मराठवाड्याच्या मातीला पावसाच्या पाण्याचा स्पर्श होण्याआधी, अशी परिस्थिती होती की ओला दुष्काळ परवडला, पण कोरडा दुष्काळ नको. मात्र आता वरुणराजा असा काही कोसळलाय की ओला दुष्काळही जिवावर बेतू लागला आहे.
मराठवाड्याने तब्बल चार वर्षे दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर यावर्षी परतीच्या पावसाने सगळी कमी एकदाच भरुन काढली. नद्या, तलाव आणि धरणांचा घसा ओला झाला आणि तळाला गेलेल्या विहिरी काठोकाठ भरल्यात. मराठवाड्यात या पावसाने नंदनवन फुललंय म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण डोंगराला हिरवा चारा खाणारी जनावरं, नदीवर धुणं धुवायला जाणाऱ्या स्त्रिया हे गेल्या काही वर्षापासून कल्पनेतलंच होतं. पण सगळं पुन्हा पहिल्यासारखं झालंय.
मराठवाड्यात पाऊस झाल्यानंतर दोन दिवस फेरफटका मारला. यामध्ये असं जाणवलं की निसर्गाने दिलंय तर एवढं का दिलं असावं, की ज्याने सगळं असून नसल्यासारखं झालं आहे. जनावरांच्या चाऱ्यासोबतच पिण्याची पाण्याची सोय झाली आहे, हे सर्वात उत्तमच. मात्र पिकं गेल्याने मागच्या वर्षीची परिस्थिती यावर्षीही राहते की काय अशी शंका आहे. कारण कर्ज घेऊन खरेदी केलेलं बियाणं, खतं यांचे पैसे कसे फेडणार याचा प्रश्न आहे.
पावसाने कोणाच्या घरात पाणी शिरलं तर कुणाची जनावरं वाहून गेली. काहींच्या घरातील कर्ता पुरुष गेला तर कोणाचं छत्र हरपलं.
रब्बी हंगामात पिकं येतीलही पण बियाणं खरेदी करण्यासाठी पैसे तर लागणारच आहेत.. शेतकरी हा सर्वात स्वाभिमानाने जगणारा वर्ग.. पण निसर्गाच्या कचाट्यातून सुटणं हे त्याच्यासमोरचं मोठं आव्हान आहे.
शेतांना पाहिजे त्यापेक्षा किती तरी पटीने जास्तीचा पाऊस होता. त्यामुळे ज्या शेतांची पाणी सोसण्याची क्षमता कमी आहे, त्या शेतातील पिकांची पुरती वाट लागली.
यादरम्यानची चांगली गोष्ट म्हणजे पावसाने धरणं भरली, त्यामुळे शेतकऱ्यांनाही एक समाधान होतं की चला पिक गेलं मात्र पुढच्या पिकासाठी पाणी तरी झालं, जनावरांना हिरवा चारा तरी झाला आणि विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणं यंदा पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करायची गरज नाही.
माणसाने पिण्याच्या पाण्याची, खाण्याची सोय कशी तरी केलीच पण दुष्काळात सर्वात जास्त वाईट जनावरांची परिस्थिती होती. मिळेल त्या चाऱ्यावर जनावरं जगवावी लागली. कडक वाळलेली वैरण (तीही मिळत नव्हती), गढूळ पाणी हा वनवास जनावरांनी चार वर्षे सोसला. यंदाच्या पावसानंतर डोंगराला जनावरं चरताना पाहून आनंद झाला.
शेतात पीक नसल्यानं कित्येक शेतकऱ्यांच्या बाहेर शिकणाऱ्या पोरांना घरुन पैसे न आल्यानं शिक्षण अर्ध्यावर सोडावं लागलं. वाईट वनवास होता हा, पण सध्याची हिरवळ आणि भरलेली तलावं पाहता पिकांना चांगला भाव दिला तर कदाचित यापुढं शेतकऱ्यांना कर्ज काढायची गरजही लागणार नाही.
चार वर्षे वनवास सोसलाय, अजून काही महिने लढू आणि जिद्दीने बळीचं राज्य आणू, ही प्रबळ आशेची भावना मनात ठेवून पुन्हा जोमाने कामाला लागलेल्या शेतकऱ्यांची ही जिद्द जगातील सर्वात प्रेरणादायी अनुभव आहे.
मराठवाडा... कोरडा दुष्काळ ते ओला दुष्काळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Oct 2016 05:27 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -