आज माणसाचे मन आधीच विक्षिप्त झालेले आहे. त्याला आणखी बावचळून टाकण्याचे काम टीव्ही आणि ओटीटीवरील बर्याच मालिका इमानदारीने करतात. परंतु दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी जेव्हा एखादी टीव्ही मालिका घेऊन येतात तेव्हा तिला निश्चित दिशा आणि उद्देश असतो. सध्या 'एबीपी माझा' या बातम्यांच्या वाहिनीवर त्यांची मालिका सुरू आहे. नांदेड येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नंदू मुलमुले यांच्या अनुभवांवर आधारित 'मन सुद्ध तुझं' ही मालिका दर रविवारी सकाळी साडेदहा वाजता दाखवली जाते.
मन म्हणजे काय? हा प्रश्न सतत माणसाला छळतो. त्यावर फ्राइड, पावलाव आणि इतर असंख्य शास्त्रज्ञांनी अचाट प्रयोग करून मनाचे वागणे समजून घेण्याचा प्रयत्न केला. तरी हे विचित्र 'मन' पूर्णपणे हाती लागलेले नाही. मन जरी उभ्या पिकातलं ढोर आणि जहरी आहे तरी त्यावर बर्यापैकी उपचार आज करता येतात.
अंधारात कीड लागलेली वस्तू उघड्यावर, लख्ख उन्हात आणून ठेवली की त्यातली कीड मरून जाते. तेच काम ही मालिका सध्या करत आहे. मनावर प्रखर जाणीवेचा उजेड टाकला की त्याच्या गाठी स्पष्टपणे दिसू लागतात. त्या गाठी उकलण्याचे काम मनाचे डॉक्टर आणि रुग्ण मिळून करतात.
आत्महत्या, खून, छळवाद किंवा हिंसेच्या प्रत्येक घटनेमागे एक आजारी मन असते. ते लवकर ओळखण्याचे प्रशिक्षण घरातील प्रत्येकाला मिळाले पाहिजे. तसे प्रयत्न टीव्ही या माध्यमातून मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी यापूर्वी केले आहेत. मात्र हे काम सतत सुरू नाही.
सामान्य माणसांनी केलेले गुन्हे, एकमेकांचा आयुष्यभर केलेला छळ अशा गोष्टी सांगणार्या मालिका सतत सुरू आहेत. त्यात एका दिवसाचाही खंड पडलेला नाही. या मालिकांना मसाला पुरवणारे माणसाचे 'मन' मात्र तसेच आजारी, दुर्लक्षित राहते. त्याकडे मोठ्या करुणामय दृष्टीने 'मन सुद्ध तुझं' ही मालिका पाहते. त्यावर सहानुभूतीने उपाय सांगते.
भारतात मनाच्या डॉक्टरांची संख्या अतिशय कमी आहे. घरात कुणी आजारी असेल तर आपण पटकन जवळचा दवाखाना गाठतो. पण मानसिक आजार असेल तर चार लोकांना फोन करून विचारावे लागते की, "मनाचा डॉक्टर कुठे आहे?" या गंभीर प्रश्नाकडे मनोरंजक पद्धतीने लक्ष वेधण्याचे काम चंद्रकांत कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी करत आहेत.
स्वप्नील जोशी हा अत्यंत चतुर आणि चतुरस्र अभिनेता मानसोपचारतज्ज्ञाच्या भूमिकेत आहे. इतर अनुभवी कलावंत प्रत्येक भागात आपले मन उघडे करत आहेत. दासू यांचे शीर्षक गीत आणि अशोक पत्की यांचे संगीत आठवडाभर मनात घर करून राहते आणि पुन्हा रविवारी ऐकू येते.
शरीराचा सूक्ष्म भाग म्हणजे मन आणि मनाचा स्थूल भाग म्हणजे शरीर. या दोन्ही टोकांना सामावून घेणारी ही मालिका सर्वांनी जरूर पहावी. त्यासाठी मोबाइलमध्ये साप्ताहिक अलार्म लावावा. कारण अलार्म आपल्याला खडबडून जागे करण्यासाठीच असतो.