माणूस आपल्यातून निघून जातो.
ती व्यक्ती निघून गेल्यावर काय उरतं?
त्याचं काम.
ते काम किती मोठं.. किती महत्वाचं.. त्यात त्याची प्रतिभा दिसत राहते. आज रामलक्ष्मण गेल्याची बातमी आल्यानंतर असंच झालं. संगीतकार रामलक्ष्मण म्हणजेच आपले विजय पाटील. 
खरंतर, त्यांनी केलेलं काम वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कानावर पडत गेलं होतं. वय वाढत गेलं असलं, तरी वर्षानुवर्षं भवतालच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात रामलक्ष्मण यांचं संगीत वाजत असतं. आजही. वर्षानुवर्षं ही जादू कायम आहे. ही असते कालातीत प्रतिभा. 
कशी गंमत असते, मैने प्यार किया, हम आपके है कौन आदी सिनेमांनी या संगीतकाराला जगभरात पोचवलं. या संगीतकाराने अस्सल भारतीय बनावटीची गाणी तयार केली आणि लोकांच्या मनामनांत कायमची कोरली.  


सहज मनात येतं, सलमान खानला एसपी बालसुब्रमण्यम यांचा आवाज फिट कुणी बसवला? हा आवाज मिळाला राजश्री प्रॉडक्शन्सच्या गाण्यांनी. म्हणजे अर्थातच हे श्रेय जातं रामलक्ष्मण यांना. पुढे कित्येक वर्षं वेगवेगळ्या सिनेमाचे वेगवेगळे संगीतकार सलमानसाठी एसपींना बोलावू लागले. आता सलमानसाठी एसपींचं सिलेक्शन कसं झालं.. त्यांचंच नाव का आलं.. चिकन्याचुपड्या सलमानला त्यावेळी एसपींसारखा भारदस्त आणि अस्खलित उच्चारांचा आवाज देण्यामागचं कारण काय होतं..  हे विचार करायला लावणारं आहे. 


वाद्यवृंदाचं अफाट ज्ञान. पियानो, एकॉर्डिअनवर लीलया फिरणाऱ्या बोटांनी बघता बघता इतिहास रचला. बॅक टू बॅक हिट गाणी. मैने प्यार किया, पत्थर के फूल, सातवां आसमान, हम आपके है कौन, 100 डेज, हम साथ साथ है, हम से बढकर कौन.. असे कित्येक सिनेमे. आता हम से बढकर कौन असं म्हटल्यावर कदाचित 100 पैकी 90 लोकांना म्हणजे कुठलं गाणं ते आठवणार नाही. पण जवळपास साडेतीन दशकांनंतरही यातलं देवा हो देवा गणपती देवा.. तुमसे बढकर कौन.. हे गाणं भारतातल्या प्रत्येक गल्लीत वाजतं. या गेलेल्या काळात बाप्पाची इतर गाणी आली नाहीत असं नाही. पण या गाण्यानं आपलं रेटिंग कायम ठेवलं होतं. आजही मोबाईलवरच्या गाण्यांच्या एपवर सलमान-माधुरीच्या हिट गाण्याचा पर्याय टाकला तर त्याच्या पहिल्या दहा गाण्यांत रामलक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेली किमान तीन गाणी असतात. 


मुद्दा फक्त हिंदी गाण्यांचा नाहीच. व्यक्तीश: वाटतं हा संगीतकार मराठी-हिंदी संगीत देताना परकाया प्रवेश करत असावा. या दोन्ही भाषांमधल्या गाण्यांची ठेवण, त्यांचा ठसका इतका वेगळा वाटतो. दादा कोंडकेंच्या चित्रपटातली कोणतीही गाणी घेता येतील. पांडू हवालदारपासून अनेक.  हळद-रुसली कुंकू हसलं, राम राम गंगाराम अशी सगळी. ही गाणी करताना रामलक्ष्मण यांनी मराठी बाज सोडला नाही. प्रयोग त्यांनाही करता आले असते. पण सिनेमाची ठेवण लक्षात घेऊन या संगीतकाराने तशीच इरसाल गाणी दिली. जी आजही ऐकली जातात. ही गाणी ऐकून या संगीतकाराचा हिंदी मोड ऑन केला की पूर्ण वेगळ्या बनावटीची गाणी ऐकायला मिळतात. ही प्रतिभाच .. दुसरं काय?


इतकं कशाला, संगीतकार जोड्या आपल्याकडे नव्या नाहीत. अगदीच अलिकडचं उदाहरण द्यायचं तर नदीम-श्रवण, जतीन-ललीत, साजिद-वाजिद अशा कितीतरी लोकांनी एकापेक्षा एक चांगली गाणी दिली.. पण जोवर ही मंडळी एकत्र होती तोवरच. या जोड्या फुटल्या आणि यांचं काम थांबलं. ताांत्रिकदृष्ट्या प्रत्येकजण काम करत असेलच. पण यांचे सिनेमे येणं थांबलं. रामलक्ष्मण यांच्याबाबतीत काय घडलं? सुरेंद्र हेंद्रे यांच्यासोबत जेव्हा विजय पाटील यांनी संगीतक्षेत्रात आगमन केलं तेव्हा त्यांनी राम-लक्ष्मण असं नाव धारण करून कामाला सुरूवात केली. पण दुर्दैवाने हेंद्रे यांचं लवकर निधन झालं. त्यानियमानं ही जोडी सुटली होती. इथे तसं झालं नाही. विजय पाटील यांनी हेच नाव आपल्या खांद्यावर घेतलं. रामलक्ष्मण नावानं. त्यानंतर पुढे वाटचाल केली ती पुढे किमान 25 वर्षं. हे नाव जिवंत राहिलं. घराघरांत पोचलं. अनेकांना आजही रामलक्ष्मण हा एकच माणूस आहे हे माहीत नाही. ते साहजिकच आहे. कारण, हा संगीतकार तब्येतीच्या कारणांमुळे फारसा माध्यमांसमोर आला नाही. त्यांना भेटण्याचा योग आला तो दोन वर्षांपूर्वी. 


राज्य सरकारने अत्यंत प्रतिष्ठित असा लता मंगेशकर पुरस्कार रामलक्ष्मण यांना जाहीर केला. त्यावेळी दादरच्या त्यांच्या घरी त्यांची भेट झाली. तब्येतीच्या कारणामुळे त्यांना बोलताना त्रास होत होता. समजत सगळं होतं. त्यांचा मुलगा अमर त्यांना मदत करत होता. 


रामलक्ष्मण यांना त्यावेळी बोलता आलं असतं तर कितीतरी प्रश्न विचारता आले असते असं वाटून गेलं तेव्हाही. यू ट्यूबवर एबीपी माझाशी केलेली ती बातचित आहे. ती पाहताना लक्षात येतं, की या माणसाला खूप बोलायचंय. त्यांच्या डोळ्यात ते दिसतं.. पण मर्यादा येतायत. 
खरं सांगायचं तर त्यांनी आपलं काम करून ठेवलेलं आहे. आता आपण फक्त जिथून जमेल तिथून त्यातलं ओंजळभर काम घ्यायचं आणि ते न्याहाळत बसायचं. 
धमाल उडवून दिली होती त्यांच्या गाण्यांनी. 
इतकं यश.. इतकी प्रसिद्धी.. इतकं ग्लॅमर..सोबत लता मंगेशकर यांच्यासारख्या आवाजाचा परीसस्पर्श.. असं असूनही सगळी देणी देऊन शांत असलेल्या व्रतस्थासारखेच मला ते तेव्हा वाटले. 
आज विजय पाटील गेल्याची बातमी कळली. 
मोठा माणूस गेला राव. 
रामा-लक्ष्मणाने घेतलेला वसा राम वाटेतून निघून गेल्यावरही लक्ष्मणाने अर्ध्यावर सोडला नाही. त्या नावाला स्वत: च्या खांद्यावर घेऊन पुढची काही दशकं सतत नवनिर्मिती तो करत राहिला. जणू यातल्या रामाने आपली प्रतिभा लक्ष्मणाला देऊ केली होती. 
आज ती प्रतिभा निमाली 
श्रद्धांजली.