कोणासमोर मन हलकं करावं? कोणासमोर मनात साचलेला हुंदका बाहेर काढावा, कळत नाहीये. कारण माझ्या घरात राहणारा दीड कोटी लोकांचा परिवार आज शोकाकुळ आहे, भयभीत आहे. पण मला आता पुढे येऊन बोलावं वाटतयं. कारण मी जर आता बोलली नाही तर नंतर तुम्ही बोलाल ‘मुंबई कधीच काही बोलत नाही’. ‘दुःख मुंबईला पचवता येतं’. यालाच काही लोकांनी ‘मुंबईचं स्पीरीट’ नाव ठेवलयं. पण माझा एक शब्द न ऐकता, माझी मनातली खदखद न समजून घेता, तुम्ही जर याला माझं आणि माझ्या कुटुंबातल्या लोकांच स्पीरीट समजताय, तर तुम्ही सगळे चुकताय. कारण हे स्पीरीट नाही, आता हे आमचं दुर्दैव आम्हाला वाटायला लागलयं. ही आमची अगतिकता आहे, आमची असाह्यता आहे, आमची मजबुरी आहे. कारण अनेक जण माझ्यावर, माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक कर्त्या पुरूष आणि महिलेवर अवलंबून आहे. त्यामुळे अशा कितीही चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या, कितीही पाऊस पडला, काहीही विपरीत माझ्या घरात घडलं, तरी मला उठावंच लागणार आहे. कारण अनेकांना पोसायची जबाबदारी माझ्यावर आहे. माझ्या कुटुंबासाठी लाईफलाईन असणाऱ्या लोकलने अनेकदा लाईफ हिरावून जरी घेतली तरी दुसऱ्या दिवशी डोळे पुसून, स्वतःला सावरून पुन्हा प्लॅटफॉर्मवर लोकलची वाट पाहत उभं राहावंच लागणार आहे. ते काहीही झालं तरी.


खरतरं खूप काही ठरवून ठेवलं होतं मी दसऱ्याला. माझ्या दीड कोटी कुटुंबाचा सुखा-समाधानात हा सण पार पडू दे, यासाठी माझं ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवीपासून ते माझ्यात वसलेल्या महालक्ष्मी मंदिरात जाऊन मी आणि माझ्या परिवारतले लाखो जण अगदी पहिल्या दिवशीपासून साकडं घालत होते. मात्र, शुक्रवारी सकाळी जे झालं ते माझ्या कुटुंबातल्या कोणाच्याही साखर झोपेतल्या स्वप्नातही येणार नाही, असं घडलं. आम्ही सगळे स्तब्ध झालो. पंधरा ते वीस मिनिटासाठी एल्फिन्स्टन स्टेशनवर पाऊस काय पडला आणि अवघ्या 20 मिनीटात अगदी रिमझिम पावसाने माझ्या कुटुंबातले 23 जणं हिरावून नेले. काय झालं? कसं झाल? नेमकं काय घडलं? हे दिवसभर टीव्हीवर देशभर लोक माझ्या दुःखाला पाहत होते. मात्र, शुक्रवार सकाळची ती 10.30 ते 11.15 वेळ आठवली की, माझ्या दुःखांनी आटलेल्या डोळ्यांत पुन्हा अश्रूंचे थेंब मुंग्या वारुळाबाहेर एकामागे एक पडाव्यात असे बाहेर येतात.  दोन दिवस आधीच आमच्यातल्या सगळ्यांनी दसऱ्याला कोणता शर्ट घालायचा यापासून ते जेवायला काय गोड पदार्थाची मेजवानी करायची इथपर्यंत सगळं ठरवलेलं. ते सगळं आता या दुखात तसंच राहिलंय. जी सकाळची झेंडूची फुलं आम्ही घरी तोरणं करायला घेऊन जाणार होतो, ती दसऱ्याच्या दिवशी सकाळी आम्ही या सहा फुटाच्या कर्दनकाळ ठरलेल्या पुलाभोवती मेनबत्ती पेटवून श्रध्दांजलीसाठी वाहिली. हा दसरा सुतकात जाईल असं कोणाला वाटावं ? असा विचार या श्रध्दांजली देताना प्रत्येकाच्या मनात येत होता आणि प्रत्येक जण भीती मनात ठेवून आतल्याआत अश्रू ढाळत होतं.

शुक्रवारच्या दिवशी माझ्या कुटुंबातल्या विक्रोळीत राहणाऱ्या दोन जवळच्या मैत्रिणी दसऱ्यासाठी फुलं आणायला आल्या होत्या. मार्केटमधून फुलं घेऊन जात असताना काळाने घाला घातला आणि या चेंगराचेंगरीत त्या आमच्या कुटुंबाला पोरक करून निघून गेल्या. ती झेंडूची फुलं घेऊन जाताना त्यांच्या ध्यानीमनीही नसेल की ही झेंडूची फुलं दसऱ्याला तोरण करायला नाही तर आपल्या श्रध्दांजलीसाठी वाहिली जाणार. कामाला अॅक्सिस बँकेत निघालेली हिलोनी कामाला गेली असणार म्हणूण वडिलांना वाटलं. मात्र, जेव्हा हिलोनी अॅक्सिस बँकेत नसून तिचा मृतदेह केईएममध्ये असल्याचं जेव्हा घरच्यांना समजलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमिन सरकली. तेच कामावर बाबांसोबत जाणाऱ्या श्रध्दाचं झालं. निमित्त होतं पायाला ठेच लागली आणि बाबांसोबत कामाला जाण्यासाठी एल्फिन्स्टन स्टेशनला उतरलेल्या श्रध्दाची आणि बाबांची स्टेशनवर हुकाचूक झाली आणि त्याच वेळेस चेंगराचेंगरीत श्रध्दा आपल्यातून निघून गेली. 22 मृतदेहांचा खच या चेंगराचेंगरीत सामानाचं गाठोडं जसं काढावं तसा काढत होते. यात कुणाची मुलं घरी वाट पाहत होती, तर कोणाचे आई वडील, तर कोणाची बायको.

त्याहून वेदनादायक दृश्य केईएममध्ये होती. अॅम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज प्रत्येकाच्या छातीत आणि मनात धडधड वाढवत होता. रक्तासाठी मागणी लाऊडस्पीकर लावून केली जात होती. काही मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात येत होते. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांचा अचानक हंबरडा फोडून रडतानाचा आवाज अनेकांचे ह्रदय पिळवटून टाकणारा होता. हे सगळं अचानक अघटीत घडलं होतं. मंत्री, राजकारणी, आमदार, खासदार आपली पोळी भाजायला गर्दी करून होते, तर काही सांत्वन करत होते. आरोप-प्रत्यारोपाचं सत्र सुध्दा या केईएममध्येच सुरू झालं. पक्षविरोधी घोषणा करणारे दलिंदर जर मदत करायला आणि रक्तदान करायला समोर आले असते तर बरं झालं असतं, अस वाटतं होतं. रेल्वेमंत्र्यांनी भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर केली, घटनेच्या चौकशीचे आदेश दिले, धोकादायक पुलांच्या ऑडिटबाबत बोलले आणि लोकांचा राग, क्लेश पाहून केईएमच्या मागच्या रस्त्याने निघून गेले. रात्रभर शवविच्छेदन विभागाच्या बाहेर लोकांचा, मृतांच्या नातेवाईकांचा गराडा सुरू होता. आता सगळं शांत झालं होतं. पण आज जे घडलं त्या रात्री त्याचं दुःख आणि भीती अनेकांच्या मनात होती. अनेकांच्या मनात त्या पुलावर मी असतो तर माझ्या बायकोचं, आई-बाबांचं, लेकराबाळांचं काय झालं असतं? हे विचार सुध्दा आले. असे भयभीत विचार मनात ठेवूनच माझ्या कुशीत झोपणाऱ्या माणसाचे काही काळापुरते का होईना पाणावलेले डोळे मिटले.

सकाळ झाली, दसऱ्याची पहाट. मात्र, माझ्या घरातल्यांसाठी ही पहाट सुतकातल्या दसऱ्याची होती. यातून बाहेर पडू, अशा दुःखातून मी याआधी सुध्दा सावरले आहे. असं, मी स्वतःला समजावून सांगत माझ्या घरात राहणाऱ्या प्रत्येकाला  एका मोठ्या आईप्रमाणे, बहिणीप्रमाणे धीर देत होते. पण अनेकांना जाणवत होतं करोडोंना आसरा देणारी मी मुंबापुरी मनानी खचली. कारण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेक प्रसंग मी झेलले असले तरी प्रत्येक घटना माझ्या मनाला घाव करून गेली आणि मी माझ्यात राहणाऱ्या प्रत्येकाला, तो कुटुंबातला शत्रू असो किंवा मित्र प्रत्येकाला माफ केलं. यावेळेस सुद्दा मला माफ करायची इच्छा नसतांना हे सगळं विसरून कुटुंबाला धीर देऊन पुन्हा उभं करायचयं आणि माझ्या या दुर्दैवाला ज्याला लोकांनी मुंबई स्पीरीट असं नाव दिलं ते पचवत पुढे फास्ट लोकल सारखं यातून बाहेर यायचंय. मात्र, हा मनाला चटका लावणारा सुतकातला दसरा  आयुष्यभर माझ्या कटू आठवणीत राहिल हे मात्र नक्की...!

तुमची लाडकी,
                                                                                                                                                         मुंबई (मुंबापुरी)