जंजीर या चित्रपटानं अमिताभ बच्चनच्या नावाला अँग्री यंग मॅन ही बिरुदावली लागली किंवा हिंदी चित्रपटसृष्टीचा भावी सुपरस्टार म्हणून त्याची ओळख रूढ झाली, त्या वेळी मी जेमतेम पाचसहा वर्षांचाच होतो. पण त्या काळातल्या तरुणाईइतकंच माझ्याही पिढीवर अमिताभ बच्चन नावाचं गारुड झालं होतं. कदाचित दिलीपकुमार या नावाची महानता कळण्याचं ते वयही नव्हतं. पण दिलीपकुमार नावाचा एक अभिनेता किती मोठा आणि किती लोकप्रिय आहे याची पहिली कल्पना मला वयाच्या आठव्या-नवव्या वर्षी आली.


ते वर्ष होतं 1976-77. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या खांद्यावर मुंबईच्या महापौरपदाची जबाबदारी टाकली आणि त्याच वर्षी त्यांनी मुंबई महापौर चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली. परळच्या सेंट झेवियर्स मैदानावर झालेल्या पहिल्यावहिल्या महापौर चषक कबड्डीच्या फायनलला तुफान गर्दी उसळली होती. कबड्डीमहर्षी शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्यामुळं मीही त्या गर्दीचा एक भाग बनलो होतो. त्यावेळी प्रकर्षानं जाणवलेली गोष्ट म्हणजे कबड्डीवर प्रेम करणारी ती गर्दी प्रमुख पाहुणा म्हणून आलेल्या एका देखण्या मध्यमवयीन गृहस्थाच्याही प्रचंड प्रेमात आहे. त्या गृहस्थाचं नाव होतं दिलीपकुमार.


कबड्डीच्या मैदानात दिलीपकुमार या नावाचा झालेला पुकार त्या गर्दीत एक वेगळाच जोश आणि चैतन्याची लहर निर्माण करत होता. त्या गर्दीसमोर दिलीपकुमार यांनी केलेलं भाषण, आज मला आठवतही नाही. पण ते भाषणासाठी उभे राहिल्यावर लोकांनी केलेला जल्लोष आजही माझ्या आठवणीत आहे. दिलीपकुमार अभिनेत्यानं मला भारावून टाकण्याचा तो पहिलाच प्रसंग होता. मग ऐशींच्या दशकात घराघरात टेलिव्हिजन आला आणि कृष्णधवल दूरदर्शननं ‘नया दौर’मधून दिलीपकुमार यांच्या अभिनयाची पहिली ओळख करुन दिली. पण तो जमाना अमिताभ बच्चन यांचाच असल्यानं माझ्या मनावरचं त्यांचं गारुड काही कमी झालेलं नव्हतं. दूरदर्शनवर किंवा प्रभादेवीतल्या सार्वजनिक उत्सवांमधून दिलीपकुमार यांचे ‘इन्सानियत’पासून ‘राम और श्याम’पर्यंत अनेक सिनेमे मला पाहाता आले. पण थिएटर्समधून पारायणं केवळ अमिताभच्याच चित्रपटांची व्हायची. जादूगर किंवा गंगा-जमुना-सरस्वतीसारखे तद्दन भिकार चित्रपट केवळ अमिताभ यांच्यासाठी सहनही केले. त्याआधी ‘शक्ती’च्या निमित्तानं मोठ्या पडद्यावर दिलीपकुमार आणि अमिताभ यांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवली आणि अगदी ठरवूनच आपलं मत अमिताभ यांच्याच पारड्यात टाकण्याचा पक्षपातीपणाही केला.




मग वय वाढलं तसतसं कळतही गेलं की, अमिताभ बच्चन हे अभिनयात ‘रिश्ते मे बाप’ असले तरी, दिलीपकुमार हे अमिताभ यांच्यासह अभिनेत्यांच्या अनेक पिढ्यांसाठी ‘सब का बाप’ आहेत. दिलीपकुमारांच्या पुढच्या पिढीतल्या प्रत्येक कलाकारानं त्यांच्याकडून काही ना काही उधार घेतलंय किंवा दिलीपकुमार यांच्याकडून काही ना काहीतरी त्यांच्यापर्यंत झिरपलंय. मुघल-ए-आझमच्या भव्यतेइतकीच त्यांच्या अभिनयाची उंची आणि खोलीही खूप मोठी आहे. जुन्या जमान्यातल्या अनेक दिग्गज समीक्षकांनी त्याविषयी लिहूनही ठेवलंय. दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांनी एके ठिकाणी म्हटलंय की, ‘प्रत्येक कलाकाराची स्वत:ची एक शैली असते. त्यामुळं दुसऱ्या एखाद्या कलाकाराची भूमिका पाहिली की, आपण ती भूमिका कशी केली असती, याचा प्रत्येक अभिनेता कळत नकळत विचार करतो. पण दिलीपकुमारांचा कोणत्याही भूमिकेतला अभिनय हा समोरच्या अभिनेत्याला इतका भारावून टाकणारा असायचा की, त्यांच्या शैलीला पर्याय आहे असं कधी जाणवलंच नाही.’


आता अमिताभ बच्चन यांच्यासारखा नटश्रेष्ठ जर दिलीपकुमार यांच्यासमोर दंडवत घालत असेल, तर मी आणखी नवं काय सांगणार? पण 2004 सालच्या पाकिस्तान दौऱ्यानं मला दिलीपकुमार यांच्या कारकीर्दीकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. खरं तर सर्वसामान्य भारतीय पर्यटकांना पाकिस्तानचा व्हिसा मिळत नाही. पण तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘जीत लो दिल’ या मोहिमेनं टीम इंडियाच्या शिलेदारांसह आम्हा पत्रकारांनाही पाकिस्तानचा व्हिसा मिळालाच, पण पाकिस्तानातल्या विविध शहरांत मुक्तपणे फिरण्याची संधीही मिळाली.


पाकिस्तानच्या त्याच दौऱ्यातल्या पेशावर मुक्कामात क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आदिनाथ हरवंदे यांच्या साथीनं मलाही दिलीपकुमार यांच्या घराला भेट देण्याची संधी लाभली होती. पेशावरच्या किस्सा खवानी बाजारमधल्या मोहल्ला खुदादाद या गल्लीत दिलीपकुमारांचं घर आहे. जुन्या जमान्यात या परिसरातली बुजुर्ग मंडळी बाजेवर बसून, हुक्का ओढत किस्से किंवा दंतकथा रंगवून रंगवून सांगत. म्हणूनच तो किस्सा खवानी बाजार. त्याच किस्सा खवानी बाजार परिसरात जन्मलेला आणि लहानाचा मोठा झालेला युसूफ खान भारतात जाऊन इतका मोठा झाला होता की. दिलीपकुमार या नावानं त्याची स्वत:ची एक आख्यायिका तयार झाली होती. 1997 साली दस्तुरखुद्द दिलीपकुमार निशान-ए-इम्तियाझ हा पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार स्वीकारण्यासाठी इस्लामाबादला आले होते. त्यावेळी त्यांनी पेशावरमधल्या आपल्या घराच्या परिसराला धावती भेट दिली होती. त्यावेळी किस्सा खवानी बाजारात म्हणे मुंगीलाही शिरायला जागा उरली नव्हती.




भारतीय चित्रपटरसिकांना आवर्जून सांगायचं तर याच किस्सा खवानी बाजारमधल्या शाहवली कतल मार्गावर शाहरुख खानचे आजोबा जान मोहम्मद यांनी 1887 साली बांधलेली पाच मजली हवेली आहे. शाहरुखचे वडील ताज मोहम्मद यांचा जन्म तिथलाच. ते कायद्याच्या शिक्षणासाठी दिल्लीत आले आणि तिथंच स्थायिक झाले. ‘किंग खान’ आज दिल्लीची विरासत मिरवत असला तरी त्याच्या कुटुंबाची बीजं ही पेशावरच्या मातीतलीच आहेत. त्यामुळं शाहरुखची आई लहानपणी त्याच्या केसांमधून हात फिरवून, आपल्या लेकांत उद्याचा दिलीपकुमार पाहायची असं म्हणतात, त्यात काही नवल नाही. किस्सा खवानी बाजारमधल्या मोहल्ला खुदादादमधून दुम्बा गली आणि तिथून ढकी नालबंदी या मोहल्ल्यात शिरलं की, पृथ्वीराज कपूर यांची राजेशाही हवेली आपल्याला मान उंच करून पाहायला लावते. मंडळी विचार करा, पृथ्वीराज कपूर आणि दिलीपकुमार हे मुघल-ए-आझममधले दोन दिग्गज अभिनेते पेशावरच्या एकाच मातीतले एकमेकांचे सख्खे शेजारी आहेत.  


पेशावरच्या त्याच मातीला भेट दिल्यावर आम्ही पहिल्यांदा दिलीपकुमारांच्या घरी पोहोचलो. त्या वेळी अंधार पडू लागला होता. त्यामुळं ते घर सांभाळणाऱ्या मोहम्मद बादशहानं आम्हाला आत घेतलं नाही. पण घराबाहेर उभं राहून आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्याशी गप्पा मारताना माझ्या डोक्यात एकच विचार सुरु होता तो म्हणजे तब्बल 1665 किलोमीटर्स अंतरावरून मुंबईत आलेला युसूफ खान नावाचा तरुण, अभिनयाशी नातंगोतं नसतानाही इथल्या हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनयसम्राट म्हणून स्वत:चं स्थान कसं काय निर्माण करू शकतो? काय होती त्या तरुणासमोरची आव्हानं? कसा केला असेल त्यानं संघर्ष? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची तर माझ्या मदतीला आल्या त्या दस्तुरखुद्द दिलीपकुमार यांच्या विविध माध्यमांवरच्या मुलाखती.


दिलीपकुमार कसे घडले?


सुरुवातीचं आयुष्य - दिलीपकुमार यांचा जन्म दिनांक 11 डिसेंबर 1922 रोजीचा. त्यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातल्या पेशावरमध्ये झाला असला तरी, फळांच्या व्यवसायाच्या निमित्तानं त्यांचे वडील लाला गुलाम सरवर खान आणि अख्खं कुटुंब नाशिकच्या देवळालीत स्थायिक झालं होतं. दिलीपकुमार यांचं शालेय शिक्षणही देवळालीतल्या बार्नेस हायस्कूलमध्ये झालं. त्या काळात त्यांच्या वडीलांनी फळांचा ठेका घेतला होता. संत्री, सफरचंद आंबे आदी फळं देशाच्या विविध भागांमधून खरेदी करून ती देवळालीच्या बाजारात विकायचा त्यांचा व्यवसाय होता. पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांच्या व्यवसायाला फटका बसला. कारण फळांची ने-आण करण्यासाठी नेहमीच्या दहापंधराऐवजी मुश्किलीनं दोन वॅगन मिळू लागल्या. त्यामुळं दिलीपकुमार पुण्याला शिफ्ट झाले. तिथं आर्मी क्लबमध्ये त्यांनी कॅन्टिनचा व्यवसाय केला. पण डॉ. मसानी यांच्याशी झालेल्या परिचयातून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.


ब्रेक थ्रू – डॉ. मसानी यांच्या शिफारशीनं दिलीपकुमार बॉम्बे टॉकिजच्या मालकीण आणि अभिनेत्री देविकाराणी यांच्या भेटीला गेले. तोवर मायानगरी मुंबईत राहूनही दिलीपकुमार यांनी कधी चित्रपटात काम करण्याचा विचार केला नव्हता. इतकंच काय पण त्यांनी केवळ दोन चित्रपट पाहिले होते. कारण त्यांना चित्रपटाची आवड नव्हती. तसंच त्यांच्या वडीलांचा पारंपरिक विचारसरणीमुळं चित्रपटांना सक्त विरोध होता. त्यामुळं दिलीपकुमार स्वत:हून चित्रपट क्षेत्राकडे वळण्याची शक्यताच नव्हती. पण देविकाराणी यांनी देखण्या दिलीपकुमारांना पाहून पहिल्याच भेटीत त्यांना तीन वर्षांच्या कॉण्ट्रॅक्टची ऑफर दिली. ती ऑफर होती महिना एक हजार रुपये वेतन आणि वरखर्चाला दोनशे रुपये. त्या काळात राज कपूर यांना महिना 145 रुपये वेतन होतं. कपूर कुटुंबीयही मूळचं पेशावरचं. त्यामुळं दिलीपकुमारांना वाटलं की, आपल्यालाही महिन्याला जेमतेम शंभर रुपये वगैरे मिळणार. त्यामुळं निव्वळ शंभर रुपयांसाठी वडीलांची नाराजी कशाला पत्करायची म्हणून त्यांनी काही दिवस देविकाराणी यांनी दिलेली ऑफर स्वीकारलीच नाही. अखेर बॉम्बे टॉकिजमधून त्यांना पुन्हा संपर्क करण्यात आला आणि त्यांचं वेतन महिना एक हजार रुपये असल्याचा खुलासा करण्यात आला. त्या वेळी दिलीपकुमार यांनी घरची आर्थिक घडी पुन्हा नीट बसावी म्हणून ती ऑफर स्वीकारली. त्यानंतर उशिरानं का होईना, पण ही गोष्ट दिलीपकुमार यांच्या अब्बांच्या कानावर गेली. ते खूपच नाराज झाले होते. त्यानंतर बापलेकांत जवळजवळ दोन वर्ष नीट संवाद झाला नव्हता.




नाव का बदललं? – युसूफ खान हे नाव दिलीपकुमार यांनी आपल्या वडीलांच्या धाकानं बदललं. आपण चित्रपटात काम करतोय हे अब्बांना कळू नये हाच त्यामागचा हेतू होता. मैने पिटाई की डर से अपना नाम बदला था अशी आठवण त्यांनी एका मुलाखतीत सांगितली आहे. ज्वारभाटाच्या श्रेयनामावलीत तुमचं काय नाव वापरायचं अशी विचारणा झाली, त्यावर दिलीपकुमारांचं उत्तर होतं की, काहीही नाव द्या, पण माझं युसूफ खान हे नाव वापरू नका. मग जहांगीर खान, दिलीपकुमार आणि बासुदेव या तीन पर्यायांचा विचार झाला. जहांगीर खान नावाचा एक नट आधीच होता. त्यामुळं दुसरा पर्याय म्हणजे दिलीपकुमार हे नाव नक्की झालं. त्यात हिंदी लेखक भगवतीचरण वर्मा यांची भूमिका निर्णायक होती, असं ऐकिवात आहे.


इंग्रजी चित्रपटांची आवड – दिलीपकुमार यांचे पहिले तीन चित्रपट तिकीटबारीवर दणकून आपटले. त्यांच्या अभिनयावर त्या काळातल्या एकमेव फिल्म मॅगझिनमधून टीकाही झाली. त्यामुळं दिलीपकुमारांनी आपल्या करीअरकडे अधिक गांभीर्यानं पाहायला सुरुवात केली. त्यांनी चित्रपटाचं तंत्र आणि अभिनयाचा अभ्यास करण्यासाठी इंग्रजी चित्रपट बघण्याचा धडाकाच लावला. इन्ग्रिड बर्गमन, जेम्स स्टुअर्ट, पॉल म्युनी आणि गॅरी कूपर हे त्यांचे अभिनयातले आदर्श होते. जेमतेम दोन चित्रपट पाहणारा अवलिया एकाच चित्रपटाचे दिवसाला तीन-तीन शोज बघायचा. साडेतीन, साडेसहा आणि साडेनऊ. पहिल्यांदा पाहून चित्रपटाची गोष्ट समजून जायची, पण ही इंग्रजी चित्रपटातली ही मंडळी नेमकं काय करतात जे आपण करत नाही, हा त्यांचा ध्यास कायम असायचा. त्याच ध्यासातून त्यांनी इन्ग्रिड बर्गमनचा एक चित्रपट तब्बल एकवीसवेळा पाहिला. जेम्स स्टुअर्टचा हार्वे त्यांनी नऊवेळा पाहिला. तो चित्रपट म्हणजे अभिनय कसा करायचा याचं पाठ्यपुस्तक आहे, असं दिलीपकुमारांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. जेम्स स्टुअर्ट यांनी वयाच्या 67व्या वर्षी या चित्रपटातल्या प्रसंगांचा रंगमंचीय अवतार सादर केला होता. त्याची ड्रेस रिहर्सल पाहण्यासाठी दिलीपकुमार एक आठवडा लंडनमध्ये दाखल झाले होते. मग प्रत्यक्ष प्रयोगात जेम्स स्टुअर्टचा अभिनय आणि त्यांना मिळालेल्या नऊ कर्टन कॉल्सची आठवण सांगताना दिलीपकुमार भारावून जातात.


मोजकं काम – हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार ठरूनही दिलीपकुमार यांनी भरमसाठ चित्रपट करणं आवर्जून टाळलं. त्यांनी 54 वर्षांच्या कारकीर्दीत फक्त 61 चित्रपटांमध्ये काम केलं. त्याच काळात राज कपूर आणि देव आनंद यांनी शंभरेक चित्रपटांमधून काम केली. त्याविषयी छेडलं असता दिलीपकुमारांनी म्हटलं होतं की, एक साथ ज्यादा काम मुझसे नही होता है. लोग एक साथ आठदस फिल्मे कैसे करते है, मुझे नही पता. एक कलाकार का एक्स्पोजर ज्यादा नही होना चाहिए. सुबह, शाम और रात मे एकही कलाकार दिखे तो उस कलाकार की ज्यादा दिनतक अहमियत नही रहती.


प्यासा आणि लॉरेन्स ऑफ अरेबिया का नाकारला? – दिलीपकुमारांनी गुरुदत्तचा प्यासा आणि डेव्हिड लीनचा लॉरेन्स ऑफ अरेबिया नाकारल्याची कारणंही आपल्या मुलाखतींमधून सांगितली आहेत. चित्रपटाची गोष्ट काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय ते कोणताही चित्रपट स्वीकारायचे नाहीत. गुरुदत्त यांच्या प्यासाची गोष्ट ऐकल्यावर त्यांच्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे प्यासाचा नायक आणि देवदास यांच्या व्यक्तिमत्वांमध्ये कमालीचं साम्य आहे. ज्या कारणांनी देवदास व्यसनाधीन होतो, त्याच कारणांनी प्यासाचा नायकही मद्याच्या आहारी जातो याची कल्पना आल्यावर त्यांनी प्यासा स्वीकारायचं टाळलं. लॉरेन्स ऑफ अरेबियाची ऑफर आली, त्या वेळी आपल्या हाती आधीच तीनचार चित्रपट होते. त्यामुळं एकाचवेळी इधर उधर तवज्जू देण्याची आपली तयारी नव्हती, असं दिलीपकुमार स्पष्ट सांगतात. त्यामुळं त्यांनी लॉरेन्स ऑफ अरेबियातली भूमिका नाकारली. ती भूमिका मग इजिप्तच्या ओमर शरिफ या प्रसिद्ध अभिनेत्यानं केली. त्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता म्हणून ऑस्करला नामांकनही झालं होतं.


ट्रॅजेडी किंग – दिलीपकुमार यांचा १९४७ साली जुगनू हा चित्रपट हिट झाला आणि त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमधून शोकात्म नायकांच्याच भूमिका सादर केल्या. त्यामुळं लोकांनी त्यांना ट्रॅजेडी किंग हा किताब बहाल केला होता. गुडीगुडी चित्रपटांच्या तुलनेत शोकांतिका असलेल्या चित्रपटांच्या कहाण्या, त्यातलं नाट्य खोलवर परिणाम करणारं असतं. त्या तुलनेत आनंदाची भावना लवकर विरून जाते असं दिलीपकुमार यांनी सांगितलं. पण त्याच वेळी शोकांतिका असलेल्या चित्रपटांमधून सातत्यानं केलेलं काम आणि प्रत्येक चित्रपटासाठी कठोर मेहनत घेण्याचा शिरस्ता याचा आपल्या मानसिकतेवर गंभीर परिणाम झाल्याचंही दिलीपकुमार यांनी मान्य केलं आहे. त्यासाठी त्यांना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्लादेखील घ्यावा लागला होता. त्यांनीच दिलेल्या सल्ल्यानुसार दिलीपकुमारांनी पुढच्या काळात राम और श्यामसारख्या हलक्याफुलक्या आणि विनोदी अंगानं जाणाऱ्या भूमिका केल्या.


अभिनेत्यानं पाळायची पथ्यं – दिलीपकुमार यांनी म्हटलंय की, एक कलाकार म्हणून वारेमाप एक्स्पोजर टाळायला हवं. त्यासाठी एकावेळी मोजकेच चित्रपट करायला हवेत. आपल्या अभिनयाची एक शैली बनवणं टाळायला हवं. मी नावं घेणार नाही, पण काही अभिनेत्यांनी भूमिका, त्यांच्या कॅरेक्टरचं नाव वेगवेगळं असलं तरी त्या भूमिका एकाच पद्धतीनं केलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. त्याऐवजी मोजकं काम आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका फार आवश्यक आहे.


सर्वात कठीण भूमिका – दिलीपकुमारांच्या मते, त्यांची ‘मुघल ए आझम’मधली जहांगीरची भूमिका सर्वात कठीण होती. कारण ती भूमिका कोणावर बेतायची याचा नेमका ठाव घेता येत नव्हता. त्यामुळं त्या भूमिकेसाठी त्यांना खूप मेहनत करावी लागली.


गंगा जमना – दिलीपकुमार यांची निर्मिती असलेला एकमेव चित्रपट. या चित्रपटात जमनाची भूमिका दिलीपकुमार यांच्या धाकट्या भावानं म्हणजे नासिरखाननं केली होती. गंगा या कॅरेक्टरची बोली आत्मसात करण्यासाठी देवळालीच्या बंगल्यातल्या माळ्याला नजरेसमोर ठेवलं होतं. दिलीपकुमार यांची हीच भूमिका अमिताभ बच्चन यांना अधिक उल्लेखनीय वाटते. त्याचं कारण सांगताना त्यांनी म्हटलं होतं की, दिलीपकुमारांच्या सर्वश्रेष्ठतेविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही. पण त्यांच्या अभिनय क्षमतेविषयी सगळ्यात अप्रूप वाटतं ते त्यांच्या गंगा जमना या सिनेमातल्या भूमिकेविषयी. गंगाची भूमिका निभावताना त्यांनी उत्तर प्रदेशमधल्या अवधी बोलीभाषेचा लहजा नेमका पकडला आहे.


कोणत्या एका कलाकारासमोर आपण खुजे आहोत असं वाटलं? – दिलीपकुमार यांनी एके ठिकाणी म्हटलंय की, मी प्रत्येक कलाकारासमोर नेहमीच स्वत:ला छोटं मानलं. मी आपल्याच भूमिकेच्या तयारीत इतका व्यस्त असायचो की, कधीच कुणाशी स्पर्धा आहे असं मानलं नाही. पृथ्वीराज कपूर, मोतीलाल आणि अशोककुमार यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकारांनी मला नेहमीच सांभाळून घेतलं. मुघल ए आझमच्या चित्रिकरणादरम्यान, तर एकदा माझं डोकं दुखत होतं तर पृथ्वीराज कपूर यांनी ते चेपून दिलं. मला कोणत्याही कलाकाराची कधी भीती वाटली नाही. पण बालकलाकारांनी मला अनेकदा गोंधळात टाकलं आहे. कारण ते कधी काय करतील, ते सांगता येत नाही. अशा वेळी तुम्हाला रिअॅक्शन द्यायची ते उमगत नाही. काही काही कलाकारांच्या अभिनयात इतकी सहजता असते, त्यांचं टायमिंग इतकं अचूक असतं की, त्यांच्यासोबतच्या प्रसंगांत समतोल राखण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करायला लागते. माझ्यासाठी नलिनी जयवंत ही त्या पद्धतीची कलाकार होती. तिच्यासोबत काम करताना पहिल्या रिहर्सलपासून सांभाळून राहावं लागायचं. तिचे डोळे, तिची नजर, तिचं बोलणं यात कमालीची सहजता असायची. तिच्यासारखी दुसरी कलाकार मी पाहिली नाही.


कलाकारानं सार्वजनिक जीवनात काय पथ्यं पाळावीत? – या प्रश्नावर दिलीपकुमार यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं, ‘एका अभिनेत्यानं आपल्या कामापलिकडे एक माणूस म्हणून ओळख मिळवणंही महत्त्वाचं असतं. चित्रपट तुम्हाला नाव आणि प्रसिद्धी मिळवून देतात. पण कधी कधी नाव आणि प्रसिद्धी इतक्या लवकर किंवा इतक्या कमी वयात मिळते की, त्यामुळं डोक्यात हवा जाण्याची भीती असते. अतिप्रसिद्धी ही एखाद्या विकारासारखी असते. ती मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी चांगली नाही. कधी कधी प्रसिद्धीची हवा डोक्यात गेली की, तुम्ही जमिनीच्या चार बोटं चालू लागता. या विकारावर इलाज एकच हृदयातला माणुसकीचा ओलावा कायम राखणं. त्यासाठी सामाजिक कामाला स्वत:ला जुंपून घेण्यासारखं दुसरं औषध नाही. मी स्वत: अंध आणि अनाथ मुलांच्या मदतीसाठी कार्यरत असतो ते त्याच कारणांनी.’


दिलीपकुमार आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या या शब्दांमधून तुम्हाआम्हा सगळ्यांनाच खूप काही शिकण्यासारखं आहे.