सतत बदलत्या इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीमुळे, 'अॅनिमेशन सेक्टर'ची प्रभावी भूमिका ई-लर्निंग, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग, तसेच मेडिकल अॅनिमेशन क्षेत्रांत पसरली असून, दरदिवशी हे सेक्टर वाढतंच आहे.
चित्रं, रेखाटनं केव्हा सुरू झालं? तर, कलावर्गात आम्हाला कलाशिक्षक एक गोष्ट सांगायचे.
पूर्वी गुराखी त्यांची असंख्य गुरं-ढोरं चरायला घेऊन जाताना, त्या गुरांची संख्या लहान-लहान दगडांनी मोजायचे. त्यासाठी ते दगडांची पिशवी सोबत ठेवत आणि परत गोठ्यात सोडताना तेच एक एक दगड पिशवीतून काढून बाहेर टाकत. जेवढे दगड शिल्लक राहिले, तेवढी गुरं हरवली, किंवा चोरी गेली याचा अंदाज त्यांना यायचा. पण ही गोष्ट सोप्पी नसायची. जेवढी गुरं जास्त, तेवढं दगडांचे ओझं जास्त. त्यांनतर रेषेचा शोध लागला आणि तो गुराखी भिंतीवर उभ्या रेषा मारून गुरांचा हिशोब ठेवू लागला. त्यानंतर, हळूहळू गुहेत चित्र साकारू लागला, यातूनच अक्षरलेखन, सुलेखन प्रकार अस्तिवात आला असावा.
जसं की आपल्याला माहीत आहे, प्रिंट मीडिया, त्यानंतर टेलिव्हिजन मीडिया आणि आत्ता इलेक्ट्रॉनिक मीडियामधील 'व्हर्च्युअल रियालिटी'ने आपल्या प्रत्येकाला एकमेकांना जवळ केलं आहे, किंबहुना बांधून ठेवलं आहे. या लॉकडाऊनच्या काळामुळे आलेलं त्यांचे महत्व आपण तितकंच समजतो. 'डिजिटल आर्ट'मधील सर्वात मोठा कोअर पार्ट म्हणजे 'ग्राफिक्स आणि अॅनिमेशन'.
आज तरुणांमध्ये क्रिएटिव्ह-इनोव्हेटिव्ह बुद्धी ही अधिक सक्षम झालेली पाहायला मिळत आहे. तर, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, ग्राफिक्स, गेमिंग, वेब डिजाईन, 3D आर्किटेक्चर/मेकॅनिकल/मेडिकल/मीडिया ते चित्रपटातील CGI मॉडेल्स या मोजक्याच, परंतु अथांग पसरलेल्या गोष्टींमध्ये हे डिजिटल आर्टचं विश्व पसरलेलं आहे. ह्या प्रत्येक प्रकारांमध्ये दरवर्षी वेगवेगळी जॉब प्रोफाईल तयार झालेल्या पाहायला मिळतात. जसं की सध्या 'VR' (virtual Reality) आभासी सत्यता प्रचलीत झालंय.
कोरोनामुळे प्रत्येक उद्योग काही प्रमाणात संकटात सापडले असताना, त्यातून आलेलं आव्हान कसं स्वीकारणार? आपण पाहिलं तर, 2018 मध्ये 3D मधील ग्लोबल मार्केट USD 13.75 Billion तर, 2025 पर्यंतचा CAGR 11% आहे, अर्थात 12 ते 27% एवढा तो होऊ शकतो. हा अंदाज दरवर्षी कायम वाढत आहे आणि पुढेही कमालीचा वाढण्याची शक्यता भरपूर आहे.
याच मुख्य कारण म्हणजे, फक्त एकेकाळी चित्रपटसृष्टीमध्येच जास्त रेलचेल असलेलं काम हे अलीकडे वेगवेगळ्या क्षेत्रांत अगदी प्रामुख्याने आपला ठसा उमटवत आहे. मेडिकल, विज्ञान तसेच ई-लर्निंग, बांधकाम उद्योग, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधील वैचारिक-काल्पनिक संकल्पना या चित्ररूपाने ग्राफिक्स, 3D, 2D माध्यमांतून अगदी प्रत्यक्षात उतरत आहेत. आणि या क्षेत्रातील रोजगार ओळखूनच यांचे पदवी शिक्षण आज कित्येक कॉलेज संस्थामधून ते वेगवेगळे कोर्सेस उपलब्ध आहेत. विद्यार्थी याचा वेगळ्या करियरमधील संधी म्हणून याकडे पाहू शकतात.
डिजिटल आर्ट, अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स यामध्ये कसं याल?
चित्रकला, छंद तसेच क्रिएटिव्ह आवड असणाऱ्या मुलांना त्यांचे पालक अगदी लहानपणापासून ई-लर्निंग माध्यमांद्वारे याचं शिक्षण देऊ शकतात. त्यानंतर 10, 12 वी झाल्यावर चित्रकला महाविद्यालयात, तर काही इतर कॉलेजमधून डिजिटल आर्ट मधील अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, ग्राफिक्स, गेमिंग, वेब डिजाईन या विषयात पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू शकता.
कमी कालावधीत उपलब्ध असलेले कोर्सेस हे महागडे आहेत, त्यामुळे झटपट यश मिळेल या विचाराने इथं प्रवेश करणे धोकादायक ठरू शकेल. कारण अभ्यास, सराव आणि तसंच कष्ट घेणं, काही काळ कलेची सेवा करणं व स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रामाणिक धडपड करणं जरुरी आहे. लॉकडाऊन काळात घरी कमी कालावधीत काही ऑनलाईन कोर्सेस घरच्या घरीच केल्यास रोजगार, तसेच डिजिटल आर्टच्या क्षेत्रात नोकरीच्या संधी आपली नक्कीच वाट पाहताना दिसून येतील.