मला एक मित्र म्हणाला होता की, "सरकारने प्रत्येकाच्या बँक खात्यात एकेक कोटी रुपये टाकले तर किती बरे होईल?" त्यावर मी म्हणालो की, "असे झाले तर कुणीच कुणासाठी काम करणार नाही. मुळात काम करण्याची प्रेरणाच नष्ट होईल. लोक आळशी आणि मंद होतील." माणसाची बुद्धी तेव्हाच काम करते जेव्हा तिच्यापुढे संकटे, आव्हाने उभी राहतात. आईवडिलांनी अशी सर्व संकटे आणि आव्हाने नष्ट केलेल्या एका मुलाची गोष्ट 'मन सुद्ध तुझं' या मालिकेच्या सहाव्या भागात येते. ही मालिका सध्या एबीपी माझा वृत्तवाहिनीवर सुरू आहे.


डाॅक्टर असलेले गायतोंडे हे दाम्पत्य आपला मुलगा समीरला मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन येतात. समीर बारावी सायन्सला असतो. "त्याचा सर्व उत्साह मावळला आहे आणि त्याला उत्साहाचे औषध द्या", असे त्याची आई म्हणते. समीरच्या पालकांनी त्याचा जन्मही मुहूर्त पाहून सिझेरियनद्वारे घडवलेला असतो. लहानपासूनच त्याचे आयुष्य आखीव-रेखीव करण्याच्या नादात वेळापत्रकाच्या दोराने समीरला करकचून बांधलेले असते. सकाळी पाच ते रात्री झोपेपर्यंत टेनिस, गिटार, शिकवणी, क्लासेसचा भडीमार सुरू असतो. 

कसलाही संघर्ष समीरला करावा लागू नये म्हणून पालकांचा आटापिटा सुरू असतो. एका मोठ्या मेडिकल काॅलेजमध्ये पैसे भरून त्याचा प्रवेशही निश्चित केलेला असतो. येथे मात्र समीरचा उत्साह संपतो. त्याचे म्हणणे असते की, "मला स्वतःच्या बळावर अभ्यास करून प्रवेश मिळवता आला असता. पण पालकांनी माझ्यावर अविश्वास  दाखवला." पालकांनी त्याच्या संघर्षातली मजाच घालवून टाकलेली असते. 

मग डाॅक्टर पालकांना समजावतात की, "मुलांना जे हवंय ते देणं म्हणजे प्रेम नाही, तर मुलांना जे हवंय ते मिळवण्यासाठी सक्षम करणं म्हणजे प्रेम."
त्यावरही पालक काही औषध वगैरे देता का म्हणून विचारतात आणि डाॅक्टर म्हणतात,"नो प्रिस्क्रिप्शन".

मुलांचे अतिसंरक्षण करणार्‍या पालकांचे डोळे उघडणारा हा भाग आहे. अशा मुलांना शाळेने विज्ञानाचा काही प्रोजेक्ट करायला सांगितला तर ते दुकानातून आयता प्रोजेक्ट घेऊन येतात आणि त्यासोबत दिलेल्या आकृतीत पाहून मुले घरी फक्त जोडणी करतात. 

मुलांना स्वतंत्र विचार करण्यासाठी वेळ मिळाला नाही किंवा त्यांच्यापुढे अडचणीच उभ्या राहिल्या नाही तर विचार करण्याची क्षमता कमी होत जाते. अभाव, कमतरता, संकटे यातूनच बुद्धीला गती मिळते. अन्यथा या मुलांकडे परीक्षेतील मार्क भरपूर आणि गुणांचा दुष्काळ असतो.

शिक्षक जेव्हा मुलांना काही आव्हानात्मक प्रश्न विचारतात तेव्हा जी काही भन्नाट उत्तरे येतात ती पालकांनी एकदा ऐकावी. मुलांचा विकास व्हावा असे वाटत असेल तर पालकांना एकच सल्ला देता येईल की, "थोडे बाजूला व्हा."


BLOG : यांना झालंय तरी काय?


BLOG | सवाल उतने नहीं हैं...