DLS अर्थात डकवर्थ लुईस...अवघ्या क्रिकेट जगतासाठी एक कोडंच...आता कोडं यासाठी कारण गेली अनेक वर्षे क्रिकेट सामन्यांत वापरण्यात येणारा हा नियम अजूनही अनेकांना नेमका कळालेला नाही... पावसामुळे व्यत्यय येणाऱ्या सामन्यांत डीएलएस मेथड वापरुन निकाल काढला जातो किंवा टार्गेट सेट केलं जातं... तर हा नियम नेमका काय? कुठून सुरुवात झाली आणि याबद्दलची रंजक माहिती जाणून घेऊ...


तर सर्वात आधी डीएलएसचा फुलफॉर्म म्हणजे डकवर्थ लुईस स्टर्न असा आहे. हे तीनही शब्द तीन वेगवेगळ्या व्यक्तींची नावं आहेत. यामधील डकवर्थ आणि लुईस हे दोघेही ब्रिटीश सांख्यिकीशास्त्रज्ञ असून स्टर्न ऑस्ट्रेलियाचे एक प्रसिद्ध प्रोफेसर आहेत. 90 च्या दशकात डकवर्थ आणि लुईस यांनी शोध लावलेली ही डीएल मेथड 2014 च्या सुमारास प्रोफेसर स्टर्न यांच्या मदतीने आता आयसीसीकडून अधिकृतपणे ही पद्धत वापरली जात असल्याने याचं नाव बदलून डकवर्थ लुईस स्टर्न अर्थात डीएलएस असं करण्यात आलं. 


1997 मध्ये समोर आली DLS Method


सर्वात आधी फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस या दोघांनी 1997 साली डीएल ही मेथड आणली. कोणत्याही सामन्यात संघाला धावा करण्यासाठी त्यांच्याजवळ शिल्लक ओव्हर्स आणि विकेट्स अत्यंत महत्त्वाच्या असतात. यावरच डकवर्थ आणि लुईस या दोघांनी ही मेथड समोर आणली... तर या पद्धतीनुसार नेमकं पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात रिझल्ट कसा काढला जातो, किंवा निर्धारीत लक्ष्य कसं ठरवतात हे जाणून घेऊ...


DLS चा आहे खास तक्ता


डकवर्थ-लुईस पद्धत कशाप्रकारे वापरली जाते यासाठी एक खास तक्ता आहे, ज्यामध्ये संघांकडे उरलेल्या ओव्हर्स आणि विकेट्सच्या आधारे संघाकडे किती रिसोर्स शिल्लक आहेत यावर रिझल्ट किंवा निर्धारीत लक्ष्य ठरवलं जातं. तर आता हा टेबल पाहिला तर बराच मोठा आहे, यात प्रत्येक शिल्लक ओव्हर आणि शिल्लक विकेटनुसार संघाकडे उपलब्ध रिसोर्सेस बदलत जातात, तर या तक्त्याचा रेफरन्स घेऊन काही उदाहरणांच्या मदतीने जाणून घेऊ डीएलएस मेथड...


DLS तक्ता-





आता समजा एखाद्या वन डे सामन्यात एखाद्या टीमने 27 ओव्हर्स खेळल्या असतील आणि त्‍यांच्या 3 विकेट्स पडल्‍या असताना सामना पावसामुळे थांबला असेल, तर त्या संघाकडे 23 षटकं आणि 7 विकेट उरल्‍याने डीएलएसच्या खास तक्त्यावरुन  53.4 टक्के इतके रिसोर्सेस त्यांच्याकडे शिल्लक असल्याचं दिसून येतं. त्यामुळे 100 टक्क्यांपैकी त्यांनी 46.6% रिसोर्सेसच वापरल्याचं दिसून येतं. या उर्वरीत रिसोर्सेसवरुन सामन्याचा निकाल किंवा दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघासमोरील निर्धारीत लक्ष्य किती असेल हे ठरवलं जात... यासाठीचा फॉर्म्युला पुढीलप्रमाणे 


टीम-2 समोरील लक्ष्य  = टीम-1 ने केलेला स्कोर * (टीम-2 कडून वापरले गेलेल्या रिसोर्सेसची टक्केवारी/टीम-1 ने वापरलेल्या रिसोर्सेसची टक्केवारी)


आता हे सर्व ऐकून अगदी गणिताचा तास सुरु असल्यासारखं वाटलं असेल... तर जसं गणिताच्या तासाला शिक्षक फॉर्म्यूला सांगितल्यानंतर एखादं उदाहरण द्यायचे तसंच आपणही एक उदाहरण घेऊन डीएलएस मेथड जाणून घेण्याचा प्रयत्न करु...


आता समजा पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाने 50 ओव्हर्स खेळून 270 रन केले आहेत आणि दुसऱ्या संघाचे 30 ओव्हर्समध्ये 160 रन झाले असून 4 विकेट्स पडल्या असताना पावसामुळे सामना थांबल्यास रिझल्ट काढण्यासाठी दोन्ही संघानी वापरलेले रिसोर्सेसची टक्केवारी काढली जाते. ती कशी तर, पहिल्या टीमने पूर्ण 50 ओव्हर खेळल्याने त्यांनी त्यांचे 100% रिसोर्स वापरले आहेत, तर दुसऱ्या टीमकडे 20 ओव्हर आणि 6 विकेट्स म्हणजेच डकवर्थ लुईस चार्टनुसार 55.4% रिसोर्स शिल्लक आहेत... त्यानुसार वर पाहिलेल्या फॉर्म्यूल्याने निकाल लावला जातो... 


म्हणजेच टीम-1 ने केलेला स्कोर * (टीम-2 कडून वापरले गेलेल्या रिसोर्सेसची टक्केवारी/टीम-1 ने वापरलेल्या रिसोर्सेसची टक्केवारी). वरील उदाहरनार्थ पकडलेल्या सामन्यानुसार पाहिल्यास 270* (55.4/100) = 150 त्यामुळे टीम-2 चं लक्ष्य = 150 रन इतकं होतं. आता संबधित संघाने आधीच 160 रन केल्याने त्यांता 10 रन्सनी विजय घोषित केला जातो. आता समजा कधी पहिल्या संघाची बॅटिंग सुरु असतानाच पावसाने व्यत्यय आणल्यास त्यांच्या जितक्या ओव्हर्स वाया गेल्या, त्यानुसार त्यांनी वापरलेले आणि शिल्लक रिसोर्स आणि दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाकडे शिल्लक रिसोर्स या सर्व टक्केवारीचं वरील फॉर्म्यूल्यानुसार गणित करुन निर्धारीत लक्ष्य ठरवलं जातं.


व्यवहारीक दृष्ट्या डकवर्थ लुईस समजणं अवघड


आता वरील गणितं पाहून नेमकं डकवर्थ लुईस समजणं तसं अवघडचं आहे... म्हणूनच बऱ्याच क्रिकेट तज्ज्ञांनी असंही म्हटलं आहे की व्यवहारीक दृष्ट्या डकवर्थ लुईस नियम समजणं अवघड आहे, तसंच काहींनी मजेशीर प्रतिक्रिया देताना हा नियम केवळ दोघांनाच आतापर्यंत कळाला आहे, ते म्हणजे डकवर्थ आणि लुईस...अशारितीने डकवर्थ लुईस स्टर्न अर्थात डीएलएस मेथड ही प्रत्येक सामना आणि तेव्हाची कंडीशन यानुसार बदलणारी असल्याने त्या-त्या सामन्यावेळीच आपल्याला नेमकं डीएलएस मेथड काय निर्णय देणार हे कळणार आहे..