आज 14 फेब्रुवारी... म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे'... जगभरातील प्रेमवीर या दिवसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. एकविसाव्या शतकाची नांदीच मुळात तंत्रज्ञानाच्या आविष्कारानं, जयघोषानं झाली. त्यामुळे सारं जगच 'ग्लोबल व्हिलेज' बनलं. यातूनच आचार-विचार, रूढी-परंपरा, सण-उत्सवांचं जगभरात मोठ्या प्रमाणात आदानप्रदान व्हायला लागलं. पाश्चिमात्य देशातला 'व्हॅलेंटाईन डे' यातूनच जगभरात साजरा व्हायला लागला. नवी स्वप्नं पाहत जगाची क्षितीजं आपल्या कवेत घेऊ पाहणाऱ्या भारतीय तरूणाईलाही हा दिवस आपला वाटायला लागला. प्रेमात पडलेल्या, पडू पाहणाऱ्यांसाठी हाच 'व्हॅलेंटाईन डे' म्हणजे आयुष्याच्या वळणातील महत्त्वाचा दिवस झाला. या दिवसावरची 'पेरणी' साधली तर येणाऱ्या प्रेमाच्या 'सुगी'च्या राशीनं आयुष्याचं सोनं होईल, असं तरूणाईला वाटतं. अन यातूनच गेल्या दोन दशकांत आपल्या देशातही 'व्हॅलेंटाईन डे' हा प्रेमवीरांसाठी 'ग्रँड इव्हेंट' ठरलाय.
यावर्षीचा व्हॅलेंटाईन डे' मात्र आपल्या देशासाठी, राज्यासाठी सर्वार्थानं वेगळा आहे. त्याचे संदर्भही फार वेगळे आहेत. हे संदर्भ आहेत राजकारणाचे आणि देशाचं भवितव्य, राजकीय दिशा बदलू पाहणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे. यावर्षी 'व्हॅलेंटाईन डे'चं गुलाबी, रोमँटिक वातावरण सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या धुरळ्यात पार हरवून गेलंय. सध्याच्या वातावरणात अनेक जुने 'व्हॅलेंटाईन' तुटण्याच्या मार्गावर आहेत. तर काहीजण नवा घरठाव शोधत नवा 'व्हॅलेंटाईन' शोधण्याच्या प्रयत्नात आहे. रूसवे-फुगवे, शह-काटशह यातून आपली राजकीय 'जागा' वाढवण्याचा प्रयत्न राजकारणातील 'व्हॅलेंटाईन' सध्या करतांना दिसतायेत.
देशात आणि राज्यात सध्या दररोज अनेक नव्या राजकीय घडामोडी घडतायेत. त्यातून रोज नव्या आघाड्या जन्माला येत आहेत. तर अनेक जुने राजकीय संसार तुटताना दिसत आहेत. देशात 2014 मध्ये नरेंद्र मोदी नावाची 'लाट' आली. तेव्हाच्या प्रस्थापित काँग्रेस आघाडी सरकारविरूद्धच्या 'अँटी इन्कम्बसी'ला मोदी नावाचा नवा पर्याय मिळाला होता. अन यातूनच देशात 2014 मध्ये मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आलं. 2014 मध्ये आलेल्या मोदी लाटेनं देशातील 'राजकीय व्हॅलेंटाईन' म्हणजेच आघाड्या, युत्यांचे संदर्भ नव्यानं लिहिले गेलेत. दोन विरूद्ध दिशांना तोंडं असलेल्या अनेक राजकीय विचारधारा, पक्ष, नेते एकत्र आलेत. त्यातूनच गेल्या दोन दशकांत देशाच्या राजकारणात परस्परांचे राजकीय शत्रू असणारे पक्ष आता एकमेकांचे घनिष्ठ राजकीय मित्र झाले आहेत.
'राजकीय व्हॅलेंटाईन' मध्ये देशात सर्वाधिक चर्चा आहे ती उत्तर प्रदेशातील 'सपा-बसपा आघाडी'ची. उत्तर प्रदेशासह हिंदी भाषिक पट्ट्यातील राजकारण हे काहीसं खुनशी अन व्यक्तीद्वेषाचं. उत्तर प्रदेशातील 'सपा-बसपा'चं राजकारण म्हणजे याच परंपरेतलं. नव्वदीच्या दशकातलं 'मायावती विरूद्ध मुलायम' यांच्यातलं सत्तेसाठीचं रक्तरंजित राजकारण साऱ्या देशाने उघड्या डोळ्यांनी पाहिलंय. 1993 मध्ये मुलायमसिंग यादव आणि काशिराम यांच्यात आघाडी झाली होती. यातूनच त्यांनी राज्यात सरकारही स्थापन केलं होतं. पण, काही दिवसांतच हा राजकीय मधुचंद्र संपला अन हे पक्ष एकमेकांचे 'सख्खे दुश्मन' आणि 'पक्के वैरी' झाले. मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सपा-बसपाचं पार पानिपत झालं. उत्तर प्रदेशात 80 पैकी फक्त पाच जागा सपाला मिळाल्यात. तर बसपाला यात पार भोपळाच हाती लागला.
पुढे नियतीनं या दोन्ही पक्षांना गोरखपूर आणि फुलपूर पोटनिवडणुकीत एकत्र आणलं. अन ते यात विजयीही झाले. पुढे हाच प्रयोग कैरानाच्या लोकसभा पोटनिवडणुकीत अजितसिंहाच्या लोकदलाला सोबत घेत आणखी यशस्वी ठरला. तेव्हापासून दोन्ही पक्षातलं राजकीय प्रेम चांगलंच फुललंय. आता या दोन्ही पक्षांनी लोकसभेत आघाडीची घोषणा करत आपलं जागावाटपही जाहीर केलंय. देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या उत्तर प्रदेशातील सपा-बसपामधलं हे 'राजकीय व्हॅलेंटाईन' नक्कीच राजकीय रंगत वाढवणारं असणार आहे.
त्यानंतर देशातील आणखी एका राजकीय 'व्हॅलेंटाईन'ची चर्चा मोठ्या प्रमाणात झालीय. ती म्हणजे 2018 मध्ये कर्नाटकात काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलात झालेल्या आघाडीची. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत फक्त स्वत:च्या 28 आमदारांच्या पुंजीवर एच. डी. कुमारस्वामी काँग्रेसच्या पाठिंब्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. अन यात इच्छा नसतानाही पुढाकार घ्यावा लागला होता काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना. सिद्धरामय्या म्हणजे देवेगौडा कुटुंबियांचे कट्टर राजकीय विरोधक. सिद्धरामय्या मूळचे देवेगौडांच्या जनता दलाचेच. 2004 मध्ये एच.डी. देवेगौडा आणि मुलगा कुमारस्वामींवर "पक्ष प्रायव्हेट लिमिटेड" झाल्याचा आरोप करत सिद्धरामय्यांनी पक्ष सोडला. पुढे काँग्रेसमध्ये प्रवेश करुन ते मुख्यमंत्री झाले. मात्र, 2018 मध्ये ज्यांना शिव्या घातल्यात त्याच देवेगौडा आणि कुमारस्वामींच्या हातात राज्याचं नेतेपद त्यांना सोपवावं लागलं. राजकारणात बरेचदा इच्छा नसतानाही तुम्हाला पुढ्यात आलेला 'व्हॅलेंटाईन' स्वीकारावाच लागतो, हे याचंच उदाहरण म्हणता येईल.
राजकारण हे क्षणभंगुर समजलं जातं. त्याचा प्रत्यय बिहारच्या राजकारणातून आलेला दिसला. एका दिवसात लालूप्रसाद यांच्यासोबतची आघाडी तोडत भाजपच्या कळपात सामील झालेल्या नितीश कुमारांच्या या धक्का देणाऱ्या 'व्हॅलेंटाईन' तंत्राने तर राजकीय पंडितही गोंधळले होते. तर आंध्रात राजशेखर रेड्डींच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात काँग्रेसशी उभा दावा ठोकणाऱ्या चंद्राबाबू नायडूंना अलिकडे काँग्रेसच्या प्रेमात बुडतानाही आपण पाहिलं आहे. देशात अनेक राज्यात दररोज असेच नवनवे राजकीय 'व्हॅलेंटाईन' उदयाला येत आहेत. त्यांच्यातील 'साथ जियेंगे, साथ मरेंगे'च्या सत्तेच्या प्रेमाच्या 'आणा-भाका' आता दररोजच्या 'ब्रेकींग न्यूज' होतांना दिसतायेत.
देशात आणखी चर्चा आहे 2014 मध्ये देशाने आपला सक्षम राजकीय पर्याय म्हणून शोधलेल्या एका 'व्हॅलेंटाईन'ची.... 'नरेंद्र मोदी' असं या व्हॅलेंटाईन'चं नाव... 2014 मध्ये जनतेला विकासाची स्वप्न दाखवत या 'व्हॅलेंटाईन'नं देशाची सूत्रं हातात घेतली. नवलाईचे काही दिवस संपल्यानंतर देशात या नव्या व्हॅलेंटाईन'च्या कारभारावर कुरबुरी वाढू लागल्यात. 2014 पासूनचं पुढचं प्रत्येक वर्ष मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख खाली येणारं ठरलं. नोटबंदी, जीएसटी, शेतमालाचे पडलेले भाव, विचार-अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेल्या अघोषित बंदीचा आरोप, शेतकऱ्यांची आंदोलनं यातून देशाने 2014 मध्ये डोक्यावर घेतलेला हा 'व्हॅलेंटाईन' सध्या 'इस बार जमेगा की नही?' या विचारानं चांगलाच चिंतेत आहे. गेल्या पाच वर्षांत 'अच्छे दिन' नावाचं भूत या सरकारच्या मानगुटीवरून काही केल्या उतरायला तयार नाही. त्यामुळे 2019 चं 'सत्तेचं व्हॅलेंटाईन' मोदींसाठी बिलकुल सोपं नाही, हे तेवढंच खरं.
सत्तेचं 'कमळ' फुलवण्यासाठी लागणारे अनेक मित्र त्यांना सोडून गेले. चंद्राबाबू नायडूंचा तेलगू देसम, उपेंद्र कुशवाहांचा राष्ट्रीय लोकसमता पक्ष, राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझीचा 'हिंदुस्थान अवामी मोर्चा', ईशान्येतील काही प्रादेशिक पक्ष अशा अनेक मित्रपक्षांनी त्यांच्या मैत्रीचा 'गुलाब' फेकून देत आपले नवे 'व्हॅलेंटाईन' शोधलेत किंवा त्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे 'निकाल' मोदींच्या आयुष्यात सत्तेच्या गुलाबाचा 'सुगंध' पेरतात की, पराभवाचे 'काटे' याचीच उत्सुकता प्रत्येकाला आहे.
महाराष्ट्रात यावर्षीच्या 'राजकीय व्हॅलेंटाईन'चे संदर्भ तर पार वेगळे आहेत. या संदर्भाच्या संभाव्य उत्तरांकडे देशातील राजकीय वर्तुळाचं मोठं लक्षं लागलंय. महाराष्ट्रात कोण कुणाचं 'राजकीय व्हॅलेंटाईन' असेल याबाबत मोठी संदिग्धता आहे. 'शिवसेना-भाजप'ची युती होईल का?.... ते स्वतंत्र लढल्यास त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होईल का?.... प्रकाश आंबेडकरांची 'वंचित बहुजन आघाडी' काँग्रेस राष्ट्रवादीसोबत खरंच येईल का?.... त्यांच्या 'बारा' जागांची मागणी पूर्ण न झाल्यास ते 'काँग्रेस आघाडी'चे बारा वाजवतील का? अशा साऱ्या प्रश्नांतच महाराष्ट्राच्या 'पॉलिटिकल व्हॅलेंटाईन'ची उत्तरं दडली आहेत.
सध्या महाराष्ट्रासह देशाला उत्सुकता आहे ती देशातील सर्वात जुन्या अन सर्वाधिक टिकलेल्या 'राजकीय व्हॅलेंटाईन कपल'च्या संबंधाची... हे 'राजकीय व्हॅलेंटाईन कपल' म्हणजे 'शिवसेना' आणि 'भाजप'.... भाजपचा सर्वात जुना आणि विश्वासू मित्रपक्ष अशी शिवसेनेची ओळख... मात्र, 2014 मधील महाराष्ट्रात झालोल्या विधानसभा निवडणुकीपासून या दोन पक्षांचे संबंध प्रचंड ताणलेले आहेत. 1989 पासून युतीच्या माध्यमातून सोबत असलेल्या या दोन्ही पक्षांत 2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपासून प्रचंड बेबनाव, मतभेद अन भांडणं झालीत. राज्यात कधीकाळी लहान भावाच्या भूमिकेत असलेल्या भाजपनं मुख्यमंत्रीपदासह अनेक सत्ताकेंद्र बळकावत शिवसेनेलाच लहान भाऊ म्हणून दाखवण्याचे प्रयत्न सातत्याने केलेत. याची सल मनात असलेल्या सेनेनं सत्तेत असतानाही भाजपाच्या तोंडाला गेल्या साडेचार वर्षांत चांगलाच फेस आणलाय.
केंद्रात सत्ता आल्यानंतर भाजपनं राज्यात सेनेला कायम डिवचल्याची, अपमानित केल्याची भावना शिवसेना आणि शिवसैनिकांमध्ये आहे. केंद्र आणि राज्यात सोबत सत्तेत असलेल्या सेनेच्या विरोधाकडे भाजपनं हेतूपुरस्सर दुर्लक्ष केलं. मागच्या साडेचार वर्षांत एकेकाळच्या 'व्हॅलेंटाईन कपल' असलेल्या भाजप-सेनेतला कायम 'सामना' देशानं पाहिलाय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या 'चौकीदार चोर है'च्या घोषणेची 'री' ओढत 'चौकीदार' असणाऱ्या पंतप्रधानांवरच टीकेचे 'बाण' डागलेत.
1995 मध्ये युतीचे पहिले सरकार महाराष्ट्राच्या तख्तावर आले. त्यामध्ये युतीने एकत्रित केलेल्या प्रचाराचाही मोठा हातभार होता. 1995 च्या त्या काळात व्हिडिओ प्लेअर खूप चालायचे. भाजप, सेनेने प्रचारासाठी अनेक लघुपट केले होते, गाणे रचलं होते. त्यामध्ये एक गाणं होतं....
'राधा विचारी कृष्णाला
देणारं मत तू कोणाला
गुपित उघडते आहे राधा,
दूर करु आय काँग्रेसला
मते देऊ भाजप सेनेच्या
सदा हसऱ्या कमळाला'....
सेनेचा उमेदवार असलेल्या ठिकाणी याच गाण्यातील शब्द असायचे मते देऊ 'सेना-भाजप'च्या सदा हसऱ्या धनुष्यबाणाला'.... इतकी एकरूपता, एकवाक्यता असलेली ही युती होती.... तेव्हा नुकतेच मतदार झालेल्या युवकांना अशा अनेक गाण्यांनी भुरळ घातली होती. बाळासाहेब, प्रमोद महाजन यांचे ओजस्वी वक्तृत्व अन् त्याकाळचा हायटेक प्रचार यामुळे युतीसंदर्भात लोकांचे मतपरिवर्तन झाले अन् शिवशाहीचे पहिले सरकार आले.
कालांतराने सेना आणखी वाढली, परंतु त्याचा वेग काहीसा मंद होता. परंतु, भाजपा सेनेच्या सोबतीने सेनेच्या पुढे निघून गेली. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेते मरण पावलेत. येथूनच भाजप-सेनेमधलं प्रेम, विश्वासाचं नातं लयाला जायला लागलं. कालांतराने युतीच्या 'शिवशाही'मध्ये ‘शाह’शाही सुरू झाली अन् युतीमधला 'व्हॅलेंटाईन पिरियड' संपला. 2014 मधील 'मोदी लाटे'ला काहीशी ओहोटी लागल्यानंतर आता पुन्हा भाजपा सेनेला ‘वील यू अगेन बिकम माय व्हॅलेंटाईन' असं विचारते आहे. मात्र, शिवसेनाही 'टू बी ऑर नॉट टू बी' अशी गोंधळाची भूमिका घेत काहीशा अडचणीत आलेल्या भाजपला ऑक्सिजनवर ठेवलंय. या 'व्हॅलेंटाईन डे'ला भाजप शिवसेनेसमोर पुन्हा एकदा 'दयावान' चित्रपटातल्या 'आज फिर तुम पे प्यार आया है'चे सूर आळवताना दिसत आहे. मात्र, या 'व्हॅलेंटाईन साँग'ला शिवसेनेकडून मिळणाऱ्या प्रतिसादावरच दोन्ही पक्षांचं राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे, हे निश्चित.
राज्यातील आणखी एका राजकीय 'व्हॅलेंटाईन कपल'च्या प्रेमाला अगदी भरतं आलंय. हे 'कपल' म्हणजे 'काँग्रेस' आणि 'राष्ट्रवादी'.. काँग्रेसनं राजकारणातील चांगल्या 'वेळे'साठी राष्ट्रवादीचं घड्याळ अगदी घट्टपणे आपल्या मनगटावर बांधलंय. महाआघाडीच्या 'पंजा'त जागांचं 'बळ' येण्यासाठी ही आघाडी सपा, रिपब्लिकन पक्षांचे अनेक गट, शेकाप, बहुजन विकास आघाडी, डावे, धर्मनिरपेक्ष जनता दल अन अगदी मनसे असे नवे 'व्हॅलेंटाईन' शोधण्याच्या प्रयत्नात आहेय. या आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादीनं त्यांचं जागावाटपंही जवळपास आटोपल्यानं राजकीय वर्तुळात त्यांच्यातील उतू जात असलेल्या प्रेमाची मोठी चर्चा आहेय.
राज्यात एका आणखी एका 'राजकीय व्हॅलेंटाईन'च्या भवितव्याची चर्चा सुरू आहेय. ही चर्चा आहेय भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आकाराला आलेल्या 'वंचित बहुजन आघाडी'च्या राजकीय भूमिकेची. एमआयएमला सोबत घेत राजकीय धृवीकरण करू पाहणाऱ्या या आघाडीची सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीनं चांगलीच धास्ती घेतल्याचं चित्रं आहेय. दोन्हीकडून 'वील यू बिकम माय व्हॅलेंटाईन' असं चित्र निर्माण केलं जात आहे. दोन्ही बाजूंनी आघाडी व्हावी अशी आपली इच्छा असल्याचं सांगितलं जात आहे. प्रकाश आंबेडकरांनी 'बारा' जागांची मागणी काँग्रेसकडे केली आहे. यासोबतच संघाला संविधानाच्या कक्षेत आणण्यासाठी काँग्रेसनं आपली भूमिका लेखी स्वरूपात द्यावी अशी त्यांनी मागणी काँग्रेससमोर ठेवलीय. आंबेडकरांच्या आघाडीचं काँग्रेस आघाडीसोबतचं 'व्हॅलेंटाईन' स्वीकारलं गेलं तर महाराष्ट्राचं राजकीय चित्र वेगळं राहू शकतं. नाही तर 'बारा' जागा मागणारी त्यांची आघाडी काँग्रेस आघाडीचं महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा जिंकण्याच्या स्वप्नाचे 'बारा' वाजवू शकतात. त्यांना यशापासून 'वंचित'ही ठेवू शकतात. त्यामुळे आंबेडकरांना 'व्हॅलेंटाईन' करणं ही काँग्रेस आघाडीची अपरिहार्यता झाली आहे.
यासोबतच खासदार राजू शेट्टी 'काँग्रेस-राष्ट्रवादी'ला मैत्रीचा गुलाब देतात की 'स्वाभिमानी' स्वबळाचे काटे, याकडेही सर्वांचंच लक्ष लागलंय.
आपली देशातील राजकीय नेते, राजकीय पक्ष अन त्यांच्या राजकीय व्यवस्थेचं खरं 'व्हॅलेंटाईन' नेहमीच 'सत्ता' अन 'पैसा' राहिलीय. 'सर्वसामान्य माणूस', 'आम आदमी', 'कॉमन मॅन' या देशातील व्यवस्थेचं खरं व्हॅलेंटाईन' असायला हवा... मात्र, तोच येथे कायम प्रेमाचा, हक्काचा न्यायाचा भुकेला आहे. अपेक्षा करूयात त्यांच्याही आयुष्यात असाच एखादा 'व्हॅलेंटाईन' यावा... त्यांची उपेक्षा संपवून त्यांच्या आयुष्यात प्रगतीचा, विकासाचा विचार पेरणारा, दुवा ठरणारा... राजकारणातील या सर्व 'व्हॅलेंटाईन्स'ना विकास, प्रेम आणि बंधुत्वाची दृष्टी 'संत व्हॅलेंटाईन' देवो, हीच सदिच्छा. सर्वांना 'व्हॅलेंटाईन डे'च्या शुभेच्छा!!!...