भारतीय महिला कशी असावी? तिचं बोलणं, वागणं, तिचा पेहराव, तिची निर्णय घेण्याची क्षमता कशी असावी? याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज.


नेहमी साडीतच वावरणाऱ्या, भांगेत, कपाळावर मोठं कुंकू..त्यांच्याकडे पाहिल्यावरच प्रसन्न वाटायचं. 21व्या शतकातल्या महिलांचा पेहराव पाहिला की एक महिला राजकीय व्यक्ती म्हणून सुषमा स्वराज नेहमीच वेगळ्या आणि प्रभावशील वाटायच्या. त्यांचा प्रभाव हा फक्त त्यांच्या कपड्यातूनच नाही तर त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्वातूनही पडायचा.

सुषमा स्वराज संसदेत बोलायला उभ्या राहिल्या की त्यांचं मुद्देसूद बोलणं, बोलण्यातला करारीपणा भल्याभल्यांना गार करायचा. भाजपमधल्या अटलबिहारी वाजपेयींनंतरच्या प्रभावी वक्त्या म्हणून सुषमा स्वराज यांच्याकडे पाहिलं जायचं.

संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानला दिलेलं रोखठोक प्रत्युत्तर असो की देशाची कन्या 'गीताला'  पाकिस्तानातून परत आणणं असो.. एका स्त्रीचा कडकपणा आणि तिच्यातलं ममत्व याचं दर्शन घडलं ते सुषमा स्वराज यांच्यात.. संघर्षातून केलेली वाटचाल, घरदार, सामाजिक भूमिका, देशाच्या मंत्री म्हणून जबाबदाऱ्या सांभाळणं हे किती आव्हानात्मक असू शकतं हे एक महिला म्हणून मी कल्पना करु शकते.

राजकारणातली महिला म्हटलं की तिच्याकडे पाहण्याचा आपल्या समाजाचा दृष्टिकोन आजही बदललेला नाही. मात्र स्वच्छ प्रतिमेच्या सुषमा स्वराज यांनी पुरुषप्रधान संस्कृतीत आपलं वेगळेपण ठसवलं, दाखवून दिलं. परदेश दौरे करताना आपल्या वेशभूषेत बदल न करता समोरच्याचाही आदर ठेवत कसं वागावं बोलावं हे खरंच सुषमाजींनी शिकवलंय.

भाजपच्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असो वा केंद्रातल्या विविध पदांच्या जबाबदाऱ्या त्यांनी अगदी सक्षमपणे सांभाळल्या. प्रेमाने बोलणं, प्रेमाने समजून घेणं हा त्यांचा स्वभावच प्रत्येकाला आपलंसं करायचा. कदाचित त्यामुळेच ट्विटरवर, सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात नव्हे त्यांच्या समर्थनार्थच प्रतिक्रिया जास्त दिसायच्या. त्या सक्रीय राजकारणात नसल्या तरी त्यांची सामाजिक मुद्द्यांवरची सक्रीयता सतत दिसून आलीय.

संघर्ष, जिद्द, मेहनत, अभ्यासूपणा, प्रामाणिकपणाच व्यक्तीला समर्थकांबरोबरच विरोधकांकडूनही मानसन्मान मिळून देते. सुषमाजींमधल्या याच गुणांमुळे विरोधकही त्यांचं नाव आदराने घेतात.

गंगेला आपण पावन, निर्मळ मानतो. सुषमा स्वराज या राजकारणातल्या 'गंगा' मला वाटतात. एक कर्तृत्ववान भारतीय महिला राजकारणी ही कशी असते.. हे सुषमा स्वराज यांनी जगाला दाखवून दिलं. भारतीय महिला शक्तीचं प्रेरणादायी उदाहरण असलेल्या सुषमा स्वराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली!