कोविड-19 या विषाणूच्या आजाराने ज्यावेळी संपूर्ण जगात रुग्णांची वाढ होतेय, तर काही जणांचा या आजाराने दुर्दैवी मृत्यू होत आहे, अशा काळात नागरिकांचा प्रथम आपला जीव वाचवण्यावर भर असतो हे आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवला आणि यापूर्वी जी शिथिलता दिली होती ती कायम ठेवली आहे. तसेच ज्या ठिकाणी रुग्णसंख्यमुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये असं वाटतंय त्याठिकाणी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध कसे ठेवावेत याचे त्यांना अधिकार दिले आहेत. त्यामुळे काही अधिकारी रुग्णसंख्येला आळा घालण्याकरिता तात्पुरतं स्वरुप म्हणून 'टाळेबंदी'चं शस्त्र वापरत आहेत. शासनाने त्यांचं परिपत्रक काढून कोणत्या गोष्टी सुरू राहतील आणि कोणत्या सुरू राहणार नाहीत याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आल्या आहेत. साथीच्या या आजाराचं वर्तन भविष्यात कसं राहणार आहे, तो कशा पद्धतीने वाढू शकतो याची माहिती अद्याप कुणाकडेच नाही. काही तज्ज्ञांनी अनुमान व्यक्त केले आहे, मात्र यापूर्वी अनेकांनी व्यक्त केलेल्या अनुमानाचं काय झालं आहे हे आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे.
कोरोना या संसर्गजन्य आजाराची प्राथमिकतेने चर्चा ही शास्त्रीय दृष्टिकोनातून होणे गरजेचे आहे. हा आजार का वाढतोय? रुग्णसंख्या कशा पद्धतीने वाढतेय? औषधोपचाराशिवाय अन्य कोणत्या गोष्टी आहेत की त्याचा वापर केल्यावर हा आजार थोपविणे किंवा त्याला आळा घालणं शक्य आहे, यावर प्रामुख्याने चर्चा होणं गरजेचं आहे . शेवटी आजार म्हटलं म्हणजे नागरिकांच्या जीवन-मरणाशी प्रश्न निगडित आहे, त्याला हलक्यात घेऊन चालणार नाही. व्यवस्थेत दोष असतील तर ते दाखवून द्यावेच लागतील आणि जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत त्यावर हल्ला-बोल करत राहिलं पाहिजे या मध्ये कुणाचं दुमत नाही. मात्र सगळ्याच गोष्टी चुकीच्या सुरू आहेत आणि त्यामुळे खूपच गोंधळ उडाला आहे अशी ओरड करत बसणे कितपत योग्य आहे हे ज्याने त्याने ठरविलं पाहिजे. कोरोना आजाराचं आगमन आपल्या राज्यात होऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. अनेक नवीन गोष्टी प्रशासनाला शिकता आल्या आहेत. त्याचप्रमाणे विविध गोष्टींचा सामना करत आरोग्य यंत्रणा मार्ग काढत रुग्णांना बरं करण्यात यश मिळवत आहे. सगळ्यांसाठीच नव्या असणाऱ्या या संकटाला तोंड देताना चुका या होणारच आहेत, मात्र त्या चुकांवर मात करत त्या चुका पुन्हा-पुन्हा होणारच नाहीत याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रवी वानखेडकर, सांगतात की, "रुग्णांची वाढती लोकसंख्या आणि या आजाराचं वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या आजाराला पायबंद घालायचा असेल तर प्रशासनाने स्थानिक पातळीवर टाळेबंदी करावी, कारण यामुळे या आजराची साखळी तोडण्यास मदत होणार आहे. कारण टाळेबंदीमुळे रुग्ण संख्या नियंत्रित राहण्यास मदत होते हे जगजाहीर आहे. मात्र अशा पद्धतीने टाळेबंदी करताना त्यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वर भर देऊन रुग्ण शोधून काढून त्यांना तात्काळ उपचार दिले पाहिजेत. तसेच अलगीकरणाची आणि विलगीकरणाची व्यवस्थाही त्यांनी करणे अपेक्षित आहे. त्यामुळे सरसकट लॉकडाऊन ना करता स्थानिक पातळीवर गरज ओळखून असं पाऊल उचलणे ही काळाची गरज आहे."
साथीच्या आजाराचं शास्त्र समजून घ्यावं लागेल. कोरोना विषाणू पावसाळी वातावरणात आपलं कसं रूप दाखवतोय हे येणाऱ्या काळातच कळू शकेल. परंतु, शक्य तेवढे प्रतिबंधात्मक उपाय प्रशासनाने करून ठेवलेच पाहिजेत. टाळेबंदी करण्यात पालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱ्यांना रस नसतो. या प्रकारातून त्यांना जनतेच्या रोषालाच सामोरे जावे लागते तरीही टाळेबंदी करावी लागतेच. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर लॉकडाऊनमुळे घनदाट लोकवस्ती असणाऱ्या मुंबई शहराला नक्कीच फायदा झाला आहे. लॉकडाऊन केल्यामुळे बऱ्याच प्रमाणात रुग्ण आटोक्यात ठेवण्यात यश मिळाल्याचे सगळ्यांनीच बघितले आहे.लॉकडाऊन हा अनेक उपायांपैकी एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. अनेकांना लॉकडाऊन म्हणजे शिक्षा वाटत असली किंवा नोकरीवर जाणं महत्वाचं वाटत असलं तरी याबाबतीत शासन सगळ्या गोष्टींची शहानिशा करूनच निर्णय घेत असतं. सध्याच्या परिस्थितीत मुंबई शहर हे संपूर्ण देशामधील अपवादात्मक शहर आहे, सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू बघणारं हे शहर आहे. त्यामुळे इतर शहराचे नियम मुंबईला लागू होत नाहीत.
सध्या राज्यात एका ठिकाणाची परिस्थती आटोक्यात आणण्यात यश मिळवलं की दुसऱ्या ठिकाणी या आजाराचे नवे हॉटस्पॉट तयार होत आहे. त्यामुळे आता आभाळच फाटलंय तर ठिगळं कुठे-कुठे लावणार अशीच काहीशी परिस्थिती प्रशासनासमोर निर्माण झाली आहे. प्रशासनानेही ज्यावेळी नागरिकांना या आजाराच्या निमित्ताने काही सुख-सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत किंवा अजून देणार आहेत त्याच नियोजन शास्त्र शुद्ध पद्धतीने केले पाहिजे, नाहीतर नागरिक बोलणारच आणि टीकाही करणारच. राज्य शासनाने काहीशी शिथिलता नागरिकांना दिली आहे तर त्याचा नागरिक सुरक्षिततेचे नियम पाळून त्याचा वापर करणारच. कुणीही नियमाच्या बाहेर जाऊन एखादे कृत्य केले तर कारवाई होते, मात्र सध्याचा काळ लक्षात घेता सुवर्णमध्य काढत प्रत्येकानेच जबाबदारीने वागलं पाहिजे. रुग्णसंख्या कुणी मुद्दामहून वाढवत नाही किंवा कुणी मुद्दामहून हा आजार ओढवून घेत नाही, हे सगळयांनीच ध्यानात घेतले पाहिजे.