आम्ही पुरुष सहसा मासिक पाळीबद्दल फार बोलत नाहीत. का कुणास ठावूक पण त्याबद्दल बोलताना थोडे अन इजीच असतो. मी प्युअर ग्रामीण भागातला. बारावीतल्या झूलॉजीतलं रिप्रॉडक्शन शिकेपर्यंत मासिक पाळी काय असते माहितच नव्हतं. ती बाहेर बसलीय, कारण तिला "कावळा" शिवलाय एवढंच सांगितलं जायचं. पण जेव्हा मासिक पाळीबद्दल कळलं तेव्हा वेगळीच भावना निर्माण झाली.  मासिकपाळीकडे पाहाण्याचा धर्माचा, परंपरेचा, पुरुषांचा आणि अगदी स्त्रियांचाही दृष्टीकोन किती "डोम कावळ्याचा" आहे हेही कळलं.

आजही अनेक पुरुष, महिला मासिक पाळीला "प्रॉब्लेम" संबोधतात. कधी-कधी मी सुद्धा  तिच्याशी बोलताना "प्रॉब्लेमच" म्हणतो आणि हाच खरा आपल्या सगळ्यांचा "प्रॉब्लेम" आहे. कारण त्यातून आपला दृष्टीकोन आणि परंपरेनं मनावर बिंबवलेला संस्कार डोकवत राहतो. हे सगळं लिहिण्यामागचं कारण म्हणजे मासिक पाळीच्या काळात रजा द्यावी का याबद्दल सुरु झालेली चर्चा.

धर्माने आणि परंपरेनं स्त्रीला शूद्र मानलं. त्यात मासिक पाळीतली स्त्री ही अतिशूद्रच मानली गेली. खरंतर मासिक पाळी म्हणजे तिचं विश्वनिर्मितीचं स्त्रीत्वं, पण त्यालाच उणेपणा, वैगुण्य आणि विटाळ म्हणून पाहिलं गेलं.

ज्या काळात ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असते त्याच काळात विटाळ म्हणून तिला बहिष्कृत केलं जातं. गाव खेड्यात सोडा, शहरातल्या सुशिक्षित घरातही ती आज बहिष्कृत असते. अनेक परंपरावादी याला स्वच्छतेशी जोडतात. पण ते पटण्याजोगं नाही. कारण पुरुषांची प्रात:विधी जेवढी नैसर्गिक असते तितकीच मासिक पाळीही नैसर्गिक समजायला हवी. तिला घाण समजण्यापेक्षा त्याबद्दल जागरूकता निर्माण व्हायला हवी.

रजेच्या निमित्ताने हा प्रश्नही विचारला जातोय की, आपण आता कुठे तिला बाजूला बसवण्याच्या अनिष्ट पायंड्यातून बाहेर काढतोय. यात तिला पुन्हा बाजूला बसवणं योग्य आहे का? खरंतर हा प्रश्न खूप चमकदार वगैरे आहे. पण असा प्रश्न विचारताना आपण मासिक पाळी, रजा आणि विटाळ याबद्दल काहीतरी गल्लत करतोय. तिची रजा विटाळाशी नाही तर आरोग्याशी जोडायला हवी. त्या काळात ती मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या वेगळ्या अवस्थेतून जात असते. तिच्या ओटीपोटात त्रास होत असताना, पाय ओढत असताना, शरिरातून रक्त वाहात असताना, तिला नाईलाजास्तव ड्युटी म्हणून काम करावंच लागतं. पण कुठलंही काम करत असताना मानसिक प्रसन्नता आणि सुदृढता याची आवश्यकता असते. तिला कामाचा आनंद घेता येत नसेल तर तिला रजा मिळायलाच हवी.

आपल्याकडे पुरुष आणि स्त्रीयांना ते आजारी पडू शकतात हे गृहीत धरून केवळ शक्यतेवर 'सीक लिव्ह'ची तरतूद आहे. मग महिलांना प्रत्येक महिन्यात त्या दिवसांना, त्रासाला सामोरं जावंच लागतं हे वास्तव असताना त्यासाठीची तरतूद का नको? मासिक पाळीच्या काळात तिला सुट्टी हवी असल्यास ती कोणीही नाकारु नये ही तरदूत व्हायला हवी.

अनेक ऑफिसेसमध्ये सीक लिव्ह द्यायलाही अडकाठी केली जाते. त्यासाठी सर्टिफिकेटची मागणी केली जाते. त्यामुळे सिक लिव्ह मधली सुट्टी महिलांना दर महिन्याला हक्काने घेऊ द्यावी. त्यासाठी तिला खोटी कारणं सांगायला लागू नयेत.

रजा मिळण्यासाठी बदलतं जीवनमान हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. एकत्र कुटुंबपद्धतीत तिला बाजूला बसवलं जायचं. तिच्या वाट्याची कामं घरातल्या इतर बायका करायच्या. त्यामुळे तिला कामातून विश्रांती मिळायची. एकत्र कुटुंबपद्धतीत हे शक्य होतं. आजच्या विभक्त कुटुंबपद्धतीत धकाधकीच्या जीवनशैलीत तिला त्या काळात विश्रांती मिळणं शक्य नाही. त्या नाजूक काळातही तिला घरातलं सगळं करुन, लोकलचा जीवघेण्या प्रवासात ऑफिस गाठावं लागतं. रोजच्यासारखंच परफॉर्मही करावं लागतं. मानवी शरीराची गरज म्हणून आवशक असलेली विश्रांती तिला मिळत नाही. ती मिळायला हवी इतकंच.

एरव्ही समानतेच्या गोष्टी करायच्या आणि काम करताना दुखणं कुरवाळायचं. मग कुठे गेली समानता? असा प्रश्नही काही जण विचारतील. पण समानतेबद्दल बोलणाऱ्यांमध्ये बाईसारखं आपल्याला आई होता येत नाही याचं शल्य बाळगणारा पुरुष कधी पाहिलाय का? त्याचा कमीपणा त्यांना कधी वाटतो का? म्हणून स्त्रीच्या वाट्याला आलेल्या नैसर्गिक गोष्टींचा वेगळ्या अंगाने विचार करायला हवा.

एकवेळ पुरुष हा वेगळा विचार करतील पण महिला करतील का हा प्रश्न आहे. कारण अनेक महिलांचा याला कडाडून विरोध आहे. आपण कुठे कमी नाही. सहानुभूतीची गरज नाही. आम्ही स्ट्राँग आहोत. असल्या सुट्ट्यांची गरज नाही असं म्हणणाऱ्या स्त्रीयांची संख्या बरीच आहे. स्पर्धा, महत्वाकांक्षा याच्यात अडकलेल्या आणि फेमिनिझम जोपासणाऱ्या महिला इतर महिलांचं आरोग्य वास्तव स्वीकारायला तयार नाहीत. अशा वरिष्ठ पदावरील महिला मासिक पाळीचा त्रास होतोय अशी सबब ऐकून घेतील का? म्हणून त्या रजेला कायदेशीर अधिष्ठान असायला हवं.

एकूणच काय तर प्रश्न काम झटकून देण्याचा, तिच्या कपॅसिटीचा किंवा दुखणं करवाळण्याचा नाहीय तर, नैसर्गिक गोष्टी मान्य करुन आरोग्याच्या दृष्टीने वास्तव स्वीकारण्याचा आहे. आपण ते स्वीकारून तिला म्हणायला हवं, "स्टे फ्री"!!