पुरुषी आवाज, स्त्रियांचे वस्त्र, लाल भडक लिपस्टिक, चेहऱ्यावर पावडरचा लेप, केसाला गंगावन नाहीतर मग असले तर लांब केस. घंटानाद व्हावा तसा टाळ्यांचा आवाज. कधी-कधी ही समोरची व्यक्ती नक्की कोण? हे ओळखणंसुद्ध कठीण होऊन बसतं.
आजवर आपण बऱ्याचदा अशा लोकांच्या समोर येतो की त्यांना पाहून विचार न करता एक तर हसतो, पुटपुटतो, शांत बसून एकदा नजर फिरवतो किंवा पैशांची त्यांनी मागणी केली तर डोक्याला जास्त ताण नको म्हणून चटकण चिल्लर नाहीतर नोट काढून देतो. पण बऱ्याचदा लहान मुलांनी असं कोणी तरी पाहिलं की लगेच कुतूहल जागं होतं आणि ‘हे नेमके कोण?’ हा प्रश्न त्यांना सतावत राहतो. आता थोडं मोठं झाल्यावर ह्या लोकांच नाव कळतं. बऱ्यापैकी ओळखण्याची अक्कल पण येते. त्यापुढे मात्र आपण या लोकांबद्दल विचार करत नाही किंवा मग त्यांना समाजाचा एक उपेक्षित घटक म्हणून सोडून देतो.
जेव्हा एक दिवस या लोकांमध्ये जाण्याचा योग मला मिळाला, तेव्हा लहानपणीपासूनच्या सगळ्या शंका यांना विचारुन निरसन करायचं ठरवलं. एका बातमीच्या निमित्ताने मालाडमधील मालवणच्या तृतीयपंथीयांच्या (दुर्दैवाने काहीजण ज्यांना ‘हिजडा’म्हणतात, त्यांच्या भागात) वस्तीत गेलो.
खरं सांगायचं तर अशा लोकांना फक्त सार्वजनिक ठिकाणाशिवाय इतरत्र बघितलं नव्हतं. जेव्हा बघितलं होतं तेव्हा त्यांच्या हातात पैसे ठेवून बाजूला झालो. ‘त्यांच्या नादाला जास्त लागू नये’ असं बऱ्याचदा ऐकलं आहे. त्यामुळे कुठंतरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात भीती होती. मी त्यांच्या वस्तीत गेल्यावर दोन तृतीयपंथी पाहुणचार म्हणून त्यांच्या घराच्या कोपऱ्यावर उभे होते. त्यांनी घर दाखवलं,आजूबाजूचे लोक माझ्याकडे थोड्या विचित्र नजरेने बघत होते. पण ठीक आहे ना, आपण तर बातमीसाठी आलोय, मग आपण आपलं काम करुन निघून जाऊ, या विचारानं मी घरात गेलो.
खाली घर आणि वरती ऑफिस. अशी काहीतरी त्यांच्या घराची रचना. त्यामध्ये त्या घराच्या मालकीण आणि सोबत आणखी सात-आठ निराधार तृतियपंथी. घरमालकीणीने म्हणजे त्या मॅडमने मला सगळ्यांची ओळख करून दिली. चहा-पाणी केलं. मी त्यांना बातमी समजावून सांगितली. बातमी त्यांच्या एका कुटुंबातील व्यक्तीवर होती. तो तृतीयपंथी असून सुबक गणपती बनवतो आणि ते माध्यमातून लोकांना कळावं, असं काहीतरी माझ्या डोक्यात होतं. त्यांनी यासाठी मला पूर्ण सहकार्यही केलं.
यादरम्यान त्या मॅडम बोलत होत्या की, आमच्या समाजासाठी सरकारने काहीही केलं नाही. अजून खूप काही गोष्टी करायच्या बाकी आहे, वगैरे-वगैरे. हे सगळं बोलत असतांना मी त्यांच्या ऑफिसचं निरिक्षण करत होतो. आधीच्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो, शरीरसुखावेळी बाळगायची सावधगिरी, कोणाला काही आजार बळावला असेल तर त्याला करण्यात येणारी मदत अशा प्रकारचे चार्ट तिथं लावले होते.
या समाजाला अज्ञानातून बाहेर काढण्याचं कुठतरी या मॅडमचा ध्यास होता. हे आतापर्यंतच्या त्यांच्या बोलण्यातून दिसत होतं. तिथे ऑफिसमध्ये बसलेले तृतीयपंथी असे नटून बसले होते की काही क्षण आपण विसरून जाऊ की हे तृतीयपंथी आहे. सगळे एखाद्या मित्राप्रमाणे माझ्याशी बोलत होते.
तेव्हा मी माझ्या काही शंकाना विचारायला सुरवात केली, ज्या मला अगदी लहानपणापासून डोक्यात घर करून होत्या. मी त्यांना विचारलं, ‘तुम्हाला कधी कळालं की आपण पुरूष आहोत, पण आपल्याला स्त्री सारखं राहायला आवडतं?’ थोडक्यात काय तर तुमच्या भावना इतरांपेक्षा वेगळ्या आहेत हे कधी कळलं, त्या मॅडमने मला इतकं सरळ उत्तर दिलं की, ‘तुला कधी कळलं तू एक पुरूष आहेस ?’
मी बोललो ‘सातवी- आठवीत’. त्या बोलल्या ‘तसचं तेव्हाचं आम्हाला कळालं की आम्ही या सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत’. मी परत त्यांना प्रश्न केला ‘जर तुम्हाला हे माहित झालं तर मग लोकांपुढे हे समोर का आणायचं ? ‘. त्यांनी मला उत्तर दिलं ‘तु एखाद्याकडे आकर्षला जातो तर ते तू समाजापासून लपवू शकतो ?’. त्या मॅडम उच्चशिक्षित आणि अनुभवी असल्याच त्यांच्या उत्तरातून चांगलचं दिसत होतं. या संवादातून मग मी त्यांच्या व्यथा जाणून घ्यायला सुरुवात केली.
मॅडम पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा म्हणून जन्माला आल्या. आपला मुलगा असा जन्माला आला म्हणून प्रत्येकवेळी त्यांना हिनवलं जाऊ लागलं आणि मग एकेदिवशी त्या घर सोडून आपल्या सारख्याच समदु:खी लोकांसाठी काम करण्याच्या हेतुनं त्यांनी संस्था काढली. तृतीयपंथी म्हणून जगणं हे त्यांना कधीच वाईट वाटलं नाही. पण समाजाच्या चौकटीत त्यांना मिळणारी वागणूक ही अत्यंत घाणेरडी आणि लज्जास्पद आहे, हे त्या प्रत्येक व्यथेमागे सांगत होत्या. तृतीयपंथीयांचं जीवन ज्यांच्या वाट्याला आलं त्यांना एकतर भीक मागवं लागतं नाहीतर मग देहविक्री करावी लागते. कारण ह्या दोन्हीचं ठिकाणी हे तृतीयपंथी काम करू शकतात. दुसऱ्या ठिकाणी एक तर त्यांना कामावर घेतलं जातं नाही. घेतलं तर तिथे हिणवलं जातं. असं सगळ त्या अगदी सगळ दु:ख गिळून सांगत होत्या.
‘आम्ही असं काय पाप केलं की दोन वेळेच्या जेवणासाठी आम्हाला हात पसरावे लागतात. नको वाटलं तरी मजबूरी म्हणून देह विक्रीचा व्यवसाय करावा लागतो. आम्हाला पण स्वतंत्र आहे, आम्हाला पण अधिकार आहे. पण त्याचा उपभोग एक हिजडा म्हणून बऱ्याचदा घेता येत नाही. मी अनेक हिजड्यांना हे सगळं सोडून आमच्या संस्थेत काम देतीये. रस्त्यावर भटकाणाऱ्याला मदत करते. कोणी येतं कोणी नाही’.
ह्या सगळ्या गोष्टी ऐकून मी त्यांचा निरोप घेतला आणि कधी जर आमच्यावर स्टोरी करायची तर कधीही फोन कर असं ही त्या जाता-जाता बोलल्या. आता असं काही ऐकलं की आपल मन जर संवेदनशील असलं तर विचार सुरू करतं. ‘असा जन्म देव का देतो ?’ असं कधीच कोणीही म्हणणार नाही. कारण देवानी जरी तृतियपंथ्याचा जन्म दिला, तरी पण आपण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला पाहिजे. आपण एका अपंगांला जसं काम देतो तसं तृतीयपंथीयांना का काम देत नाही.
तृतीयपंथीयांची लाज त्यांच्या कुटुंबाला वाटावी असं काय त्यांनी पाप केलं. हेचं की ते वेगळं लिंग घेऊन जन्माला आले. ‘लिंग’ कसलं हो ‘भावना’. त्यांच्यामुळे त्यांच्या भावंडांच लग्न जमू नये. आपला मुलगा तृतीयपंथी आहे म्हणून त्याला समाजासमोर ‘हा आपला नाही’ म्हणून सांगाव लागणं. या सगळ्यांवर विचार केला तर समाज आणि त्याचा तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलेल, तेव्हां हे सगळं चित्र पलटेल आणि तृतीयपंथीयांबद्दलची घृणा कायमची नष्ट होईल. तेव्हा भावनांचा हा भेद नाहीसा होऊन एक माणूस म्हणून आपण समाजात प्रत्येक तृतियपंथीयांविषयी आदर दाखवू आणि ही समाजाची तिसरी बाजू समाजातून बाजूला करू.
तिसरी बाजू
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
21 Nov 2016 10:01 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -