सद्गुरू: कुठल्या प्रकारचं अन्न खावं हे तुमचे त्याबद्दलचे विचार काय आहेत किंवा तुमची तत्त्व किंवा मूल्य काय सांगतात यावरून ठरू नये. तर तर तुम्ही तुमच्या शरीराला काय हवं आहे याकडे पाहिलं पाहिजे. अन्न हे शरीराबद्दल आहे. जेव्हा अन्नाचा विषय येतो, तेव्हा तुमच्या डॉक्टर किंवा आहारतज्ञांना विचारू नका, कारण त्यांची मतं दर पाच वर्षांनी बदलत राहतात. जेव्हा अन्नाचा विषय येतो, तेव्हा शरीर कुठल्या प्रकारच्या अन्नाने आनंदात राहतं ते पहा. वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नासोबत प्रयोग करा आणि पहा की ते अन्न खाल्ल्यानंतर तुमच्या शरीराला कसं वाटतं. जर शरीरात सुस्ती येत असेल आणि त्याला कॅफीन किंवा निकोटीन देऊन जागं करावं लागत असेल, याचा अर्थ शरीराला ते अन्न पसंत नाही.
जर तुम्ही शरीराचं म्हणणं लक्ष देऊन ऐकलं, तर ते तुम्हाला स्पष्टपणे सांगेल की कुठल्या प्रकारच्या अन्नाने त्याला बरं वाटतं. पण आत्ता सध्या, तुम्ही तुमच्या मनाचं ऐकत आहात. तुमचं मन तुमच्याशी सतत खोटं बोलत असतं. ते तुमच्याशी यापूर्वी खोटं बोललं आहे की नाही? आज ते तुम्हाला सांगतं की हे उत्तम आहे. उद्या त्या गोष्टीवर विश्वास ठेवल्याबद्दल तुम्हालाच मूर्ख ठरवतं. म्हणून मनाकडे लक्ष देऊ नका. तुम्ही शरीराचं म्हणणं ऐकायला शिकलं पाहिजे. अन्नाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने पहायचं झालं, तर नक्कीच शाकाहारी अन्न मांसाहारी अन्नापेक्षा तुमच्या यंत्रणेसाठी खूप चांगलं आहे. आपण याकडे नीतिमत्तेच्या नजरेतून पाहत नाही. आपण फक्त तुमच्या यंत्रणेसाठी काय योग्य आहे हे पहात आहोत. आपण ते अन्न खाण्याचा प्रयत्न करत आहोत ज्याने शरीर आरामात राहील. जे अन्न खाऊन शरीराला सर्वाधिक आराम मिळेल आणि त्याला त्यातून पोषक तत्त्व शोषून घ्यायला फार कष्ट पडणार नाहीत, अशा प्रकारचं अन्न आपण खाल्लं पाहिजे.
नुसता प्रयोग करून बघा की जेव्हा तुम्ही शाकाहारी अन्न, ते ताजं असताना खाता, तेव्हा त्यामुळे केवढा फरक पडतो. हेतू असा आहे की, शक्य तितकं जिवंत अन्न खायचं - असं काहीतरी जे त्याच्या जिवंत स्वरूपात खाता येईल. एका जिवंत पेशीमध्ये, जीवनाला पोषण देण्यासाठी सर्व काही असतं. जेव्हा आपण अन्न शिजवतो, तेव्हा त्यामधलं जीवन नष्ट करतो. जीवन नष्ट झाल्यानंतर ते अन्न खाल्ल्याने तुमच्या यंत्रणेला त्याच प्रमाणात जीवन उर्जा मिळत नाही. पण जेव्हा तुम्ही जिवंत अन्न खाता, तेव्हा एका वेगळ्या पातळीचा जिवंतपणा तुमच्यात येतो. जर तुम्ही निदान तीस ते चाळीस टक्के जिवंत अन्न तुमच्या आहारात आणलं - अशा गोष्टी ज्या जिवंत आहेत - तुम्ही पाहाल, की ते तुमच्या आतल्या जीवनाला खूप चांगल्या प्रकारे आधार देईल.
सर्वांत मुख्य म्हणजे, जे कुठलं अन्न खाता, ते जीवन असतं. आपण खात असलेलं अन्न म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं जीवन. इतर प्रकारचे जीव आपल्या जीवनाला आधार देण्यासाठी स्वतःच्या जीवनाचं बलिदान देत आहेत. आपल्या जीवनाला आधार देणाऱ्या त्या सर्व जीवांबद्दल आपण जर मनात अत्यंत कृतज्ञतेचा भाव ठेवून अन्न खाल्लं, तर अन्न तुमच्या आत खूप वेगळ्या प्रकारे कार्य करेल.
एक योगी, द्रष्टा, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरू हे भारतातील पहिल्या 50 अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सदगुरूंना भारत सरकारतर्फे 2017 मध्ये ‘पद्मविभूषण’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते 4 अब्ज लोकांपर्यंत पोहोचलेल्या कॉन्शस प्लॅनेट - सेव्ह सॉइल (माती वाचवा) या जगातील सर्वात मोठ्या लोकचळवळीचे संस्थापक देखील आहेत.
[वर दिलेली मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. एबीपी न्यूज ग्रुपने याशी सहमत असणे आवश्यक नाही. या लेखाशी संबंधित सर्व दावे किंवा आक्षेपांसाठी लेखक एकटाच जबाबदार आहे.]