2014 च्या लोकसभा निवडणुकीअगोदर 'अच्छे दिन', 'अब की बार मोदी सरकार' या टॅग लाईन लोकप्रिय झाल्या होत्या. भाजपला या टॅग लाईनचा प्रचंड फायदा झाला. काँग्रेसनेही यावर्षी भाजपच्या पावलावर पाऊल ठेवत 'विकास वेडा झालाय' ही टॅग लाईन लोकप्रिय केलीय. गुजरात निवडणुकीच्या अगोदर काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने सक्रिय झालाय त्याने बऱ्याच दिवसांपासून हरवल्यासारखा झालेला पक्ष जिवंत झाला आहे.


सोशल मीडियावर कॅम्पेनिंग, उपाध्यक्ष असलेल्या राहुल गांधींचा काँग्रेस नेत्यांशी वाढलेला संपर्क, ट्रेंड ओळखून सरकारवर हल्ला चढवणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरकारविरोधी तयार झालेल्या वातावरणाचा फायदा घेण्याचं काँग्रेसने टायमिंग साधलं आहे. अर्थात काँग्रेसच्या या अचानक सक्रिय होण्यामागे एक टीम आहे, जिचं नाव आहे 'डिजीटल वॉर रुम'

दिव्या स्पंदना उर्फ रम्या हे नाव या सगळ्यामागे आहे. रम्या या काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलच्या प्रमुख आहेत. त्यांची निवड ही थेट राहुल गांधींकडून केली गेली असल्याचं बोललं जातं. रम्या यांनी सोशल मीडिया सेलचा स्टाफ दुप्पट्टीने वाढवला आहे. वेगेवगळ्या क्षेत्रातील कौशल्य असणारी लोकं आहेत. यापैकी 85 टक्के महिला कर्मचारी आहेत. काँग्रेसच्या डिजीटल वॉर रुममध्ये यापूर्वी फक्त तीन महिला कर्मचारी होत्या. डिजीटल सेलचे चार इनचार्ज आहेत. ज्यांच्यावर वेगवेगळी जबाबदारी दिली गेली आहे.

पत्रकारिता, तंत्रज्ञान, मार्केटिंग अशा प्रत्येक क्षेत्रातला युवा स्टाफ काँग्रेसच्या डिजीटल वॉर रूममध्ये असल्याचं रम्या यांनी काही दिवसांपूर्वी ‘इकॉनॉमिक टाइम्स’शी बोलताना सांगितलं होतं. प्रत्येक राज्यातील काँग्रेसला ट्विटरवर आणणं, महत्वाच्या नेत्यांना सोशल मीडियावर सक्रिय करणं आणि राहुल गांधींच्या ट्विटर अकाउंटवरुन सरकारवर थेट निशाणा साधणं हे या टीमचं प्रमुख काम आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींच्या अकाउंटवरुन जय शाय आणि अमित शाह यांच्याविरोधात केलेलं ट्वीट जवळपास सात हजार जणांनी रिट्वीट केलं. अर्थात सरकारविरोधी वातावरणाचाही काँग्रेसला जोरदार फायदा होत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस कॅम्ब्रिज अॅनालिटिका या जगप्रसिद्ध जनसंपर्क कंपनीच्या संपर्कात असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. कंपनीकडून ग्राहकांच्या इंटरनेट डेटाचं विश्लेषण केलं जातं. यावरुन लोकांच्या आवडी-निवडी, जिव्हाळ्याचे विषय लक्षात घेऊन रणनिती तयार केली जाते. या विश्लेषणात ऑनलाईन सर्चिंग, ई-मेल आणि शॉपिंग वेबसाईट्सही चाळल्या जातात. जगातील अनेक पक्ष कॅम्ब्रिज अॅनालिटिकाच्या संपर्कात आहेत. केवळ अमेरिकेतच नाही तर ब्रेक्झिटच्या वेळीही कॅम्ब्रिज अॅनालिटिकाने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची रणनिती आखणारी ही कंपनी आता काँग्रेसच्या मदतीला धावून येण्याची शक्यता आहे.

अमेरिकेतील भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी हिंदीमध्ये जाहिराती करण्यात आल्या. व्हर्जिनियातील मंदिरात ट्रम्प यांच्या मुलीने दिवाळी साजरी केली. ही सर्व रणनिती कॅम्ब्रिज अॅनालिटिकाने आखल्याचं बोललं जातं.

सोशल मीडिया हे मतपरिवर्तन करण्याचं प्रभावी माध्यम आहे. सोशल मीडियावर लोक जिथे व्यक्त होतात तिथेच त्यांचं मतही तयार होतं. भाजपने ही गरज 2014 च्या अगोदरच ओळखली होती. पण प्रस्थापित असलेल्या काँग्रेसला याची गरज वाटली नाही. किंबहुना सोशल मीडियाचा निवडणुकीत फायदा होऊ शकतो यावरही काँग्रेसचा विश्वास नव्हता. भारतात ग्रामीण भाग जास्त असल्यामुळे हे माध्यम शहरापुरतंच मर्यादित आहे, असा काँग्रेसचा समज होता. पण काँग्रेसने काळाची गरज योग्य वेळी लक्षात घेतलीय. अचानकपणे सोशल मीडियावच्या माध्यमातून जिवंत झालेल्या काँग्रेससाठी आगामी गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुका लिटमस टेस्ट असतील.