाण्याला आई मानणारेही आपण आणि तिला दुर्गंधीयुक्त नाला बनवणारेही आपणच. हीच माणसाची जात! सोयीनुसार, आपल्या स्वार्थानुसार सर्व काही करण्याची. गंगेच्या वर्तमानाचं वास्तव सांगण्यामागचं एकच कारण ते म्हणजे मानवी विकृती, जिथे माणूस एका निर्मळ, नैसर्गिक देण असलेल्या नदीला नाला बनवू शकतो, तिथे हाडामासाच्या गंगेचीही विटंबना करु शकतो, हे वास्तव आहे.


निर्भया... प्रतिकार करणारी, निर्भीडपणे नराधमांचा सामना करणारी आणि अखेर आपला जीव सोडणारी... अजून किती निर्भयांचे जीव पाशवी विकृती घेणार आहे? अशा अमानवीय घटना समोर आल्या की मेणबत्ती हाती घ्यायची, मोर्चे काढायचे, संताप व्यक्त करणारे फलक झळकवायचे की झालं. लोकशाही आहे बोलण्याचं, वागण्याचं स्वातंत्र्यच आहे. पण म्हणून फक्त मोर्चे काढून विषय संपणार आहे का? घटना घडली की चर्चा सुरु होतात, सोशल मीडियावरही बरोबर, चुकीचं स्वयंघोषित कायदेपंडितांच्या ज्ञानाचं दर्शन घडतं. प्रत्येकाच्या भावनांचा आदरच, पण त्याचवेळी त्या पीडितेच्या जागी स्वत:ला ठेवून पाहा. अहो गर्दीतून परपुरुषाचा स्पर्श जरी झाला तरी तळपायाची आग मस्तकात जाते. दोन-तीन रात्र झोप येत नाही. तिथे त्या मुलीचे लचके तोडणाऱ्यांचा जर जीव गेला किंवा घेतला तर चुकलं कुठे? एक सामान्य महिला, आई म्हणून मला अभिमान आहे माझ्या देशातल्या, एका राज्यातल्या पोलिसांचा. हैदराबाद पोलिसांनी नराधमांचा फैसला 10 दिवसात केला. एन्काऊंटर स्पेशालिस्ट टीमच ती. कायद्यानुसारच त्यांनी सर्व काही केलं असणार. चौकशीची मागणी काहींनी केलीय, ती व्हावीच.

कायदा, न्यायव्यवस्थेवर विश्वास आहेच. मात्र पोलिसांच्या मलिन झालेल्या प्रतिमेवरचा डाग पुसण्याचा हैदराबाद पोलिसांनी केलेल्या प्रयत्नालाही पाठिंबा दिलाच पाहिजे. आतापर्यंत झालेल्या अत्याचारांच्या घटनांमध्ये पोलिसी कारवाई, व्यवस्थेतल्या फोलपणावर शिंतोडे उडवले गेलेत. सामान्यांचा हा संतापच, हाच आतापर्यंतचा अनुभव. हैदराबाद पोलिसांनी केलेलं एन्काऊंटर हा प्लॅन म्हणा किंवा नियतीचा खेळ. जिथे निर्भयाचा जीव घेतला गेला तिथेच त्या नराधमांचे मुडदे पडले.

एका निर्भयला न्याय ऑन द स्पॉट मिळाला. पण कोपर्डी, दिल्ली, उन्नाव, शक्तीमिलच्या निर्भयांना न्याय केव्हा मिळणार? ही तर समोर आलेली प्रकरण. आज प्रत्येक दिवसाला कित्येकींची अब्रू लुटली जातेय. तो आकडा समोर आला तर निर्मळ गंगेला नाला बनवून त्यात डुबकी लगावणाऱ्यांची किळस वाटू लागेल.

कायद्याकडे न्यायासाठी बोट दाखवताना विकृती थांबवण्यासाठी आपण काय पावलं उचलतोय याचा विचार आपण कधी करणार? संस्कार, मुलगा-मुलगी भेदभाव, सातच्या आत घरात, मुलींना स्वसंरक्षणाचे धडे, गुड टच बॅड टचचं प्रशिक्षण, पुरुषी मानसिकता, शाळेतलं सेक्स एज्युकेशन, मोबाईलचा वापर, सोशल मीडियायावर अनेकदा चर्चा होते. फलीत काय? मुलींनीच कसं वागावं, बोलावं याच्या बाता आजही मारल्या जातात. मैत्रिणींनो, बदल आपल्यापासूनच झाला पाहिजे. कुणी बाहेर चोरून काढलेली छायाचित्र, फोटोशॉपवर तयार केलेल्या विकृत प्रतिमा, मॉर्फ व्हिडीओंचा वापर करून ब्लॅकमेल करू पाहू शकतो तेव्हा घरच्यांचा विश्वास आवश्यक असतो. आपणही तो ठेवला पाहिजे. बाहेरच्या ब्लॅकमेलरची भीती घरच्यांच्या विश्वासाच्या बळावरच मात करता येऊ शकते. घरात परस्पर संवादातूनच हा विश्वास राहील. कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम करताना 'चलता है' स्वभाव सोडून द्या. रस्त्यावर लघुउद्योग चालवताना वासनांध नजरांना ओळखायला शिका. प्रवास करताना मोबाईलमध्ये डोकं घुपसून चालण्यापेक्षा अवतीभवती पाहा. घरात वावरताना कुणावरही अंधविश्वास ठेवू नका. गर्दीचा फायदा उचलून हात लावणाऱ्याला तिथेच अद्दल घडवा. काय घालावं, कसं बोलावं हे जसं आपण ठरवतो तसंच आपल्याशी समोरच्याने कसं वागावं हे आपल्या नजरेतून समोरच्याला कळलं पाहिजे, इतकं स्वत:ला सक्षम बनवण्याची आणि अलर्ट राहाण्याची वेळ आली आहे. संवाद, सतर्कतेतूनच आपण आपलं संरक्षण स्वत: करु शकतो.

हे कलयुग आहे. इथेही द्रौपदीचं वस्त्रहरण पाहणारे पांडव आहेत. त्यामुळे आपणच आपला कृष्ण केला पाहिजे. ती एक गंगा जी सर्वांची पापं पोटात घेते. मात्र ही हाडामांसाची गंगा पदरात हात घालणाऱ्यांना जन्माची अद्दल घडवू शकते. म्हणूनच म्हणते की आपल्याला आधार नको, आपल्यातच आधार बनण्याची ताकद आहे.