‘तोंडी तलाक’, ‘ट्रीपल तलाक’, ‘त्रिवार तलाक’ असे अनेक शब्द गेल्या अनेक दिवसांपासून कानावर पडतायेत. मुस्लिम महिलांसाठी जाचक आणि त्यांचा ‘मानवी हक्क’ हिरावून घेणारी ही प्रथा तशी अनेक दिवसांपासून आस्तित्त्वात आहे. मात्र, भारतीय संविधानातील मानवी हक्काची पायमल्ली करणारा हा कायदा कितपत लोकांच्या पचनी पडतो? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.

तीनदा ‘तलाक’ ‘तलाक’ ‘तलाक’ बोललो की, झाला तलाक. झालो विभक्त कायमचे. यावेळी हा पती-पत्नीचा संसार 40 वर्षाचा असू द्या किंवा मग 1-2 दिवसांचा. यानंतर तसा पती या सगळ्या जाचातून मुक्त होतो. कारण तलाक देण्याचा अधिकार हा फक्त पतीला आहे. शिवाय मुलं सांभाळण्याचा अधिकारसुद्धा तो बायकोवर सोपवून देतो आणि दुसऱ्या लग्नासाठी तयार होतो. या सगळ्यात मात्र बायकोची फसगत होते. कारण नवरा स्वीकारत नाही त्यामुळे बायको आपल्या मुलाबाळांसोबत रस्त्यावर येते.

‘कुरआन’मध्ये विवाहाला ‘मीसाक-ए-गलीज़’ (मजबूत समझौता) असं म्हटलं आहे. त्यामुळे हा करार पती-पत्नीच जोपर्यंत पटतं तोपर्येंत राहतो. एकदा का पती-पत्नीचे संसारात भांडणं, खटके उडायला सुरू झाले, की मग हा करार कायमचा मोडायला पती तयार असतो. मात्र, यावेळी मुस्लिम प्रथेत तलाकचा अधिकार जसा पुरूषाला आहे, तसा महिलेला पण आहे. मुळात तलाकचे इस्लाममध्ये चार प्रकार आहे. तलाक, तफवीज़-ए-तलाक़, खुलअ आणि फ़स्ख़-ए-निकाह. यामध्ये तफवीज़-ए-तलाक़, खुलअ आणि फ़स्ख़-ए-निकाह या चार प्रकारात पत्नी पतीला आपल्या मर्जीने तलाक देऊ शकते. आता नेमके काय आहेत हे प्रकार -

तफवीज़-ए-तलाक़- यामध्ये पत्नी आपल्या पतीला तलाक देऊ शकते. यात महत्वाचं म्हणजे हा तलाक पत्नीने स्वतःहून देण्याचा अधिकार पतीने पत्नीला द्यायला हवा. तरच, हा तलाक होऊ शकतो. कारण, हा अधिकार फक्त पती आपल्या पत्नीला देऊ शकतो. या तलाकमध्ये पत्नी मुस्लिम अदालतमध्ये मुस्लिम काझीच्या मदतीने हा तलाक घेऊ शकते. यामध्ये तलाक देण्याचं कारण पत्नीला काझींना द्याव लागत. काझी या कारणांची पडताळणी करतो आणि त्यानंतर यावर निर्णय होतो.

ख़ुलअ- यामध्ये पत्नी लग्नानंतर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाही असं जेव्हा पत्नीला वाटतं. तेव्हा हा तलाक ती घेऊ शकते. यामध्ये सुध्दा तलाक देण्याआधी महर म्हणजे लग्नानंतर पती कडून पत्नीने घेतलेली रक्कम पतीला वापस करावी लागते

फ़स्ख़-ए-निकाह- या तलाकमध्ये पत्नी मुस्लिम अदालतमध्ये मुस्लिम काझीच्या मदतीने हा तलाक घेऊ शकते. यामध्ये तलाक देण्याचं कारण पत्नीला काझींना द्याव लागत. यामध्ये पती पैसे कमवत नाही, जबरदस्ती करतो, पती हरवला आहे, पतीला मानसिक आजार आहे. अशा कारणांची मग काझी पडताळणी करतात आणि त्यानंतर यावर निर्णय होतो.

तलाक़- सर्व वाद या प्रकारामुळे आहे. कारण यामध्ये पतीला तलाक देण्याचा अधिकार इस्लाम मध्ये देण्यात आला आहे.

खरं तर फक्त हेच तलाक देण्याचे मार्ग इस्लाम धर्मात नाहीत. याशिवाय, इस्लाममध्ये तीन अजून मार्ग आहेत. ते म्हणजे, तलाक-ए-हसन, तलाक-ए-अहसन आणि तलाक-ए-बिद्अत. खरं तर ‘तलाक’ ‘तलाक’ ‘तलाक’ चा जन्म तलाक-ए-बिद्अत मधून झाला. खरं तर तलाक-ए-हसन, तलाक-ए-अहसन ह्या तलाक देण्याच्या योग्य प्रकाराला शिय्या-सुन्नी मुस्लिमांचा विरोध आहे. तलाक-ए-बिअद्त मध्ये जर कोणी पती पत्नीला तोंडी ‘तलाक’ ‘तलाक’ ‘तलाक’ बोलला तरी तो तलाक मानला जातो. यानंतर पती, पत्नी कधीच एकत्र राहू शकत नाही, हा तलाक ते मागे घेऊ शकत नाही किंवा मग ते पुन्हा एकमेकांशी लग्न करू शकत नाही.

आता जर इस्लामी शरीअतमध्ये (मुस्लिम पर्सनल लॉ) जर तलाक बाबत असा नियम तयार केलेला असेल, तर या नियमांमध्ये छेडछाड होऊ शकते का ?  हा प्रश्न आहे. तर आपण शरीअतमधील नियमांमध्ये छेडछाड करू शकतो. मात्र, हदिस किंवा कुरआनमध्ये करू शकत नाही. शरीअतमध्ये नियम करतांना हदिस आणि कुरआनचा उपयोग करून मानवाने हे नियम तयार केले. आता दुसरीकडे इस्लाम धर्मात मानवाला चुकीचा पुतळा सांगितलं गेलयं. त्यामुळे सहाजिकच, शरीअत तयार करताना मानवाकडून जर चूक झाली असेल, ती सुधारली जाऊ शकते. म्हणजेच, शरिअतमध्ये(मुस्लिम पर्सनल लॉ) मध्ये आपण बदल करू शकतो.

आता जर या तीन तलाकमध्ये ज्या महिलांचे शोषण झाले, त्या महिलांशी आपण या बाबत चर्चा केली, तर या प्रथेमुळे कितेक महिलांचे संसार, आयुष्य उध्दवस्त झाल्याच दिसून आलं. यामध्ये कोणाला व्हॉटस् अपवर पतीकडून तीन तलाक देण्यात आला, तर कोणाला झोपेत असताना पतीने तोंडी तलाक दिला. एका तीन तलाकच्या चर्चासत्रात जेव्हा या प्रथेमुळे पिडीत सर्व महिला एकत्र आल्या तेव्हा अनेकांनी याबाबच विरोध दर्शवतांना आपल्या कैफियत मांडल्या. एका मुस्लिम महिलेशी पतीने विवाह करून घरी आणल्यानंतर तिला कऴालं कि, आपल्या पतीचं अगोदरचं लग्न झालेलं आहे. त्यामुळे ती तिच्या पतीसोबत राहायला तयार नव्हती. मात्र, तलाक पती देत नव्हता, उलट तलाक न देता तिच्या जबरदस्ती करायचा. याच चर्चासत्रात एका महिला सांगते, ‘माझे लग्न माझ्या घरच्यांनी मौलवीशी लावून दिले. त्यांनी मला लग्न झाल्यानंतर 2 वर्षांनी तोंडी तलाक दिला. आता मला 6 महिण्याची मुलगी आहे. मी कुठे जाऊ ?, या मुलीला तुझ्या वडिलांनी का सोडले ? याचं काय कारण सांगू’ . कोणाला 6 महिण्याच मुलं आहे तर कोणाला 10 वर्षाचं. आता हे मुल घेऊन या मुस्लिम महिला या अनिष्ट प्रथेविरूध्द दाद मागायला निघाल्या आहेत. ज्या मुस्लिम महिला शिकल्यासवरल्या आहेत, त्या कुठे ना कुठे काम करून आपल्या आणि आपल्या मुलाचा उदर्निवाह करत आहेत. मात्र, ज्या शिकलेल्या नाहीत त्या आपल्या उदर्निवाहासाठी अजूनही भटकत आहेत. यात सगळं पाहिलं तर याचं काडीचही दु:ख त्यांना तीन तलाक दिलेल्या पतींना नाही.

या कायद्याबाबत वाद हायकोर्टात अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण येत्या काही दिवसात या प्रथेबाबत लवकरच ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाकडून लागेल. हा निर्णय यासाठी ऐतिहासिक असेल, कारण यामध्ये एका धर्माची प्रथा म्हणजेच मानवाने धर्मासाठी तयार केलेले नियम महत्वाचे ठरतात? का मग देशाच्या संविधानाने दिलेला समान मानवी अधिकार ? हा निर्णय लागेल. निर्णय कोणाच्याही बाजूने लागेल, मात्र इतके दिवस पती असून सुद्धा जबरदस्ती तलाक मिळालेल्या महिला, वडिलांचे जिवंतपणी छत्र हरवलेले मुलंबाळं यांना हा निर्णय कितपत न्याय मिळून देईल ? हा सर्वांसमोर अजूनही मोठा प्रश्न आहे.