वर्क फ्रॉम होमसाठी पुणे मार्गी धाकट्या भावाला घेऊन माझ्या नेटिव्ह प्लेसला म्हणजेच बार्शीला निघायचं होतं. न्यूजरूम मधून पुण्यात 14 तारखेस दाखल झालो होतो. काही तुरळक ऑफिसेस, IT पार्क, सार्वजनिक वाहतूक ही बंद करण्यात आलेली पुणे शहरात प्रवेश करताच दिसत होती. बार्शीतून आईचे फोन सतत चालू होते. ती म्हणायची 'माह्या मैत्रिणी चौकशी करत आहेत, तुमची मुलं घरी कधी येणार आहेत त्यांना बोलावून घ्या!' तर एकीकडे आमचे वेब टीमचे हेड त्यांच्या नेहमीच्या शैलीत व्हाट्सअप ग्रुप वर म्हणले 'HR चा पुन्हा आदेश आहे की हेडकोर्टर सोडू नका नेटिव्ह प्लेस ला जाऊ नका, शक्य झाल्यास पुन्हा न्यूजरूम ला यावं लागेल....'
परिस्थितीचा अंदाजा घेऊन पाऊलं उचलची तयारी देखील ठेवली होती. तसा धाकटा भाऊ मॅकेनिकल ऑटोमोबाईल कंपनीत कॉस्टिंग इंजिनियर असल्याने सरकार काही ठोस आदेश काढत नाही तोपर्यंत त्यांची कंपनी सुरूच होती आणि आम्ही काही पुणं सोडलं नाही. अखेर जनता कर्फ्यु आणि त्यांनतर लॉकडाऊन झालं भावाला सुट्टी जाहीर झाली. आम्ही अगदी तळ्यात मळ्यात स्वाभाविकपणे अडकून पडलो, काळजी न करता हे 21 दिवस सहजरित्या काढता येतील हा माझ्यात असलेला फाजील विश्वास पहिल्या तीन दिवसांत ढासळू लागला. कारण, पुण्यातील बहुतांश भागात विद्यार्थी, नोकरदार वर्ग, MPSC, UPSC तयारी करणारी मंडळी राहतात, अश्याच रेलचेल असलेल्या ठिकाणी माझी रहायची व्यवस्था होती.
या वर्दळीच्या भागांत पहिल्या दोन दिवसांत हळूहळू हॉटेल, मेस, खानावळ तर बंद झाल्या शिवाय, चहा प्रेमी असल्याने अमृततुल्य देखील बंद झाल्याने त्याचंही दुःख फार झालं. आम्हा भावंडांना प्रश्न होता की राहत्या ठिकाणी जेवण बनविण्याची कसलीही सोय नसताना, चालू असलेल्या घरगुती मेस, खानावळी देखील अनुक्रमे बंद झाल्या असताना करावं काय? थोडाफार आवश्यक किराणा गोळा केला पण, सुरू झाली जेवण मिळवण्यासाठीची धडपड, नेहमीच्या सर्व जागा बंद असल्याने अरुंद गल्ली मध्ये कुठंतरी एखाद्या घरासमोर 5-10 मुलामुलींची लाईन लागलेली पाहायला मिळायची. माझ्यासारखीच ही मंडळी देखील या संकटाला तोंड देत आहे हे लक्षात आले एक ते दोन किलोमीटर पायी येऊन जे दुकान किंवा घरगुती मेस सुरू आहे अशी ठिकाणं शोधायची आणि तिथं जायचं, दुसऱ्या दिवशी पोलिसांनी तेही दुकान बंद केलेलं असायचं, पुन्हा भर उन्हातली पायपीट नव्याने सुरू.
अश्यातच पोलिसांची पोलिसगिरी जरा जास्तच वाढवली असल्याने व्हायरल व्हिडीओ बघून, मुलं रस्त्यावर दिसली की काठी बसणार या भीतीचं दडपण वेगळंच, पण सगळीच मुलं टाईमपास करायला आली नाहीत हे त्यांना कोण पटवून देणार? इथून तिथून सगळ्यांना दंडुके बसू लागले. काही संस्था मग मोफत जेवायची व्यवस्था करण्यासाठी सरसावल्या पण त्यापैकी अर्ध्या केवळ प्रसिद्धीसाठी होत्या. त्यांनी सोशल मीडियावर पोस्टर्स आणि लाईक मिळवली त्यांनी पण खरे गरजू या सगळ्यातून सुटकेली मात्र दिसत नव्हती. एकीकडं पोलिसांची भीती तर एकीकडे बाहेर पडणं गरजेचं असायचं, या सगळ्या प्रश्नाच्या भोवऱ्यात त्या रांगेतील सगळी मुलं एकमेकांकडे पाहत चर्चा करत होती मात्र यावर तोडगा आज अकरा दिवस झाले तरी नाहीये. उरलेले दहा दिवस आणि कोरोनाचा विळखा जसा वाढेल तसं लॉकडाऊन देखील वाढू शकतं आणि तळ्यात ना मळ्यात अशी अडकून पडलेल्यांचा असा खोळंबा देखील वाढणार. पर्यटन कलाक्षेत्र तसेच तुमच्या आमच्या घरी काही पाहुणे अडकले असतील तर पाहुणे कधी जातील आणि मेस कधी सुरू होईल, याकडे मात्र सगळ्यांच लक्ष हे कोरोना गो होण्यापेक्षा ही जास्त नक्की लागलेलं आहे!