10 डिसेंबर 2019 .. हा दिवस तसा खासच म्हणावा लागेल. फिनलँडच्या पंतप्रधानपधी सना मरीन या निवडून आल्यात. तर मिस युनिव्हर्सचा किताब दक्षिण आफ्रिकेच्या झोझीबिनी तुंझीने जिंकलाय. सना मरीन अवघ्या 34 वर्षांच्या तर झोझीबिनी फक्त 26 वर्षांची. सना मरीन गोरीपान, झोझीबिनी नाका डोळ्याने अगदी रेखीव पण रंग पूर्णपणे वेगळा या श्रेणीतली. पण, आज या दोघींच्याही कुटुंबियांना, त्यांच्या देशवासियांना त्यांचा सार्थ अभिमान असणारच.


या दोन देशांच्या दोन राण्यांविषयी जरा आज सविस्तरच बोलूयात..

2011- किम जोंग उन- नॉर्थ कोरिआचे प्रमुख- वय – 35
2016 – जुरी रतास – इस्तोनियाचे पंतप्रधान – वय – 41
2017 – लिओ वरदकर – आर्यलंड पंतप्रधान – वय- 40
2017 – इमॅन्युएल म्यॅक्रॉन – फेंच्र अध्यक्ष – वय- 41
2017 - जेसिंडा आरडर्न- न्यूझीलंड पंतप्रधान – वय -39 (देशातली चाळीशीच्या आतील पहिली महिला पंतप्रधान )
2019 – ओलेस्की होंचारुक – यूक्रेनचे पंतप्रधान – वय -35

ही काही जगातल्या देशांचे प्रमुख. ज्याचं वय चाळीशीच्या आतलं आता त्यात आणखी एक नाव समाविष्ट झालंय. हे नाव आहे...सना मरीन..वय फक्त 34 वर्ष.. आता आहेत फिनलँडच्या नव्या पंतप्रधान. मनापासून त्यांचं कौतुक आणि अभिनंदन. 34 व्या वर्षी त्या पंतप्रधान बनल्या आहेत. अवघ्या 27 वर्षांच्या असताना त्या महापौर होत्या. फिनलँडमध्ये सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचं सरकार आलंय. फिनलँडमध्ये सध्या ५ पक्षांच्या आघाडीचं सरकार आहे. त्यामध्ये ३ पक्षांच्या प्रमुख या महिला आहेत.

झोझीबिनी तुंझीने विश्वसुंदरी 2019 चा किताब पटावला. झोझीबिनी दक्षिण आफ्रिकेची. तिच्यासह एकूण 20 सौंदर्यवती उपांत्य फेरीत होत्या. भारताची वर्तिका सिंह हीदेखील या 20 जणींमध्ये होती. मात्र अंतिम 10 जणींमध्ये तिला स्थान मिळवता आलं नाही. कोलंबिया, फ्रान्स, आईसलॅंड, इंडोनेशिया, मेक्सिको, पेरु, पुएर्टो रिको, दक्षिण आफ्रिका, थायलंड आणि युनायटेड स्टेट्स या देशांच्या सौंदर्यवती अंतिम 10 मध्ये होत्या.

वर्णभेद, गोरा- काळ्या रंगाची तुलना करणाऱ्यांसाठी आजचा दिवस म्हणजे मोठी चपराक म्हणावी लागेल. मुलींचं कर्तृत्व हे त्यांच्या भरलेल्या शरीरावर, रंगावर अवलंबून नाही हो. आज एक मुलगी वयाच्या 34व्या वर्षी पंतप्रधान होते तर दुसरी विश्वसुंदरी. आपल्याकडेही कमी वयात कर्तृत्व सिद्ध केलेल्या मुली, महिला आहेत, त्यात तिळमात्रही शंका नाही. मात्र मुद्दा विचारसरणीचा आहे. मुलीचा विकास, तिचं कर्तृत्व जगासमोर आलं, की..हं.. कमी वयात इतकी पुढे गेली म्हणजे काही तरी लफडं असणार..हे कुजबुजणारी विकृत मानसिकता आहेच. आणि आपण यालाच समाज म्हणतो. कोती वृत्ती म्हणतो. आज आपण आपल्या मुलींना कितीही शिकवलं, आई बापाने कितीही मेहनतीने मुलीला पायावर उभं केलं तरीही लग्न व्यवस्था हा शेवटचा टप्पा समजून, कांदा पोह्याच्या कार्यक्रमात मुलीच्या रंगाला, सौंदर्याला महत्व दिलं जातं. मी त्यातला नाही, माझ्यासाठी स्वभाव महत्वाचा म्हणणारी मुलं अनेक भेटतात. मात्र बायकोसाठी काही खरेदी करताना हे तुझ्या रंगाला शोभून दिसणारं नाही, अशीही वक्तव्य अशाच मुलांच्या तोंडी असतात. एकूणच काय, तर रंग वेगळा नव्हे तर रंगच महत्वाचा.
ट्रेनमधून प्रवास करताना लेडीज डब्यात डोकावून पाहाणारे अनेक महाभाग आहेत. मात्र गोऱ्या रंगाची मुलगी दिसली, तिने अंगभर कपडे जरी घातलेले असले तरी नजरेने बलात्कार करणारी विकृत नजर आजही अवतीभवती आहेच. महिलांकडे वखृवखणाऱ्या नजरेने पाहाणारे असतातच, पण रंग गोरा असेल तर वखवख आणखीनच उफाळताना दिसते. अंगाला भोकं पडतील अशा नजरेची. शहरात किमान सतर्क राहणाऱ्या मुली अरेला कारे तरी करतील, मात्र गावात, खेडापाड्यात काय, वर्णभेद तिथे नाही का, आपल्याकडे तर काळ्या, सावळ्या रंगाकडे परग्रहाहून आलेली व्यक्ती म्हणून पाहत हिणवलंच जातं. म्हैषासूर मर्दिनी, दुर्गामातेची पूजा करणारे आपण दगडाच्या काळ्या रंगापुढे नतमस्तक होतो आणि त्याचवेळी देवीच्या दर्शनाला आलेल्या काळ्या रंगाच्या मुलीकडे नाक मुरडून पुढे जातो. हे बोचणारं सत्यच आहे.

आज खरंच विचार बदण्याची गरज आहे. एकविसाव्या शतकात असल्याच्या टिमक्या जरी मारत असलो तरी तरुणांवर विश्वास ठेवून कारभार सोपवण्याची गरज आहे. सर्वात तरुण मुख्यमंत्री शरद पवार की फडणवीस यावर अनेक चर्चा झाल्या. तरुण आमदार, खासदार म्हणून उल्लेख होतो. कौतुक होतं पण, पुढे काय, राजकारणातली काही नावं सोडली तर इतर क्षेत्रातही भरीव कामगिरी करणाऱ्यांचं वयही पन्नाशी पारच आहे. या चर्चा सुरु झाल्या की मुद्दा निघतो तो अनुभवाचा, घराणेशाहीचा. मात्र एक मुद्दा आपणच विसरतोय तो म्हणजे विश्वासाचा. विश्वास दाखवला तरच स्वतःला सिद्ध करता येतं, इतिहास घडवता येतो. फिनलँडने आज तेच केलं, तरुण रक्तावर, महिला नेतृत्वावर विश्वास दाखवला.

राजकारण, समाजकारणात महिला कुठेही मागे नाहीत, हे वारंवार सांगण्याची वेळ का यावी, हाच आजही पडलेला प्रश्न आहे. जी बाई घराला घरपण देते, मुलांना घडवते, ती नर्सही असते, ती आयाही, ती कामवाली बाईही, ती घराची अर्थमंत्रीही तिला फक्त रंगारुपात तोलून तिचं मोठेपण, कर्तृत्व कमी करण्याचा अधिकार कुणालाही नाही. ती एक जागतिक नेतृत्व आहे, हे मोठ्या मनाने, दिलाने जगाने स्वीकारलंय, मात्र खंत वाटते की तिला आपल्याकडे बेबी डॉल म्हणूनच पाहिलं जातंय.

अडथळ्यांविना काहीही सोपं नाही. झोझीबिनी आणि सना यांच्याही मार्गात अडथळ्यांचा डोंगर असणारच. पण, त्यावर मात करत त्या यशाच्या शिखरावर पोहोचल्यात. रंग, रूप याही पलिकडे विचार करणाऱ्या, त्यांच्या अवतीभवती कर्तृत्वावर विश्वास ठेवून त्यांना आयुष्याचा नवा अर्थ शिकवणाऱ्या, त्या प्रेरणादायी व्यक्तींना मनापासून सलाम.. ब्लॅक ब्युटी विथ ब्रेनचं हे कॉम्बिनेशन माझ्या देशात केव्हा स्वीकारार्ह ठरणार?