बहुत जुदा है औरों से
मेरे दर्द की कैफियत।
ज़ख्म का कोई पता नहीं और
तकलीफ की इन्तेहाँ नहीं।


प्रत्येक व्यक्तीला आपल्या वेदनेविषयी हेच वाटत असते की, "इतरांपेक्षा माझे दुःख वेगळे आहे. जखम तर दिसत नाही आणि वेदनेला अंत नाही." वेदना शरीरात जाणवत असली तरी तिचा उगम मनात खोलवर कुठे तरी असतो. त्यामुळेच आता पेशंट म्हणजे केवळ शरीर नाही तर त्याच्या मनाचाही विचार डाॅक्टर करत आहेत. 


अशाच एका डाॅक्टरांचा फोन मानसतज्ज्ञ उदय देशपांडे यांना येतो आणि 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा दहावा भाग सुरू होतो. ही मालिका सध्या एबीपी माझा वृत्तवाहिनीवरून दर रविवारी प्रसारित होते.



शोभा पटवर्धन नावाच्या पेशंटचे गर्भाशयाचे ऑपरेशन झालेले असते. कॅन्सरची गाठ काढून टाकल्यानंतरही त्यांच्या ओटीपोटात अधूनमधून आग लागल्यासारख्या वेदना होत असतात. त्यांचे डाॅक्टर शेवटी मानसतज्ज्ञ डाॅ. उदय देशपांडेंना फोन करतात आणि शोभाताईंना त्यांच्याकडे पाठवतात.



शोभाताई येतात त्या चाकाच्या खुर्चीवर बसून. नर्स त्यांना डाॅक्टरांच्या केबिनमध्ये आणून सोडते. शोभाताईंशी बोलताना डाॅक्टरांना कळते की, त्यांच्या पतीचे निधन दहा वर्षांपूर्वी झालेले आहे. एकुलती एक मुलगी प्रज्ञा सिंगापूरला एका मोठ्या कंपनीत जाॅब करते. इकडे शोभाताई भारतात एकट्या आहेत. प्रज्ञा हट्टी आणि स्वतंत्र विचारांची आहे. त्यामुळे तिने भारतात येऊन आईजवळच रहावे, अशीही शोभाताईंची अपेक्षा नाही. मुलीला त्यांची काळजी वाटते. तिला बरे वाटावे म्हणून वाटेल तितके पैसे खर्च करण्याची तिची तयारी आहे.



डाॅक्टरांशी बोलताना शोभाताईंना मध्येच पोटात असह्य वेदना होतात. बोलण्यात एखादा विषय निघतो तेव्हाच वेदना बळावतात हे डाॅक्टरांच्या लक्षात येते. 



ते शेवटी शोभाताईंना विचारतात की, तुमच्या मनात जे साचले आहे ते निःसंकोच बोला. तेव्हा शोभाताई सांगतात की, त्यांची मुलगी प्रज्ञा ज्या कंपनीत कामाला असते त्या कंपनीच्या एका भागिदाराशी तिला लग्न करायचे असते. नाथाणी हे त्याचे नाव. नाथाणीने आपल्या पहिल्या बायकोचा छळ करून खून केला असा गुन्हा दाखल झाल्यानंतरही तो कोर्टातून निर्दोष सुटलेला असतो. हे सर्व माहीत असूनही आपल्या मुलीने त्याच्याशी लग्न करावे हे शोभाताईंना पटतच नाही. त्यामुळे मुलीचा आणि तिच्या लग्नाचा विषय निघाला की, त्यांच्या पोटात वेदना होतात.



वेदनेचे हे खरे कारण पुढे आल्यानंतर डाॅक्टर सल्ला देतात की, तुमची मुलगी स्वतंत्र विचारांची आहे आणि नाथाणीने तिच्याशी लग्नानंतर गैरवर्तन केले तर ती खपवून घेणारच नाही. यानंतर शोभाताईंना डाॅक्टर जो मोलाचा सल्ला देतात तो त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी मालिकेचा दहावा भाग यूट्यूबवर अवश्य पहा.



शेवटी शोभाताई चाकांची खुर्ची केबिनमध्येच सोडून स्वतःच्या पायाने चालत बाहेर जातात.आपल्या पायात बळ असूनही आभासी वेदनेपायी आपण असेच व्हीलचेअरवरून फिरत असतो. परंतु या वेदनेकडे साक्षीभावाने पाहता आले तर खुर्चीची चाके थेट पायांनाच लावता येतील.


विनोद जैतमहाल यांचे इतर ब्लॉग


BLOG: 'बायपोलर'


BLOG | इमर्जन्सी


BLOG : नो प्रिस्क्रिप्शन..


BLOG : यांना झालंय तरी काय?