गुरमीत राम रहीमचं एकएक कूकर्म समोर आलं आणि देश अक्षरश: हादरुन गेला. पण त्याच्या अनेक कारनाम्यांची चर्चा होताना गुरमीत प्रकरणाने आपल्यासमोर जे असंख्य प्रश्न निर्माण केले, त्याची चर्चा होणंही तितकेचं गरजेचं आहे.


"डेरा सच्चा सौदा" ही काय भानगड आहे? याची सुरुवात का आणि कशी झाली? या डेऱ्याचे 5 कोटींपेक्षा जास्त भक्त कसे काय झाले? हे भक्त कोण आहेत? ते कुठल्या समाजघटकाशी संबंधित आहेत? गुरमीत त्यांचा देव कसा बनला? गुरमीतसाठी प्राणांचं बलिदान द्यायला ती माणसं का तयार झाली? डेऱ्याबद्दल एवढी कडवी श्रद्धा का आहे? त्यांना डेऱ्यानं असं काय दिलंय? या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधली तर आपल्याला डेऱ्यात मोठं "सामाजिक घबाड" सापडतं. म्हणून त्याचं समाजशास्त्रीय विश्लेषण होणं गरजेचं आहे. कारण प्रश्न एकट्या गुरमीतचा नाही. पाच कोटी लोकांचा आहे. गुरमीतच्या तुरुंगवासानं तीन राज्यातली सामाजिक वीण पूर्णपणे विस्कटलीय, हे आपल्याला नाकारून चालणार नाही.

डेरा आणि दलित चळवळ

विसाव्या शतकात दलितांनी आपल्या समाजिक उत्थानासाठी आणि हजारो वर्षं होत असलेल्या अन्याय आणि भेदभावापासून मुक्ती मिळण्यासाठी वेगवेगळे मार्ग धुंडाळले. मुलदास वैश्य (गुजरात) आणि विठोबा रावजी मून- पांडे (महाराष्ट्र) यांच्यासारख्या दलित नेत्यांनी उच्च जातीच्या राहाणीमानचंच अनुकरण करून जातव्यवस्थेतलं दलितांचं स्थान उंचावण्यासाठी लोकांना उद्युक्त केलं. बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांसह धर्मांतर केलं. आदि धर्मिंनी हिंदू संस्कृतीलाच आव्हान दिलं तर वायव्येतल्या पंजाब आणि हरियाणासारख्या भागात वेगवेगळ्या पंथांनी समाजातील पिचलेल्या लोकांना सामाजिक मुक्तीची हमी दिली. त्यापैकीच एक म्हणजे डेरा सच्चा सौदा!

डेऱ्याचं धार्मिक तत्वज्ञान

पंजाब हरियाणा या भागातील हिंदू, शीख आणि मुस्लिम धर्मातील जात व्यवस्थेत भरडलेले गेले लाखो लोक डेऱ्याच्या आश्रयाला आले. या पंथाचे अनुयायी झाले. यामागचं महत्वाचं कारण होतं, डेऱ्याचं धार्मिक तत्वज्ञान. जे मानवता आणि समानता या तत्वावर आधारलेलं आहे.

खरंतर डेऱ्यात जातीपातीवरून कसलाच भेदाभेद केला जात नाही. सगळ्या जातींना समावून घेणारा डेरा आश्रयाला आलेल्या प्रत्येकाला समान वागणूक देतो. इथं कोणी उच्च नाही किंवा कोणी नीच नाही. आपल्याकडे आडनावरून जात ओळखण्यात अनेकांचा हातखंडा आहे. पण डेऱ्यात अशी जात ओळखता येत नाही. कारण त्यांच्या नावापुढे शर्मा, वर्मा, अरोडा, संधू ही आडनाव न लावता "इन्सा" लावलं जातं. "इन्सानियत" म्हणजे मानवतेचं हे तत्वज्ञान लाखो लोकांना भावलं. शिवाय आपापल्या धर्मातल्या जात व्यवस्थेच्या उतरंडीत आपल्या अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या आणि दबलेल्या अनेकांना आपल्या समाजिक उत्थानाचा आणि जात मुक्तीचा डेरा हा एकमेव मार्ग वाटला. हिंदू, मुस्लिम आणि शीख धर्मातल्या मागास समाजाला हा पंथ आपला वाटण्याची अनेक कारणं आहेत. सामाजिक प्रतिष्ठेसाठी या पंथानं उचललेली पावलं पाहिली की आपल्याला त्याची उत्तरं मिळतात.

जगभरात डेरे, डेऱ्यांचा प्रमुख भंगीदास

जगभरातले डेरे वेगवेगळ्या विभागात विभागले गेले आहेत. प्रत्येक विभागाचं नेतृत्व एका व्यक्तीकडे दिलंय. त्या नेतृत्वासाठी जे पदनाम बनवलंय ते आहे "भंगीदास". खरंतर भंगी हे आपल्या समाजव्यवस्थेतले दलितांमधले दलित. इथल्या जातव्यवस्थेनं मानवी विष्ठा उचलण्याचं काम यांच्या कित्येक पिढ्यांच्या माथी मारलंय. त्यामुळे कसलीच समाजिक प्रतिष्ठा नसलेल्या जातीचं नाव विभागाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला "पदनाम" म्हणून देणं खूप महत्वाचं ठरतं.

पंथाची सामाजिक भूमिका अधोरेखित करतं. आपल्या लोकशाही व्यवस्थेत समानतेची संधी म्हणून कायद्याने आरक्षण दिलं. त्यातून त्यांना नोकरी मिळते पण इतर समाजाच्या दृष्टीने त्यांचं "भंगीपण" जात नाही हे जातवास्तव आहे.

त्यामुळे समाजव्यवस्थेची स्वप्नंवत वाटणारी ही मांडणी प्रत्यक्षात उतरत असेल, पिढ्यानपिढ्या हेटाळणी सहन करणाऱ्या समाजाला समाजिक प्रतिष्ठा मिळत असेल तर त्या समाजाला तो पंथ आपला वाटणं स्वाभाविक आहे. त्यामुळे दलितांमधले अनेक जातीसमूह या पंथाकडे आकर्षित झाले.

जातिनिर्मूलनाला आध्यात्म, सामाजिक कामांची जोड 

जातीनिर्मूलनाला अध्यात्माची जोड देत डेरा सच्चा सौदानं अनेक समाजोपयोगी कामंही हाती घेतली. गरीबांना शिक्षण, लग्नं यासाठी आर्थिक मदत देणं, मोफत आरोग्य सेवा देणं, अपंग आणि मनोरुग्णांना अनेक सुविधा पुरवणं ही कामं डेऱ्याकडून केली जातात. शिवाय रक्तदान, नेत्रदान, शरीरदान यासाठी लोकांना प्रेरीत करण्याबरोबरच नशामुक्ती, स्त्री भ्रूणहत्येबद्दल जनजागृती, तृतियपंथियांना समाजाच्या प्रवाहात आणणं, शरीरविक्री करणाऱ्या महिलांना डेरा प्रमुखांकडून मुलीचा दर्जा देणं, झाडे लावणं, स्वच्छता अभियान राबवणं असे कितीतरी उपक्रम या डेऱ्यांमार्फत राबवले जातात. त्याचं योग्य मार्केटिंग केलं जातं. बाबा राम रहीमकडून या सामाजिक कामांचा वापर न्यायालयात पापक्षालनासाठी करण्याचा प्रयत्नही झाला. पण त्याचा उपयोग झाला नाही.



एकिकडे जातनिर्मूलन करतानाच दुसरीकडे मुक्ती मिळवण्यासाठी अध्यात्म आणि त्याला चकचकीत समाजिक कार्याची जोड देत डेऱ्याने तथाकथित वरच्या जातीतल्या लोकांचाही विश्वास संपादन केला. त्यामुळेच डेरा सच्चा सौदा ही जणू एक समाजिक चळवऴ म्हणून नावारुपाला येऊ लागली. दिवसेंदिवस डेऱ्याच्या अनुयायांची संख्या हजारातून लाखात, लाखातून कोटीत पोहोचली. आज ती संख्या पाच कोटी असल्याचा दावा केला जातोय.

..म्हणून राम रहीमसाठी बदिलादानाची तयारी

डेऱ्यात येणारे लोक एकमेकांना अडीअडचणीत मदत करतात. अनुयायांच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी डेराही धावून जातो. खरंतर जी व्यवस्था शासन, प्रशासन आणि सिव्हिल सोसायटी यांनी करायला हवी ते सगळं डेरा करतोय. शिवाय ज्या प्रश्नांची उत्तरं डेऱ्याकडे नसतात तेव्हा डेरा पद्धतशीरपणे आध्यात्माचा आधार घेतो. त्यामुळे पाच कोटी लोकांसाठी डेरा हा केवळ आश्रम नाही तर ती त्यांची धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था आहे. हजारो लोकांची भाकरी आहे. तेच त्यांचं सर्वस्व आहे. मग त्यांच्यालेखी सरकार आणि त्यांच्या प्रशासनाचं महत्व शून्य असल्यास त्यात नवल काय?

अशावेळी बाबांवर लागलेले हे आरोप बाबांवर नाहीत तर ते आपल्या पंथावर आहेत. हा पंथाच्या अस्तित्वावरचा हल्ला आहे, आपल्यावरचा हल्ला आहे असं त्यांना वाटतं. यातून आपल्याला, आपल्या डेऱ्याला वाचवलं पाहिजे या भावनेतून कुठलंही बलिदान द्यायला ते तयार आहेत. बाबा त्याच भावनेचा पद्धतशीरपणे वापर करतोय. यात 32 जणांचे मुडदे पडले.

डेऱ्याचा इतिहास

डेरा सच्चा सौदाची स्थापना 29 एप्रिल, 1948 ला बलुचिस्थानच्या मस्ताना महाराजांनी केली. 1960 पर्यंत मस्तानाच डेरा प्रमुख होते. 1960 ते 90 अशी 30 वर्षं शाह सतनामजी महाराज डेरा प्रमुख झाले.  त्यानंतर 1990 मध्ये गुरमीत राम रहीम डेरा प्रमुख बनला. डेऱ्याची महती वाढवण्यात या तीनही प्रमुखांचा सिंहाचा वाटा आहे. पण आर्थिक भरभराट आणि तरूण अनुयायांची वाढलेली लक्षणीय संख्या ही गुरुमीत राम रहीमची किमया आहे.



90 च्या दशकात वयाच्या 23 व्या वर्षी डेरा प्रमुख बनलेल्या गुरमीतचा काळ हा आर्थिक उदारीकरणाचा होता. त्या काळात जागतिकीकरणाला अनेक जण घाबरले. जागतिकीकरणाच्या वरवंट्याखाली आपल्या संस्कृती भरडली जाईल अशी अनेकांना भीती होती. त्यामुळे अनेक संस्कृती रक्षकांनी त्यावेळी जागतिकीकरणाला कडाडून विरोध केला होता. पण गुरमीतनं काळाची पावलं बरोबर ओळखली. त्यातून त्याने भांडवलशाहीचा अंगीकार करत स्वत:चं आर्थिक साम्राज्य उभारलं. तसा गुरुमीत राम रहीम दिसायला बावळट, बटबटीत, भंपक आणि चमकेश वाटत असला तरी तो बाबा रामदेवांच्या तोडीचा बिझनसमेन आहे, हे त्यानं सिद्ध केलंय.

जगभरात डेऱ्या अंतर्गत 250 च्या आसपास आश्रम असल्याचा दावा केला जातो. त्यांची हजारो एकर जमीन आहे. त्याने सिरसामध्ये एक स्वतंत्र इंडस्ट्री उभी करून स्वत:चे प्रॉडक्ट निर्माण केले. तीन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसह आंतरराष्ट्रीय दर्जाची आय बँक त्याने उभारली. कुठल्याही स्मार्ट सिटीला लाजवेल अशा सर्व सुखसोईयुक्त डेरे उभे केले. डेऱ्यात अगदी गॅस स्टेशनपासून ते इंटरनॅशनल स्कूल, मल्टिप्लेक्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, भव्य स्टेडियम, हॉस्पिटल्स सगळं काही आहे. डेऱ्याचं 2012-13 चं वार्षीक उत्पन्न 29 कोटी होतं ते आज 50 कोटींच्या घरात पोहोचलंय. यावरून आपल्याला डेऱ्याच्या अर्थकारणाची कल्पना येते.

तरुणांना डेऱ्याशी जोडण्याची खटाटोप

आर्थिक भरभराटीसोबत डेऱ्याशी तरूणांना जोडण्याचे विशेष प्रयत्न झाले. तरुण पिढीची नस ओळखत गुरमीतनं  तरूणांना तरूणांच्याच भाषेत पंथाचं तत्वज्ञान सांगितलं. आपला संदेश पोहोचवण्यासाठी पाश्चिमात्य पॉप म्युझिकचा आधार घ्यायलासुद्धा गुरमीतनं मागेपुढे पाहिलं नाही. एकिकडे वयस्कर अनुयायांना भजन, सत्संगात मंत्रमुग्घ करत तो बाबा बनायचा तर दुसरीकडे नवमाध्यमांमधून तरुण पिढिसमोर अगदी रॉकस्टार बाबा म्हणूनही मिरवायचा. आपल्याला भलेही ते सगळं भंपक वगैरे वाटतं पण तो तरूणांपर्यंत पोहोचला हे वास्तव आहे. म्हणूनच सगळ्यात जास्त तरूण अनुयायांचा पंथ म्हणून डेरा ओळखला जातोय.



डेरा, राम रहीम आणि राजकारणी

एकूणच काय तर राम रहीमनं डेरा सच्चा सौदाचं रुपांतर जणू एका एन्टरप्राईजमध्ये केलं. आपला संदेश वेगवेगळ्या समाजघटकांपर्यंत नीट पॅकेजिंग आणि ब्रँडिंग करत पोहोचला. एक एक ग्राहक जोडत ती संख्या कोटीत नेली. त्याच संख्येच्या भांडवलावर राजकारण्यांना तो झुकवत होता. त्यांच्यासोबत उघड उघड सौदे करत होता. त्यातून त्याला स्वत:च्या पापांना तर झाकायचं होतंच, शिवाय डेऱ्याच्या साम्राज्याला राजकीय अभयही मिळवायचं होतं. राजकारण्यांनाही हा सौदा सोईचा होता. कारण केवळ एका बाबा राम रहीमच्या पायावर डोकं ठेऊन एकगठ्ठा मतांच्या बेगमीची सोय होणार असेल तर कोणाला नकोय? त्याबदल्यात राजकारण्यांनी केवळ त्याला राजकीय संरक्षण द्यायचं होतं. पण राजकारण्यांनी मतांच्या बेगमीसाठी सगळी व्यवस्थाच त्याच्या दावणीला बांधली. त्यातून आलेल्या मस्तीतून तो कायदे कचाकचा पातळी तुडवत निघाला. पिसाळलेल्या हत्तीसारखा. साध्वी बलात्कार प्रकरणात न्यायालयानं हस्तक्षेप करून कठोर भूमिका घेतली नसती, तर अगदी निर्धोकपणे केलेले बलात्कार आणि हत्या त्याने सहज पचवल्या असत्या.

सच्चा श्रद्धेचाच सौदा केला

एका क्रांतीकारी विचारानं आणि हेतूनं डेरा सच्चा सौदा हा पंथ सुरु झाला. तो बहरला. त्यातून लाखो लोकांचं जगणं सुसह्य झालं. पिचलेल्या अनेकांना नव्यानं जगण्याची संधी, प्रतिष्ठा मिळाली. पण उदात्त विचाराच्या नेतृत्वाला विकृतीची बाधा जडली आणि एका चळवळीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झालाय. त्यामुळेच आज कोट्यवधी लोक हतबल झालेत. उद्या त्यांचे डोळे उघडतील तेव्हा त्याच्या लक्षात येईल, की राम रहीमनं त्यांच्या सच्चा श्रद्धेचाच कसा सौदा केलाय.