रस्त्यावर एखादा छोटासा अपघात झाला तरी त्यात जखमी व्यक्तीला मदत करण्याऐवजी अपघाताला जबाबदार कोण? हे शोधून त्याला धोपटण्याची सरधोपट पद्धत आपल्याकडे आहे. जे घडले आहे ते जसेच्या तसे पाहता आले तरच खरी 'दृष्टी' लाभली असे म्हणता येईल. 'मन सुद्ध तुझं' या मालिकेच्या सातव्या भागात आत्महत्या करू पाहणार्‍या अशाच एका आजीची गोष्ट येते. ही मालिका सध्या एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर सुरू आहे.


क्लिनिक बंद करण्याच्या वेळेला म्हणजे रात्री मानसतज्ञ डॉ. उदय देशपांडे यांना एका अनोळखी नंबरवरून फोन येतो. पलीकडून कुणीच बोलत नाही. फक्त हुंदक्यांचा आवाज. डॉक्टरांच्या लक्षात येते की, पलीकडे कुणीतरी त्रस्त व्यक्ती आहे आणि तिला आपल्या मदतीची गरज आहे. फोन कट होतो. त्या रात्री रीसर्च पेपर लिहिण्यासाठी डॉक्टर दवाखान्यातच थांबतात. पुन्हा रात्री दोन वाजता तोच फोन येतो. या वेळी मात्र पलीकडून एक बाई बोलतात. त्या नाव, गाव आधी सांगत नाहीत, पण त्यांना आत्महत्या करायची आहे, असे सांगतात. हळूहळू डॉक्टर त्यांना बोलते करतात तेव्हा कळते की, त्या सुनीता सबनीस आहेत. त्यांचा मुलगा व सून परदेशात नोकरी करतात. परंतु नातू आपल्या जवळ रहावा म्हणून सुनीताबाईंनी त्याला दिल्लीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला लावलेला असतो. दरम्यान दोन वर्षांपूर्वी सुनिताबाई एका स्नेहसंमेलनाला बाहेरगावी जातात आणि इकडे दिल्लीत त्यांच्या नातवाचा मोटरसायकवर अपघात होतो. त्यात तो रस्त्यावरच मरतो. 


सुनीताबाई तीन दिवसांनी परत आल्यावर त्यांना नातवाबद्दल कळते. या घटनेला दोन वर्षे उलटली तरी हे दुःख कमी होत नाही. नातवाला आपण भारतात ठेवून घेतले म्हणूनच त्याचा अपघात झाला. त्याच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत, असा विचार करून त्या दररोज रडत असतात. डॉक्टरांना हे सगळे सांगून झाल्यावर झोपेच्या गोळ्या घेऊन मरण्याची त्यांची योजना असते. या आणीबाणीच्या परिस्थितीत केवळ फोनवर रुग्णाला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात डॉक्टरांचे मानसशास्त्राचे कसब पणाला लागते.


डॉक्टर त्यांना सांगतात की,"तुमचा नातू कुठेही राहिला असता तरी त्याचा अपघात होऊ शकला असता. तुम्ही मुद्दाम तो अपघात घडवून आणलेला नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार कशा ठरता?" तांदूळ सुपात घेऊन गारगोटीचे कण निवडून फेकतात. तसे आयुष्यातले प्रश्नही सुपात घेऊन त्यातले चुकीचे विचार निवडून बाजूला करावे लागतात हे सुनिताबाईंना शेवटी पटते आणि त्या आत्महत्या रद्द करतात.दुसर्‍या दिवशी सकाळी प्रसन्न चेहर्‍याने एक पुष्पगुच्छ घेऊन त्या दवाखान्यात येतात.


येथे हा सातवा भाग संपतो. जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात दुर्घटना होतात. पण त्यासाठी नकळत झालेल्या चुकांना जबाबदार धरून स्वतः किती नैराश्यात जावे याला मर्यादा असते. ही मर्यादा ओलांडली की ते 'मन शुद्ध' करण्यासाठी मानसतज्ञच लागतो.