शुक्रवारी बऱ्याच दिवसांनंतर बाजारात जरा हिरवळीचे वातावरण बघायला मिळाले. 21 दिवसांच्या मूविंग डे एवरेजपेक्षा बाजारवर ट्रेड करताना दिसला. येणारा आठवडा जरा सकारात्मक वातावरण घेऊन येईल असे काही टेक्निकल अॅनालिस्ट्सचे म्हणणे आहे. राजकीय घडामोडी शिगेला जरी पोहोचल्या असल्या तरी 2009, 2014 आणि 2019 च्या निवडणुकांपेक्षा ह्या वेळची परिस्थिती काहीशी वेगळी आहे असे जाणकार सांगतात. गुंतवणुकीचे वातावरण पोषक, दीर्घावधीची गुंतवणूक सरस अशी जरी चर्चा वारंवार होत असली तरी सामान्य गुंतवणूकदाराने बाजारात काय काय जोखीम आहे हे नक्कीच लक्षात घेतले पाहिजे. जोखमीच्या कारणांची मीमांसा आपण दोन भागात करूया. एक म्हणजे 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका. ह्याचे दीर्घावधीचे परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक हे बाजारावर पडू शकतात आणि ही एक धोक्याची घंटा असू शकते. दुसरे म्हणजे चीन आणि तैवान ह्यांच्यातील संघर्ष. अमेरिकेने तैवानशी हात मिळवणी केली तरी तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडल्याशिवाय राहणार नाही. तिसरे म्हणजे अमेरिकी फेडरल रिझर्वने व्याज दर वाढवणे. एकूणच त्यांच्याकडील कर्जाची आकडेवारी बघितली तर अजून काही खूप व्याजाचे दर वाढवले जातील असे सध्या तरी वाटत नाही आणि चौथे म्हणजे तेलाच्या किमती. त्यापण वाढू शकतात पण 150 डॉलर प्रती बॅरेल नंतर त्या साधारण कमी होतात असा इतिहास आहे. म्हणजेच काय पहिल्या दोन जोखीम अशा आहेत, त्यांचे भीषण पडसाद उमटू शकतात. अशात आपण आपली गुंतवणूक समंजसपणे केली तर ह्याचे धोके नक्की कमी होऊ शकतात. 


आता नेमकी गुंतवणूक समंजसपणे करणे म्हणजे काय? 


आपण मागील भागात गुंतवणूक करण्यासाठी कंपनी कशी शोधायची हे बघितले होते. आता आपण थेट एखाद्या कंपनीचे उदाहरण घेता येते का हे बघण्याचा प्रयत्न करूया. सामान्य जनता ही सुट्टीच्या दिवसात हमखास फिरायला जातात. आपल्या देशातील रेल्वेचे नेटवर्क हे सगळ्यात बिझी आणि मोठ्या नेटवर्कपैकी एक आहे आणि जे जरा व्यवस्थितशीर स्वभावाचे लोक असतात त्यांचे तिकीट बुकिंग वगैरे तर आधीच होऊन जाते. 13000 ट्रेन ह्या दररोज धावतात आणि जवळपास 40 लाख लोक हे दररोज प्रवास करत असतात आणि हे आकडे जर का असे असतील तर ट्रेन तिकीट काढण्यातूनच किती रेवेन्यू कमावला जात असेल आणि अशात IRCTC म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड ही एक मिनीरत्न कंपनी असून, केंद्र सरकार द्वारा केवळ ह्याच कंपनीकडे तिकीट काढण्याची अनुमती आहे. म्हणजे बिझिनेस मोनोपली आहे. त्यांचा व्यवसाय काय आहे, हेदेखील समजते. आठ कोटी पेक्षा जास्त ह्यांचे ग्राहक असून, वेगवेगळ्या सुविधा ही कंपनी पुरवते आहे.  रेल नीर ब्रँडच्या पाण्याचे पंधरा प्लांट या कंपनीकडे आहेत. अकरा बेस किचन्स आहे. बरेच झोनल ऑफिस, काही रिजनल ऑफिस असून, येणाऱ्या काही दिवसात अजून काही रेल नीरचे प्लांट हे टाकण्याच्या विचारात आहे. 1999 साली ही कंपनी अस्तित्वात आली असून, आता 24 वर्षे ही कंपनी कार्यरत आहे म्हणजे हीने अर्थचक्राचे जवळपास सगळे ऋतू बघितले आहे. ब्रँडमध्ये काही प्रश्न उद्भवतच नाही.  रेल्वेचे केंद्राचे बजेट हे 27 टक्क्यांनी वाढले असून, 400 नव्या वंदे भारत ट्रेन, डिजिटल पेमेंट, Per Capita मध्ये होणारी वाढ त्यामुळे लोकांची वाढणारी क्रय शक्ती हे सगळेच भविष्यात ह्या कंपनीला अधिक व्यवसायाच्या संधी देतील असे जाणकार सांगतात. म्हणजेच काय तर  क्वालिटेटीव अॅनालिसिस मध्ये ही कंपनी उजवी ठरते आहे. 


आता पुढे बघण्याचा प्रयत्न करूया क्वांटीटेटीव अॅनालिसिस मध्ये ही कंपनी जमेची ठरते की नाही. सगळ्यात पहिले ह्याची विक्री ही दर वर्षी 15 टक्क्याने वाढते आहे की नाही? तर मागील पाच वर्षाची सरासरी आपण बघितली तर ह्या कंपनीच्या सरासरी विक्रीची प्रगती ही 19 टक्के आहे. पहिली परीक्षा पास. आता पुढे बघूया की 19 टक्के विक्री वाढते आहे तर नफा सुद्धा ह्या कंपनीचा वाढतो आहे की नाही? आकडे बघितले तर असे लक्षात येईल, जिथे टॉप लाईन 19% ने वाढते आहे तिथे बॉटम लाईन म्हणजेच थेट नफा 19% च नाही तर पाच वर्षाच्या सरासरी आकड्यांनुसार 34% ने वाढतो आहे. ही एकदम जमेची बाब आहे. आता पुढे ह्या कंपनीवर कर्ज किती? तर असे लक्षात येईल एकूणच डेट टू इक्विटी हा रेश्यो 0.03% आहे म्हणजेच एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. एकूण मत्ते पेक्षा बरेच कमी कर्ज ह्या कंपनीने घेतले असून, उत्पन्नाचा फार कमी भाग  डेट सर्विसिंग साठी खर्च होतो आहे ही समभागधारकासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. रिटर्न ऑन इक्विटी 24% पेक्षा अधिक असावी तर ही 45% आहे. आता इंडस्ट्रीज पीइ आणि ह्या कंपनीचा पीइ हा समान स्तरावर असून, प्राईस टू बुक वाल्यू सुद्धा 22 आहे. हे जरा विचार करण्यासारखे संकेत असून बाकी गोष्टी ह्या एकदम सकारात्मक बाजूच्या आहेत. आज खरेदी करायची काय की नाही हे टेक्निकल अॅनालिसिस करून थेट कळू शकते. पण एकूणच दीर्घावधी साठी ही कंपनी पोर्टफोलिओ मध्ये राहू शकते असा अभ्यास तरी सध्या सांगतो आहे. 


मुळात आपण हे सगळे बघितले ते काही टीप नव्हते. आता लागलीच जाऊन IRCTC खरेदी करायला जाऊ नका. पण अॅनालिसिस करताना काय बघायचे आणि कसे बघायचे ह्याचा प्रत्यय यावा म्हणून केलेला हा प्रपंच. अश्यात ह्या महिन्यात संसदेने एक विशेष सत्र सुद्धा ह्याच महिन्यात बोलावले आहे. ह्या सगळ्याचा असर बाजारवर कसा पडतो हे बघणे महत्वाचे ठरेल. असे म्हणतात ह्या वेळेच्या राखीला चिनमधील राख्या ह्या बऱ्याच कमी प्रमाणात होत्या, मेक इन इंडिया मॅन्युफॅक्चरिंग सोबत लघु उत्पादनात सुद्धा जोर पकडत आहे हेच सत्य आहे. सणासुदीचे दिवस येतील, कपडे लत्ते, घर वस्तू खरेदी करालच पण चांगल्या कंपन्या शोधून त्यांची खरेदी सुद्धा ह्या सणासुदीच्या दिवसात करायचा विचार यंदाच्या हंगामात करायचा आहे. कमी झालेला पाऊस कदाचित महागाईला निमंत्रण देईल, पण आपण केलेला अभ्यास आणि त्यानुसार केलेली खरेदी ही दिर्घावधीत नक्कीच समृद्धीला निमंत्रण देईल हे नक्की. बघा पटतंय का?