"कोणतीही गोष्ट 120 टक्के क्षमतेनं करायची, या विचाराचा मी आहे".

  


विराट कोहलीनं कर्णधारपदाचा राजीनामा देताना लिहिलेल्या इमोशन पत्रातील वरील वाक्य आहे. हे मी आता का सांगतोय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. विराट कोहलीनं आज 34 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्याचं आयुष्य एखाद्या थ्रिलर चित्रपटासारखेच आहे... लहानपणापासून क्रिकेटचं वेड असलेला विराट सध्या क्रिकेट जगतावर राज्य करतोय... क्रिकेट खेळताना तो सर्वस्वी पणाला लावतो... कधी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला भिडणं असो, संघातील सहकाऱ्याने झेल घेतलेला असो, गोलंदाजानं विकेट घेतलेली असो अथवा शतक असो..  त्या खेळाडूपेक्षा विराट कोहलीचा जल्लोष जास्त असतो.. हे काहींना आवडत नसेल.. पण यात गैर काय आहे... आपल्या संघातील खेळाडूला प्रोत्साहन देण्यात त्याच्या आनंदाला चार चाँद लावण्यात कसला वाईट काय आहे. मुळात विराट कोहली नावाचं रसायनच वेगळ आहे.. तो खेळताना नेहमी 120 टक्के देण्याचा प्रयत्न करत असतो.. त्याच्या खेळीतून अन् मैदानावरील वावरण्यातून ते अनेकदा दिसून आलं. इतकेच नाही तर प्रेक्षकांनाही त्यानं जल्लोष करायाला भाग पाडलेय.. विराट कोहली क्रिकेट विश्वातील ब्रँड झालाय. त्याची तुलना क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, विव रिचर्ड्स आणि डॉन ब्रॅडमन यांच्यासारख्या सर्वकालीन दिग्गजांबरोबर केली जाते. इतकच काय... ग्रेग चॅपल यांनी विराट कोहलीची तुलना भगवत गीता या आपल्या श्रेष्ट ग्रंथासोबत केली आहे. ज्याप्रमाणे भगवत गीतेचा सार आपल्या आयुष्याला कलाटणी देतो.. तसेच विराट कोहलीकडून आपण बरेच काही शिकू शकतो. 


ब्रेन स्ट्रोक्समुळे वडिलांचं निधन झालं होतं, त्यावेळी विराट कोहली रणजी सामना खेळत होता. त्यावेळी सहकाऱ्यांनी आणि कोचने त्याला घरी जाण्याचा सल्ला दिला. त्यावेळी विराट कोहलीनं सामना खेळण्याचा निर्णय घेतला.. कारण, एखाद्या फलंदाजामुळे आपला संघ पराभूत होऊ नये, असा त्यामागील उद्देश होता. या सामन्यात विराट कोहलीनं 90 धावांची खेळी केली होती. वडिलांचं निधन झालं त्या दिवशी 18 डिसेंबर ही तारीख होती, तोही 18 वर्षांचा होता. त्यावेळी आपल्यासोबत काय घडलं, किती मोठा दु:खाचा डोंगर कोसळला, हे त्याला क्षणोक्षणी आठवतं. त्यामुळे विराट कोहली आजही 18 क्रमांकाची जर्सी घालतो. विराट कोहली अशा मातीपासून तयार झालाय जी कितीही वेळा  विस्कटली तरी पुन्हा एकसंध होऊन आधीपेक्षा जास्त कणखर होते. 


स्वत:ला काय करायचं हे ओळखा 


विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघानं अंडर 19 च्या विश्वचषकावर नाव कोरलं. रात्रीमध्ये देशभरात विराट कोहली नाव प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या ओठावर होतं. त्यानंतर विराट कोहलीला आयपीएलमध्ये आरसीबी संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. भारतीय टीममध्येही निवड झाली..  अल्पवधीतच विराट कोहली प्रसिद्धीच्या झोतात आला होता. पण याचवेळी विराट कोहली आपल्या ध्येयापासून थोडासा दूर गेला. आयपीएलनंतर होणाऱ्या पार्ट्या, सामन्यावेळी चाहत्यांचा होणारा गराडा, सेल्फीसाठी तरुणांची गर्दी... यामुळे विराट कोहली सुस्तावला... त्याचं क्रिकेटवरील लक्ष विचलीत झालं. यामध्ये एक वर्षाचा कालावधी गेला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. श्रीलंकाविरोधात स्वस्तात बाद झाला होता. व्यायाम व्यवस्थित होत नव्हता, डायटवर लक्ष नव्हतं.. त्यामुळे वजन वाढायला लागलं होतं. याचवेळी विराट कोहली प्रसिद्धीच्या झोपेतून जागा झाला. आपण काय करतोय? आपल्याला काय करायचं? आपल्या कुवतीनुसार क्रिकेट खेळतोय का? अशा प्रश्नांचं मोहोळ त्याच्यापुढे उभं राहिलं. त्यानंतर विराट कोहलीनं स्वत:चे विश्लेषण स्वत:चं केलं. विराट कोहलीनं वेळ जाण्याआधीच स्वत:ला काय करायचं या प्रश्नचं उत्तर मिळवलं. त्यानं प्रसिद्धीऐवजी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं. आपल्या चुका सुधारल्या. आयुष्यात बदल घडवले. स्वत:च्या चुका सुधारल्या.. तुम्हीही विराट कोहलीकडून ही गोष्ट शिकू शकता.. वेळ जाण्याआधीच स्वत:ला काय करायचेय, आपण काय करु शकतो आणि काय करु नये.. हे वेळेवरच ओळखायला हवं. अन्यथा  अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी टीम इंडियाची जर्सी घातली.. पण ती खूप कमी कालावधीसाठी. विराट कोहली 2009 पासून आजही भारतीय संघाचा अविभाज्य घटक आहे. त्याचप्रमाणे करिअरमध्ये अथवा व्यवसाय कराता तुम्हीही नेमकं काय करायचे आहे...आपलं ध्येय ठरवा आणि ध्येयाचा पाठलाग करा... 
 
चुकांमधून शिका, खचू नका


 विराट कोहलीचा प्रवास आपल्याला खूप काही सांगतो.. स्वतचं आणि कामाचं नेहमीच विश्लेषण करा.. ज्यामध्ये कमकुवत आहात, त्यावर काम करा..एखदी गोष्ट, पोस्ट मिळाल्यावर काही लोक आळशी होतात, अशावेळी विराट कोहलीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. शिकायचं सोडू नका...विराट कोहलीला हे खूप लवकर समजलं होतं. म्हणून विराट कोहलीनं वारंवार मेहनत घेतली, फ्लॉप गेल्यानंतर निराश झाला नाही, पुन्हा नव्या उमेदीनं त्यावर काम केलं. 2016 च्या इंग्लंड दौऱ्यामध्ये विराट  अपयशी ठरला होता. त्यावेळी त्याच्यावर टीका झाली होती. त्यावेळी त्याने स्वत:वर काम केलं. पुढील इंग्लंड दौऱ्यात त्यानं धावांचा पाऊस पाडला होता. इतकेच नाही, ताजे उदाहरण घ्यायचं झालं तर एका शतकासाठी विराट कोहलीला दोन वर्षांपेक्षा जास्त काळ वाट पाहायला लागली. याकाळात कर्णधारपदही गेलं, विराट कोहीलचं करिअर संपलं, त्यानं क्रिकेट सोडावं, यासारख्या कमेंट आल्या. पण विराट कोहली खचला नाही, नव्या दमानं परतला. सध्या सुरु असलेल्या विश्वचषकातील त्याची फलंदाजी सर्वकाही सांगून जाते. विराट कोहली नेहमीच स्वतच्या चुकामधून शिकतो. त्याचं हे कौशल्य तुम्हीही अवगत केल्यास यश नक्कीच मिळेल.


स्वत:ला अपग्रेट करा 


2013-14  मध्ये विराट कोहलीला संघाबाहेर बसवण्यात आले होते. तेव्हा विराट कोहली खचला नाही. दररोज प्रॅक्टिस केली. संघाबाहेर गेल्यानंतर नव्या गोष्टी शिकला. ज्या संघात परतल्यानंतर कामाला आल्या. संघात पुनरागमन केल्यानंतर चाहत्यांना आणि प्रतिस्पर्धी संघाला विराट कोहलीचं हे नवीन व्हर्जन दिसलं. विराट कोहलीनं वाईट काळात कधीच हार मानली नाही, तो शिकला..स्वत:ला अपग्रेड केलं. त्याचा हाच गुण तुम्हाला आयुष्यात यश मिळवून देईल. 


पर्सनल आणि प्रोफशन आयुष्यात बॅलन्स


विराट कोहली पर्सनल आणि प्रोफशन आयुष्यात बॅलन्स ठवतो. पत्नीसोबत सुट्टीवर गेल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच एन्जॉय करतो. टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर अनेकांनी अनुष्का शर्माला ब्लेम केलं, त्यावेळी विराट कोहली पत्नीच्या मागे खंबीर उभारला. टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. कुटुंबासोबत नेहमीच उभा राहिला. कुटुंबाला वेळ दिला. क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमातूनही विराट कोहली कुटुंबासाठी वेळ देतो. तुम्हीही विराट कोहलीकडून हे स्किल शिकू शकता. 


फिटनेस 


भारतीय संघातील खेळाडू आज तुम्हाला फिट दिसतात, त्याचं श्रेय विराट कोहलीला जातं. विराट कोहलीनं भारतीय संघाची फिटनेस वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली. त्यानं आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष तर दिलेच त्याशिवाय इतर खेळाडूंनाही फिटनेसवर लक्ष देण्यास भाग पाडलं. यामुळे विराट कोहली नेहमीच एनर्जीटक असतो.. त्याचा उत्साह पहिल्या षटकांपासून अखेरच्या षटकापर्यंत सारखाच असतो. त्याचा हा गुण तुम्हाला नक्कीच फायदाचा असेल.  


कमबॅक 


गिरते हैं शहसवार ही मैदान-ए-जंग में वो तिफ्ल क्या गिरे जो घुटनों के बल चले... या शायरीप्रमाणेच विराट कोहलीनं अनेकदा कमबॅक केले. आयुष्यात तुम्हाला अनेकदा अपयश येईल, निराश होऊ नका.. तितक्याच वेगानं आणि कणखरपणे कमबॅक करा..आधीपेक्षा जास्त प्रभावीपणे काम करा... तुम्ही तुमच्या बेस्ट व्हर्जनसाठी काम करा.. विराट कोहलीचं आयुष्य तुम्हाला हेच सांगेल.. अपयश आलं तरी घाबरून जाऊ नका, निराश होऊ नका.. स्वत:च्या ताकदीला ओळखा अन् कमबॅक करा अधिक कणखरपणे...


आपल्या व्यक्तीची साथ सोडू नका 


विराट कोहली आपल्या सहकारी खेळाडूसोबत नेहमीच उभा राहिलाय. मग ते आनंदात असो अथवा बॅडपॅच, दु:खात किंवा खराब कामगिरीवेळी.. विराट कोहलीनं कधीच साथ सोडली नाही.  विराट कोहली देशासाठी, आपल्या खेळाडूंसाठी नेहमीचं स्टँड घेतो. विराट कोहलीनं अनेकदा जशास तसं उत्तर दिलेय. कधी बॅटने तर कधी मैदानावरील हावभावानं... देशासाठी तो नेहमीच उभा राहिलाय.. त्यानं आपलं 120 टक्के देण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय. जो इज्जत देतो, त्याला इज्जत द्या.. पण जो क्रॉस जातो, त्याला जशास तसं उत्तर द्यायला हवं. याला काही जण अॅग्रेसिव्ह म्हणतील, गर्विष्ठ म्हणतील, खिलाडूवृत्ती असेही म्हणतील. पण विराट कोहलीचा हा गुण आयुष्यात प्रत्येकजण अंमलात आणतोच. 


खिलाडूवृत्ती 


इंग्लंड दौऱ्यात मोहम्मद सिराजला प्रेक्षकांकडून शिवीगाळ होत होती, तेव्हा विराट कोहली एकाटा भिडला.. त्या शिवीगाळ करणाऱ्या प्रेक्षकांना त्यानं शांत केलं. विराट कोहलीला तुम्ही फक्त अॅग्रेसिव्ह खेळाडू म्हणत असाल तर तुम्ही चुकताय.. विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूसाठीही स्टँड घेतलाय. होय... स्मिथनं बॅन झाल्यानंतर वर्षभरानंतर स्मिथनं मैदनावर पाऊल ठेवलं होतं.  त्यावेळी भारतीय खेळाडूंनी स्मिथला डिवचलं होतं. त्यावेळी विराट कोहलीनं भारतीय प्रेक्षकांना शांत केले होते. प्रतिस्पर्धी असो किंवा सहकारी खिलाडूवृत्तीनं विराट कोहली खेळाडूच्या मागे नेहमीच उभा राहिलाय... तुम्ही विराटकडून ही गोष्ट शिकू शकता... योग्य गोष्टीसाठी नेहमीच उभं राहा...


विराट कोहली जन्मत नाही, तो बनतो... तुमच्या आमच्यातही विराट दडलाय.. फक्त त्यासाठी स्वत:ची कुवत ओळखायला हवी. वेळीच चुका सुधारायला हव्यात.. आपल्या ध्येयाचा पाठलाग करायलं हवा. आयुष्यात नेमकं काय करायचं, ते ठरवून त्यावर काम करायला हवं. आयुष्यात अनेक चढउतार येतात, अशावेळी खचून न जाताना नव्या दमानं, उमेदीनं पलटवार करयाला हवा. आयुष्य सुंदर आहे, फक्त त्यासाठी मेहनत करण्याची गरज आहे. तेव्हाच तुमचं आयुष्य 'विराट' होईल.